Monday, September 14, 2020

भारद्वाज पक्षी/Greater coucal /crow pheasant



 *भारद्वाज पक्षी* [ *Greater coucal /crow pheasant* -Centropus sinensis ] डोंबकावळ्याच्या आकाराचा असतो.संपुर्ण शरीर रखरखीत काळ्या रंगाच असून त्यावर लाल मतकट विटकरी रंगाचे पंख असलेला हा पक्षी त्याच्या लांबसडक पंख आणि शेपटीमुळे नजरेत भरतो. मोकळ्या माळरानांवर, झाडांवर, मानवी वस्त्यांजवळ सहज वावरणारा हा पक्षी त्याच्या गुंजेसारख्या लाल डोळ्यांमुळे कायम लक्षात रहातो.भारद्वाजाची शेपटी देखील या कुटुंबाच वैशिष्ठ्य दाखवणारी असते. एकावर एक पिसं असलेली ही शेपटी जणू पायऱ्या पायऱ्याच वाटावी अशी असते. कोकणात कुक्कुड कोंभाम्हणुन ओळखला जाणारा हा पक्षी नर आणि मादी सारखेच दिसतात.


भारद्वाज पक्षाचा आहार त्याला साजेल असाच असतो. मोठे किडेमकोडे, आळ्या, गोगलगाई, विविध सुरवंटे, लहान उंदीर, सरडे खाणारे हे पक्षी अजुन एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहेत. हे दुसऱ्या लहान पक्षांची अंडी पळवतात नी खाऊन टाकतात.



या दादा पक्षाचा मिलनाचा काळ साधारण पावसाळ्यानंतर समजला जातो. नर मादीच्या मागे मागे फ़िरुन तिला वश करण्याचा प्रयत्न करतो. या वशिकरणासाठी तो तिला खाण्याचे पदार्थ भेट म्हणुन देतो जे ती स्विकारते. मिलनाच्या हंगामात नर आणि मादी एकाच जोडीदाराबरोबर संधान साधतात. मिलनानंतर, नर भारद्वाज उंच झाडावर, कपाच्या आकाराचे घरटे साधारण ५ ते ८ दिवसात बनवतो. या घरट्यासाठी, तो बांबूच्या पानांचा, सुकलेल्या वेलीचे तुकडे आणि काटक्या वापरतो. हे घरटे तयार झाल्यावर मादी त्यात ३ ते ५ अंडी घालते. साधारण १५ ते १६ दिवसांत यातून पिल्ले बाहेर येतात. अंडी व पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी दोन्ही पालक पार पाडतात हे खास. असा हा भारद्वाज त्याच्या ओरडण्यासाठी प्रसिद्ध आहे. कूप कूप असा धीर गंभीर आवाज अनेकदा सकाळच्या पारी किंवा उतरत्या संध्याकाळी ऐकायला येतो. हाच तो भारद्वाजाचा आवाज. एका वेळेस साधारण ३/४ पासून १५/२० वेळा हा आवाज भारद्वाज काढतो. संपुर्ण भारतात सापडणारा हा पक्षी अनेकदा जमिनीवर उड्या मारताना दिसतो याचं कारण याच्या फ़्लाईट्स म्हणजेच भराऱ्या फ़ार तिव्र नसतात. नर मादी म्हणजे जोडीजोडीने फ़िरणारे भारद्वाज अनेकदा आपण पहातो. याला आपल्याकडे शुभशकुन समजतात तर उत्तरेकडे अनेक ठिकाणी अशुभ समजतात. आता हा कूप कूप आवाज आल्यावर समजा की तुमच्या जवळपास भारद्वाज असणार*
*Uday Parab*

*Isha Tours*

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails