Saturday, December 24, 2016

Ladakh in Winter


The Stok Palace against the beautiful Autumn Colours in Leh.

Temperatures of -16 at Changla Pass 

Walk on the Frozen River .

Prayer Flags on the road to Pangong Lake 

The real voyage of discovery consists not in seeking new landscapes but in having new eyes.” ~said Marcel Proust.

Ladakh in winter is when you can truly understand and experience these lines.
For those of you who have travelled to Ladakh in summer , the Winter brings in a totally new , overwhelming experience.

With Temperatures ranging from -10 to -25, the entire landscape is covered in a thick blanket of snow. The frozen rivers, frozen waterfalls, frozen shores, wilted tress, blue skies, no tourists interfering in pictures and lots of local festivals add to the beauty of the place making Ladakh in winter a heaven for photographers
What’s more, the tranquil, azure blue waters of the Pangong lake also become a thick layer of ice sheet on which you can play cricket, drive your car or even do a somersault. 

So enjoy this trip into the Frozen Wonderland of Ladakh.


Wednesday, September 28, 2016

लडाख प्रवास अजून सुरू आहे - तिसरी आवृत्ती


ग्रंथाली प्रकाशनाच्या ‘शब्द रुची’ मासिकामध्ये ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने आलेलं पुस्तक परिक्षण:  




Sunday, April 3, 2016

वायटोमो केव्हज् – न्यूझीलंड



सृष्टीचक्रात ज्या असंख्य घडामोडी होत असतात त्यातून कित्येक वेळा काही अद्भुत गोष्टी घडतात. असंच अद्भुत घडलंय ते न्यूझीलंडच्या उत्तरेला वायटोमा केव्हज्मध्ये. मावोरी ही या भागातील स्थानिक भाषा. वाय म्हणजे पाणी आणि टोमो म्हणजे सिंक होल. जमिनीखाली असलेल्या गुहांमधील पाणी आणि वैशिष्टय़पूर्ण अशा लाइम स्टोनच्या वर्षांनुवर्षांच्या प्रक्रियेतून वायटोमा केव्हज् चमकत असतात. लाइमस्टोनमध्ये असणाऱ्या ग्लोइंग वर्ममुळे ही जागा ग्लोइंग केव्हज म्हणून ओळखली जाते.

१८८९ मध्ये टेन टिनोरु आणि त्याची पत्नी घुटी यांनी या गुहांचा शोध घेतला. पर्यटकांना तिकडे घेऊन जायला सुरुवात केली. एकंदरीतच या जागेचे भौगोलिक महत्त्व पाहिल्यावर न्यूझीलंड सरकारने १९०६ मध्ये त्या स्वत:च्या ताब्यात घेतल्या. संरक्षित केल्या, संवर्धित केल्या आणि पर्यटनाला चालना दिली.

या गुहांमध्ये जाण्यासाठी खास होडय़ांची व्यवस्था केलेली असते. ठरावीक अंतर आतमध्ये गेला की सर्व लाइटस बंद केले जातात. आणि आपल्या तीनही बाजूंनी असंख्य काजवे चकाकू लागतात. एका वेगळ्या जगात असल्याचा आनंद देणारं एक निसर्गाचं अद्भुत आपण स्तिमित होऊन पाहत राहतो. ते सारं दृश्य केवळ अवर्णनीय असेच म्हणावे लागेल. शंभर टक्के शुद्धही न्यूझीलंडच्या पर्यटनाची टॅगलाइन सार्थ ठरवणारं असे हे ठिकाण आहे.

अर्थातच तेथील शासनाने पर्यटन विकासासाठी मोठय़ा खुबीने गुहांचा वापर केला आहे. या गुहांतील गूढ अशा अंतर्गत रचनेचा वापर करून येथे साहसी पर्यटनाच्या काही सुविधा तयार केल्या आहेत. छताला असलेल्या दोराला लटकतदेखील या गुहेतील प्रवास तुम्ही करू शकता. थेट काजव्यांच्या बाजूने होणारा हा प्रवास अत्यंत रोमांचक असाच म्हणावा लागेल. तसेच पाण्यावरील इतर साहसी पर्यटनाच्या सुविधा येथे आहेत. गुहेच्या आत कॅमेरा फ्लॅश वापरायची परवानगी नाही. तुमची होडीदेखील एका विशिष्ट दोराला बांधलेली असते. त्यामुळे तुम्ही उगाच भरकटत नाही.

वायटोमा केव्हजपासून जवळच पुईया हे गावदेखील असेच निसर्गाच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या संपूर्ण गावात गरम पाण्याचे फवारेच्या फवारे उसळत असतात. ते अद्भुत पाहण्यासाठी पुईयाला नक्कीच जावे.

न्यूझीलंडचे आपल्यापासूनचे अंतर आणि त्यामुळे होणारा विमान प्रवासाचा खर्च पाहता, केवळ यासाठीच येथे येणे परवडत नाही. आठदहा दिवसांची न्यूझीलंडची टूर करावी. दक्षिण न्यूझीलंडमध्ये तर आणखीनच धम्माल ठिकाणं पाहायला मिळतात. क्विन्स टाऊन या ठिकाणी मुक्काम करून अनेक ठिकाणांना जाणे शक्य आहे. क्विन्स टाऊन जवळच काही ग्लेशिअर्स आहेत. आपल्याकडच्या हिमालयीन ग्लेशिअर्सच्या तुलनेत अगदीच छोटी. पण या ग्लेशिअर्ससाठी हेलिकॉप्टर्स टूर असते. चाळीस ते पन्नास हेलिकॉप्टर दिवसभरात या ग्लेशिअर्सवर उतरतात. क्विन्स टाऊन ते मिडफर्ड साउंड हा प्रवास जरूर करावा. तीनही बाजूंनी मोठय़ा काचा असणाऱ्या आणि खुच्र्याची उतरती रचना असणाऱ्या बसने १८० अंशातील नजारा पाहत होणारा प्रवास हा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे.

केव्हा जाल : आपला उन्हाळा हा त्यांचा हिवाळा आणि आपला हिवाळा त्यांचा उन्हाळा असतो. त्यामुळे ऑक्टोबर ते एप्रिल हा येथे जाण्यासाठीचा योग्य कालवधी आहे. कसे जाल : थेट विमानसेवा


आत्माराम परब 

Saturday, April 2, 2016

ताक्सांग मोनास्ट्री



एखादी वास्तू अथवा नैसर्गिक भौगोलिक रचना ही त्या देशाची ओळख बनून राहते. त्या वास्तूचा इतिहास, तिचं पावित्र्य, देशवासीयांनी केलेली जपणूक अशा सर्वामुळे तिला एक वलय प्राप्त झालेलं असते. ती वास्तू त्या देशाची प्रतिमा बनून गेलेली असते. भूतानमधील ताक्संग मोनास्ट्रीचं स्थान असंच आहे. अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या भूतानमधले ताक्संग म्हणजे मानाचे ठिकाण. भूतानची ९० टक्के लोकसंख्या ही बौद्ध आहे. स्थानिकांची या वास्तूवर प्रचंड श्रद्धा आहे. आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाकडे गेल्या काही वर्षांत पर्यटकाचा ओघ वाढला आहे. मात्र येथे पोहोचायचे असेल तर बऱ्यापैकी परिश्रम करावे लागतात.

ताक्संग म्हणजे वाघाचे अर्थात टायगरचे वास्तव. एका कडय़ावर वसलेली ही मोनास्ट्री. येथे पोहोचायचे असेल तर किमान सहासात तास चालत जावे लागते. अगदी थोडय़ा अंतरापर्यंत घोडय़ांची सुविधा आहे. पण तीदेखील मर्यादितच आहे. चढउतार आहेत, पण तुलनेने सहज पार करता येण्यासारखं अंतर आहे. वातावरण खूपच आल्हाददायक असल्यामुळे येथे थकवा फारसा येत नाही. आणि आपली ऊर्जा टिकून राहते. महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे वैष्णवदेवीची यात्रा ही जशी पूर्णपणे कमर्शिअल झाली आहे. तसे येथे नाही. येथे येण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, असं भूतान नरेशांचेदेखील ठाम मत आहे. त्यामुळे ते स्वत:देखील चालतच येतात.

अर्थातच हे सारं करण्यासाठी मानसिक आणि मग शारीरिक तयारी हवी. तरच हे शक्य होईल. हजारपैकी केवळ दोनएकशेच पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. पण ताक्संग पाहिलं नाही तर भूतान पाहिलं नाही असं म्हणावं लागेल अशी जागा आहे. त्यामुळे जरा सायास करून जायला हरकत नाही.

या परिसरात पर्यटकांना राहण्याची परवानगी नाही. त्यामुळे परत यावेच लागते. बौद्ध भिख्खू आणि अभ्यासकांसाठी काही सुविधा आहेत. पण त्यासाठी परवानगी काढावी लागते. मोनास्ट्रीच्या आतमध्ये छायाचित्रणाला परवानगी नाही. संपूर्ण मोनास्ट्रीत बुद्ध आणि इतर मूर्ती आहेत. अर्थातच त्या मूर्ती म्हणजे चित्र आणि शिल्पाच्या माध्यमातून सांगितलेल्या कथाच आहेत. मोनास्ट्रीच्या आतमध्ये टायगर नेस्ट आहे. एका बौद्ध भिख्खूने येथे केलेली तपश्चर्येची छोटीशी खोली. ही व्यवस्थित जपून ठेवण्यात आली आहे. मोनास्ट्री दाखवण्यासाठी पारंपरिक मार्गदर्शक असतो. ही जागा फार काही मोठी नाही. फार फार तर दोनशे तीनशे लोकांना सामावून घेईल इतकीच. मोनास्ट्रीजवळ खाण्यापिण्याची कसलीही सोय नाही. वाटेत एक हॉटेल आहे. पण ते खूपच महाग असल्यामुळे सारं काही आपल्यासोबत घेऊन जावे. नमकिन चहा म्हणावा असा गुरुगुर हा भूतानचा पारंपरिक चहा येथे मोफत मिळतो.

केव्हा जाल : सर्वोत्तम कालखंड- मार्च ते जून कसे जाल : थेट पारोला विमानाने भारतात पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावरून फुन्श्तोलिंगला भूतानमध्ये प्रवेश.

आत्माराम परब 

Friday, April 1, 2016

लँटर्न सिटी – व्हिएतनाम



व्हिएतनाम म्हटल्यावर आठवते ते अमेरिकेने छेडलेले युद्ध आणि २० वर्षे त्याचा निकराने प्रतिकार करणारा हा छोटासा देश. पण अशा या संहारक युद्धानंतरदेखील हा देश नव्याने उभा राहिला आहे. इतकेच नाही तर त्याच्या ठायी असणाऱ्या अनेक प्रथा परंपरा तो जोपासतोय. आणि त्या पाहण्यासाठी सारं जग येथे लोटतंय. दक्षिण चीन समुद्रात असणारे व्हिएतनाममधले होय यान हे छोटेसे गाव जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनून राहिले आहे ते त्याच्या लँटर्न सिटीया ओळखीमुळे. संपूर्ण गावात लटकणारे विविधरंगी आणि विविध आकारांतील शेकडो प्रकारचे कंदील ही या शहराची ओळख झाली आहे. तेथे तयार होणारे हे पारंपरिक कंदील पाहण्यासाठी, विकत घेण्यासाठी आणि या पुरातन शहराला भेट देण्यासाठी अक्षरश: हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे येत असतात.

ही झाली या शहराची आजची ओळख झाली. पण साधारण १५ व्या शतकापासून होय यान हे दक्षिण पूर्व अशियातील व्यापाराचे मध्यवर्ती केंद्र म्हणनूा ओळखले जात होते. १५९५ पासून येथे व्यापाराची भरभराट होऊ लागली. मुख्यत: पोर्तुगीज दर्यावर्दी अंतोनिया दी फारियाने केलेल्या प्रवासातून हे गाव प्रकाशात आले. चिनी आणि जपानी व्यापाऱ्यांसाठी तर हे सर्वात सोयीस्कर व्यापारी केंद्र होतं. मात्र १८ व्या शतकात दा नांग या बंदरातून व्यापार करण्याचे विशेषाधिकारी फ्रेंचांना दिल्यानंतर होय यानचे महत्त्व कमी झाले आणि पुढे २०० वर्षे ते दुर्लक्षित राहिले. अर्थात त्यामुळेच येथील वास्तूंना धक्का लागला नाही. तेथील प्रथा परंपरा टिकून राहिल्या. आणि १९९० मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत याचा समावेश केला.

होय यान म्हणजे शांतपणे चर्चा करण्याची जागा. या अर्थालाच हे गाव सध्या जागत आहे. मूळ जुन्या गावाला अजिबात धक्का न लावता त्याचे जतन करण्यात आले आहे. येथील लोकांना दुसरीकडे जागा देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. या मूळ गावात कसलेही नवे बांधकाम केले जात नाही. जे आहे त्याचे संवर्धन करण्यात येते. इतकेच काय पण या गावात भटकायचे असेल तर तुम्हाला पायीच फिरावे लागते. कारण येथे तेल इंधनावर चालणारे कोणतेही वाहन वापरले जात नाही (अग्निशमन दलाची गाडी सोडल्यास). संपूर्ण गावात पारंपरिक वस्तू तयार करणारी आणि विकणारी अनेक दुकानं आहेत. पण मुख्य भर आहे तो कंदिलांवर. असंख्य प्रकारचे कंदील येथे तयार होतात. रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव कंदिलांच्या प्रकाशात न्हाऊन निघते. तर दर पोर्णिमेला सरकारतर्फे येथे कंदिलांसाठी तेल पुरवले जाते. तेव्हाचा नजारा पाहण्यासाठी आवर्जून येथे यायला हवे. व्हिएतनाम तसे पर्यटनाच्या नकाशावर कमीच आहे. पण जे आहे ते या देशाने मोठय़ा हिकमतीने पेश केले आहे. गनिमी युद्धासाठी रचलेलं भूमिगत गाव अजूनही जपून ठेवलं आहे. रम्य समुद्र किनारे आहेत. बेटांची तर गणतीच नाही. खरे तर युद्धात जवळपास पुरते कंबरडे मोडलेला हा देश. पण गेल्या चाळीस वर्षांत अनेक क्षेत्रांत प्रगती करतोय. पर्यटनाच्या माध्यमातून त्यांच्या परंपरा जोपासतोय. आणि त्या परंपरा पाहण्यासाठी सारं जग लोटतंय यातच त्यांच यश सामावलं आहे.

केव्हा जाल पावसाळा टाळून (जुलै ते सप्टेंबर) वर्षभर केव्हाही. कसे जाल व्हिएतनाम-कंबोडिया अशी ट्रीप करता येते. मुंबई-होचिमिन्ह (सायगॉव) विमानप्रवास, नंतर रस्त्याने होययान.

आत्माराम 

Thursday, March 31, 2016

आईस हॉटेल व आईस चर्च




नॉर्दर्न लाइट पाहायला जाणाऱ्यांची संख्या हल्ली बरीच वाढली असली तरी ही भटकंती केवळ नॉर्दर्न लाइटपुरती मर्यादित नाही. नॉर्दर्न लाइट ठरावीक भागात, ठरावीक काळात, ठरावीक वातावरणातच दृष्टीस पडतो. तो पाहणं, अनुभवणं हे आनंददायी आहे. नॉर्दर्न लाइटच्या अनुषंगाने पर्यटनाची रचना विकसित झाली आहे.

उणे पाच ते पंचवीस अंश तापमानात तेथील हिवाळी पर्यटनाला चांगलाच बहर आला आहे. ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने केले जाणारे डॉग स्लेडिंग, रमतगमत फिरावे असे रेनिडिअर स्लेडिंग आणि तारुण्याच्या धुंदीत मस्तीत अनुभवावी असे स्नो मोबिल म्हणजेच स्नो स्कूटर. हे तिन्ही प्रकार संपूर्ण नॉर्दर्न एरियात अगदी सहजपणे अनुभवता येतात आणि तेथे येणारा प्रत्येक पर्यटक त्याचा अनुभव घेत असतो. याच काळात नॉर्थ अटालांटिकमधून अनेक मासे अंडी घालण्यासाठी नॉर्वेच्या वरच्या किनाऱ्यावर येतात. अनेकविध प्रकारचे मासे या काळात पाहता येतात. त्याच वेळी मोठय़ा प्रमाणात सुरू असणारी मासेमारीदेखील सुरू असते.

संपूर्ण नॉर्दर्न परिसरात अतिशय पद्धतशीरपणे येथे अनेक गोष्टी तयार केल्या आहेत. रोवानियामध्ये आर्टिक सर्कलमध्ये आढळणाऱ्या यच्चयावत जिऑलॉजिकल आश्चर्याचे आर्टिकमनावाचे संग्रहालय आवर्जून पाहण्यासारखे आहे. येथेच असणारे सांताक्लॉजचे गाव, सांताक्लॉज पार्क हे सारं जरुर पहावं. उन्हाळ्यातही येथे जाता येते, पण वर्षांखेरच्या दिवसात नाताळच्या काळातला जो माहोल असतो तो काही औरच. आणखी एक धम्माल गोष्टीची निर्मिती या लोकांनी केली आहे. ते म्हणजे आईस हॉटेल आणि आइस चर्च. किरुनापासून वीस किलोमीटरवर असलेले हे हॉटेल स्नो आणि आइस यांच्या संयुगातून तयार झालेल्या स्नाइसपासून तयार केले जाते. या स्नाइसचे मोठमोठे ब्लॉक तयार केले जातात, त्यावर जगभरातील उत्कृष्ट शिल्पी दोन महिने काम करीत असतात. प्रत्येक खोलीची संकल्पना वेगळी असते. अशा अनोखी कोरीवकाम असणाऱ्या ३५ खोल्या येथे आहेत. बेडवर चार पाच रेनडिअरची कातडी अंथरलेली असतात. पांघरण्यासदेखील रेनडिअरचे कातडे दिले जाते. अर्थात एक दिवस राहण्यासाठी किमान वीस हजार रुपये खर्चाची तयार हवी. नुसते पाहायचे असेल तरी पाहता येते.

जवळच आइस चर्च आहे. या चर्चमध्ये लग्न करायचे असेल तर २०२० पर्यंतची प्रतीक्षा यादी आहे. डिसेंबर-फेब्रुवारी या काळातच हे चर्च आणि हॉटेल सुरू असते. त्यानंतर ते वितळू लागते आणि जूनमध्ये पूर्ण नामशेष होते. हा सारा भूभाग ६५ ते ७१ अक्षांशामध्ये येत असल्यामुळे येथे सूर्यप्रकाश कमीच. ट्रॉम्सोमध्ये तर केवळ दोनच तास संधिप्रकाशच असतो. त्यामुळे नॉर्दर्न लाइट दिसण्याची शक्यता सर्वाधिक असते. गडद अंधार आणि स्वच्छ आकाश ही मुख्य गरज पूर्ण होत असेल तर नॉर्दर्न लाइटचे स्वप्न पूर्ण करता येईल. त्यासाठी खास नॉर्दर्न लाइट हंट नावाची रात्रीची सफर आयोजित केली जाते. एक स्वतंत्र गाडी, त्यामध्ये असणारी अनेक तंत्रसामग्री, आणि शूज ते कानटोपी असा संपूर्ण विंटर गिअर असणारा पोशाख करून ही मोहीम सुरू होते. (हा खास पोशाख सफरीच्या खर्चात तुम्हाला वापरायला मिळतो). शहरापासून दूर, निरभ्र जागा शोधून नॉर्दर्न लाइटचा मागोवा घेतला जातो. एका हंटला १५ हजार खर्च होतो. नॉर्दर्न लाइट दिसला तर पैसे वसूल. किरुनामध्येच अतिउंचावर बांधलेला काचेचे छत असलेला अ‍ॅबिस्को स्काय टॉवर आहे. येथे बसून आरामात खात पित नॉर्दर्न लाइट पाहण्याची सुविधा आहे.

थोडक्यात काय तर अत्यंत व्यावसायिक पद्धतीने नॉर्दर्न लाइटसारख्या घटकाचा वापर करून एक  संपूर्ण व्यवस्था उभी करण्यात आली आहे. केव्हा जाल : वर्षांअखेरीस नाताळचा काळात येथे भरपूर धम्माल असते.

कसे जाल : सर्वात सोपा मार्ग मुंबई हेलसिन्की रोवानियामी किरुना टॉमसो ओस्लो मुंबई हेलसिन्की हे केवळ उतरण्यासाठी. रोवानियामीपासून टूरची सुरुवात होते.
आत्माराम परब



Wednesday, March 30, 2016

गोरोंगगोरो




आयुष्यभर लक्षात राहावं असं काही तरी पाहायचं असेल तर गोरोंगगोराला जावं लागेल. निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणून वर्णन करावं असं हे ठिकाण. जगातलं एकमेव क्रेटर ज्यामध्ये ज्वालामुखी उसळी मारून वर आला नाही, तर तो आतमध्ये खेचला गेला. तो लाव्हारस दुसरीकडून बाहेर पडला. पण जेथून तो भूगर्भात खेचला गेला त्या जागी मोठं विवर तयार झालं. तीच ही जागा, गोरोंगगोरा. तब्बल २२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले गोरोंगगोरा आहे ते गरीब अशा टान्झानियामध्ये. पर्यटनासाठी विशेष काहीही नसलेल्या देशामध्ये. पण येथे येणाऱ्या अभ्यासकांनी हे क्रेटर प्रसिद्धीस आणलं. येथील समृद्ध वन्यजीवांच्या विश्वाचा वापर या देशाने खुबीने केला. पर्यटनाच्या कसल्याही सुविधा नसतानादेखील त्यांनी पर्यटन पूरक योजना आखल्या आणि आयुष्यात एकदा तरी पाहावंच असं हे ठिकाण संरक्षित केल, नावारूपास आणलं. स्वत:च असं एक वेगळं स्टॅण्डर्ड निर्माण केलं आणि जपलंदेखील. याची दखल घ्यावी लागेल.

हा सारा परिसरच ज्वालामुखी प्रवण आहे. याच भागात मुख्य डोंगरधारेपासून सुटावलेला (स्टॅण्ड अलोन) असा सर्वात उंच पर्वत किलिमांजरोदेखील आहे. ज्वालामुखी भूगर्भात खेचला गेल्यामुळे तयार झालेल्या या विवराचा परीघ २२ किलोमीटरचा आहे. त्याची सर्वाधिक खोली आहे चौदाशे फूट. वर्षांनुवर्षांच्या प्रक्रियेतून या क्रेटरमध्ये एक समृद्ध जैवसाखळी निर्माण झाली आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे या क्रेटरमध्ये बाहेरून कोणताही वन्यजीव येत नाही. एक जिराफ सोडला तर आफ्रिकेतील यच्चयावत सर्व प्राणी या क्रेटरमध्ये नांदताना दिसतात.

क्रेटरमध्ये तीन तळी आहेत, त्यापैकी दोन गोडय़ा पाण्याची, तर एकात खारे पाणी आहे. त्यामुळे एकाच वेळी गोडय़ा आणि खाऱ्या पाण्यावरील पक्षी आणि इतर वन्यजीव पाहता येतात. गोरोंगगोरो कन्झव्‍‌र्हेशन एरिया आणि गोरोंगगोरो नॅशनल पार्क असे दोन स्वतंत्र विभाग येथे आहेत. क्रेटरमध्ये केवळ आदिवासींनाच चराईसाठी परवानगी आहे आणि उर्वरित भागात फक्त मसाई लोकांनाच राहता येते.

क्रेटरच्या परिघावर पाच हॉटेल्सना परवानगी देण्यात आली. त्यानंतर मात्र कोणत्याही नव्या हॉटेलला परवानगी दिलेली नाही. प्रत्येक हॉटेलला १०० खोल्या आणि कोणत्याही खोलीतून क्रेटर दिसावे अशी रचना आहे. हॉटेल्सची रचनादेखील क्रेटर आणि एकंदरीत वातावरणाला मारक ठरणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे. क्रेटरमध्ये वनखाते सफारी आयोजित करते. सफारीचे मार्ग ठरले आहेत. जेवणाची जागा, स्वच्छतागृहाची जागा सार काही अगदी आखीव-रेखीव आहे. हॉटेल्स तुलनेने खर्चीक असली तरी येथील पर्यटनाचे स्टॅण्डर्ड अनबिटेबल म्हणावे असे आहे. जगातील सर्वात गरीब देश असूनदेखील पर्यटनातील त्यांची मजल वाखाणण्याजोगी आहे. थोडक्यात काय तर गोरोंगोरो मस्ट व्हिजिटमध्ये आहे. बाकी काही पाहिले नाही तरी चालेल, पण गोरांगगोरो पाहावेच लागेल.

क्रेटरला लागूनच जगातील सर्वात मोठे असे १६ हजार पाचशे चौरस किलोमीटरचे सेरेंगिटी नॅशनल पार्क आहे. सेरेंगिटी म्हणजे एण्डलेस प्लेन. अंत नसलेले पठार, गवताळ जागा. येथूनच चाळीस किलोमीटरवर ओलदुवाई येथे मानवाच्या आदिम पाऊलखुणा सापडल्या आहेत. अभ्यासकांना अशाच पाऊलखुणा इथिओपियात सापडल्या, नंतर येथे. पण ओलदुवाईचा कालखंड त्याहीपूर्वीचा आहे. केव्हा जाल : फेब्रुवारी एप्रिल हा पावसाळी काळ सोडून केव्हाही.. कसे जाल : मुंबई नैरोबी किलिमांजरो

आत्माराम परब 

Tuesday, March 29, 2016

आइस हॉकी – लडाख




एखाद्या पर्यटन स्थळामध्ये अनेक वेगवेगळ्या खुबी दडलेल्या असतात. लडाखचंदेखील असंच काहीसं आहे. साधारण २००० पासून लडाख पर्यटनाच्या नकाशावर चमकू लागलं. पर्यटकांची गर्दी वाढू लागली. पण हिवाळ्यातला लडाख पाहणारे तसे कमीच होते. हिवाळ्यात येथे गर्दी असायची मुख्यत: चद्दर ट्रेकसाठी. गोठलेल्या झंस्कार नदीवरून केला जाणारा ट्रेक भटक्यांच्या विश्वात चांगलाच लोकप्रिय होता. लडाखचा हिवाळा हा साहसी खेळांसाठीच अशी धारणा त्यातून तयार झाली. त्यातही विशेषत: परदेशी ट्रेकर्स आवर्जून येथे यायचे. आल्पसच्या पायथ्याहून येणाऱ्या भटक्यांनी लडाखचा हिवाळा पाहिला आणि त्यांना एक वेगळीच कल्पना सुचली. आईस हॉकी खेळायची. त्यांच्याकडे आईस हॉकी हा अगदी नियमित खेळ होता. पण लडाखसाठी सारं काही नवं होतं. त्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून आइस हॉकी खेळायची परवानगी मिळवली. त्यासाठी लागणारे विशिष्ट मैदान तयार केले. जेथे हॉकी खेळायची तेथे पाणी ओतायचे, ते गोठले की यंत्राच्या सहाय्याने ते समपातळीत करायचे. आइस हॉकीचे विशिष्ट शूज (ब्लेड रिंग लावलेले) आणि इतर साधनसामग्री जमा केली. आणि युरोपियनांनी लडाखच्या बर्फात हॉकी रुजवायला सुरुवात केली. लडाखी लोकांसाठी हा खेळ नवीन होता. पण बर्फ रोजचाच होता. लडाखी लोकांनी बर्फाच्या उपजत सवयीतून हा खेळ शिकून घेतला. त्यात प्रावीण्य मिळवलं. आइस हॉकी खेळण्याचा एक नवा ट्रेण्ड लडाखमध्ये मूळ धरूलागला. इतका की त्यांनी त्यांची एक स्वतंत्र टीमच तयार झाली. आणि गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी जानेवारीत आइस हॉकीच्या जागतिक स्तरावरच्या टूर्नामेंट्स लडाखमध्ये खेळल्या जाऊ लागल्या. त्यात लडाखची टीम तर असतेच, पण जगभरातून अनेक टीम्स येत असतात. विशेष म्हणजे मागच्याच वर्षी लडाखच्या टीमने सर्वाना हरवून विजेतेपददेखील मिळवले.

केवळ आइस हॉकी पाहायला किती पर्यटक येतात वगैरे आकडेवारीत सांगणे कठीण आहे. पण हिवाळी पर्यटनाला मात्र नक्कीच उठाव मिळाला आहे. हिवाळ्यातल्या चार महिन्यात केवळ बर्फ असणाऱ्या या प्रदेशाकडे फारसे न वळणारे पर्यटक या मोसमातदेखील येथे येऊ लागले. पूर्ण पानझड झालेल्या लडाखमध्येदेखील एक वेगळे सौंदर्य आहे अनेकांच्या लक्षात येऊ लागल आहे. थेट खुल्या मैदानात सुरू असणाऱ्या आइस हॉकीचा आनंद घेऊ लागले आहे. स्थानिक मुलांनादेखील या हॉकीचं इतकं वेड लागलंय की आपल्याकडे जसे गल्लीबोळात क्रिकेट खेळले जाते, तसेच येथे आइस हॉकी चालते. उणे पाच ते पंचवीस तापमानातील चद्दर ट्रेक, स्नो लेपर्ड ट्रेल अशा पर्यटनलादेखील चालना मिळाली आहे. लडाखमधील हॉटेल्स व इतर पर्यटन सुविधादेखील आता हिवाळी पर्यटनाच्या दृष्टीने विचार करु लागल्या आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये मध्यवर्ती हिटरव्यवस्था, गाडय़ांमध्ये हिटरची सोय, अशा गोष्टी येथे हल्ली होताना दिसतात. केव्हा जाल : आइस हॉकी आणि इतर हिवाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल, फ्रोजन लडाख पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा उत्तम काळ. इतर उपक्रमांसाठी योग्य काळ जून ते सप्टेंबर कसे जाल : मुंबई-लेह थेट विमानाने. (हिवाळ्यात श्रीनगर आणि मनालीकडून येणारे रस्ते बंद असतात.)

आत्माराम परब 

Monday, March 28, 2016

लिव्हिंग रुट ब्रीज – चेरापुंजी



चेरापुंजी, जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणूनच आपल्याला परिचित आहे. पण त्याहीपलीकडे चेरापुंजीत एक मानवनिर्मित नैसर्गिक आश्चर्य दडलेलं आहे. ते म्हणजे लिव्हिंग रुट ब्रिजयेथे प्रत्यक्षात पठारी भागच अधिक आहे. त्या पठारावर एकदेखील झाड दिसत नाही. पावसाळा सोडला तर एरवी काहीच आकर्षण नाही असं हे ठिकाण. पण चेरापुंजीच्या आसपास खालच्या भागात दरीमध्ये अनेक छोटी छोटी गावं आहेत. त्या दरीमध्येच हे मानवाने तयार केलेले नैसर्गिक आश्चर्य दडलेले आहे. अर्थात त्याचा शोध लागला तो डेनिस रायन यांच्यामुळे. भटकंती आणि अभ्यासाच्या निमित्ताने डेनिस जेव्हा या दऱ्या खोऱ्यात भटकत होते, तेव्हा त्यांनी हे लिव्हिंग रुट ब्रिज पाहिले. आपल्याकडच्या कोकणातल्या साकवाची आठवण करून देणारा हा प्रकार. नाले, ओहळ, ओढे ओलांडण्यासाठी गावकऱ्यांनी तयार केलेली रचना. वडाच्या कुळातील झाडाच्या मुळ्या आपणास हव्या त्या रचनेत गुंतवल्या जातात. नैसर्गिकदृष्टय़ा मग ही मुळं त्यांना दिलेल्या दिशेने वाढत जातात. पूल पूर्णपणे तयार होण्यासाठी आणि मजबुतीसाठी किमान तीस-चाळीस वर्षे तरी सहज लागतात. डेनिसना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी स्थानिकांच्या मदतीने यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आजवर तब्बल ३५ पुलांच्या नोंदी झाल्या आहेत. डेनिसनी केवळ नोंदीच केल्या नाहीत, तर याचे महत्त्व मेघालय सरकारला पटवून दिले. तोपर्यंत मेघालय सरकारच्या कोणत्याही माहितीपत्रकात, पर्यटनाच्या जाहिरातीत लिव्हिंग रुट ब्रिजचा उल्लेख नसायचा. पण डेनिस यांच्या प्रयत्नाने लिव्हिंग रुट ब्रिजमेघालयाच्या पर्यटन नकाशावर आले. आज मेघालय सरकार चेरापुंजीचा उल्लेख या ब्रिजशिवाय करतच नाही.

असं म्हणतात की जो ब्रिज तयार करायला सुरुवात करतो त्याच्या आयुष्यात तरी तो ब्रिज पूर्ण होत नाही. कारण हा ब्रिज नैसर्गिकरीत्या पूर्ण होण्यास लागणारा कालावधी. वर्षांनुवर्षांच्या या नैसर्गिक जोडणीतून हे पूल अगदी मजबूत होतात. काही ब्रिज तर चक्क डब्बल डेकर असतात. चाळीस-पन्नास माणसांचे वजन अगदी सहज पेलू शकतील अशी यांची क्षमता असते.
डेनिस नंतर चेरापुंजीतच स्थायिक झाले. स्थानिक खासी जमातीच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं. गेली अनेक र्वष ते या भागात पर्यटनाच्या विविध योजना तर राबवत आहेतच, पण गावकऱ्यांसाठी अनेक उपक्रम करत असतात. त्यासाठी एक संस्थादेखील स्थापण्यात आली आहे. गावातील मुलांचे कलागुण ओळखून त्यांनी या मुलांचा एक रॉक बॅण्ड तयार केला आहे. त्यामुळेच ही मुले आता कॉन्सर्टमध्येदेखील भाग घेऊ लागली आहेत.

लिव्हिंग रुटच्या भटकंतीला जोडूनच आपण चेरापुंजी येथे असणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा धबधबा पाहू शकतो. तसेच मेघालयातील चुनखडी पासून तयार झालेल्या नैसर्गिक गुहांच्या अंतरंगात डोकावू शकतो. नैसर्गिक अशा शेकडो गुहा येथे आजही अस्पर्शित आहेत. मेघालय सरकारने मोसमयी गुहेत सर्वसामान्यांना भटकता येईल अशा सुविधा दिल्या आहेत. शिलाँगला तर पूर्वेचे स्कॉटलंड म्हटले जाते. सर्वाधिक पावसाचे ठिकाण यापलीकडे जाणारी ही लिव्हिंग रुटचे आद्यस्थान ही चेरापुंजीची ओळख आज तेथील संपूर्ण पर्यटनाला वेगळं वळण देणारी ठरली आहे. केव्हा जाल : जून ते सप्टेंबर हा अतिपावसाचा काळ सोडून. या काळात येथे प्रचंड धुके असल्यामुळे भटकण्यावर मर्यादा येतात. कसे जाल : मुंबई-गुवाहाटी रेल्वे अथवा विमानाने. गुवाहाटी शिलाँग चेरापुंजी रस्त्याने.

आत्माराम परब 

Sunday, March 27, 2016

रण ऑफ कच्छ




गुजरात राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात प्रयोग सुरू केल्यानंतर कच्छच्या वाळवंटात पर्यटकांचे लोंढे येऊ लागले. मात्र याच कच्छच्या रणात त्याही आधीपासून एका निसर्गवेडय़ाने अनेकांना भटकवायला सुरुवात केली होती. जुगल तिवारी त्याचं नाव. मूळचा राजस्थानचा. बीएनएचएसने नॅचरलिस्ट म्हणून त्याला येथे नेमलं. आठएक वर्षे येथे काम केल्यावर त्याच्या लक्षात आलं, येथे खूप काही करण्यासारखे आहे. मग तो मोटी विराणीला स्थायिक झाला. गावासाठी काहीतरी करायचं त्याच्या डोक्यात होतं. परिसरातील वन्यजीवनचा अभ्यास केला. या भागात येणाऱ्या वन्यजीव प्रेमींना त्याने भटकवायची सुरुवात केली. चारी धांड, लायलरी रिव्हर बेड अशा आडवाटेवरच्या ठिकाणांना तो घेऊन जाऊ लागला.

चारी धांड (धांड म्हणजे पाणी) तलावाच्या आसपास हजारोंच्या संख्येने येणारे कॉमन क्रेन्स हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होऊ लागले. ४० ते ६० हजारांच्या घरात येणारे हे अडीच तीन फूट उंचीचे पक्षी दिवसभर जमिनीवर चोचीने टकटक करत असतात. पाऊस आल्यावर उगवणारे हिरवे कोंब. चोच खुपसून या कोंबातून बी बाहेर काढायचं आणि ते फोडून त्यातील दाणा खायचं काम ते करतात. दिवसाला २५० ग्रॅम दाणे त्यांना लागतात. उरलेला कचरा तेथे येणारे लार्क पक्षी फस्त करतात. त्यांच्यामुळे जमीन चारपाच इंच खोल खणली जाते, नैसर्गिरीत्या नांगरली जाते. सुपीक होते. पुढच्या वर्षी पुन्हा कोंब येतात. येथे एक अनोखी जीवनसाखळीच तयार झाली आहे. गोडय़ा पाण्यावरील अनेक प्रकारचे वेडर्स आणि शिकारी पक्षी येतात. हे सारं चारी धांडवर पाहता येतं.

चारी धांड जवळच्याच फुले या गावी ग्रे हायपोकेलिस पक्ष्यांची भारतातील एकमेव जोडी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येते. येथून जवळच आठ किलोमीटर्सवर लायलरी रिव्हर बेड आहे. हा डेड रिव्हर बेड आहे. त्यातील व्होल्कॅनिक फॉर्मेशन पाहण्यासारखे आहे. विविधरंगी आणि आकाराचे नमुने पाहता येतात. अगदी दिवसभर आरामात येथे भटकता येते.


सरकारी रणोत्सवात हे काहीच नसते. प्रसिद्ध वाईल्डलाइफ डेस्टिनेशनवर खंडीभर पर्यटक येत असतात. येथे मात्र फक्त आपणच असतो. तेदेखील जुगलमुळे. याच भटकंतीत कच्छचे प्रसिद्ध व्हाईट रणपाहता येते. कोणे एकेकाळी येथे समुद्र होता, तो भूगर्भात खेचला गेला. दरवर्षी पाऊस पडून गेल्यावर सुकल्यानंतर हजारो किलोमीटरचा केवळ मिठाचा पांढरा पट्टा येथे दिसतो. हे सारं आवर्जून पाहावं अस आहे, आणि गेल्या काही वर्षांत हे पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत असते. परतीच्या प्रवासात मानवाच्या आदिम पाऊलखुणांचे भुजपासून ३०० किलोमीटरवर असणारे धोलावीरा पाहता येते. केव्हा जाल : नोव्हेंबर ते मार्च. हे सर्व पाहण्यासाठी साधारण चार दिवस पुरतात. प्रवासाचा कालावधी वेगळा. कसे जाल : रेल्वेने किंवा विमानाने भुजपर्यंत. मोटी विराणी भुजपासून ४५ किलोमीटर्सवर आहे. आत्माराम परब 

Saturday, March 26, 2016

ममी ऑफ माँक





इजिप्तचे पिरॅमिड हे जगातल्या प्रत्येक पर्यटकाच्या हमखास अजेंडय़ावर असणारे ठिकाण. पिरॅमिडमधील ममी, तेथील संपत्ती आणि बांधकाम वगैरे आकर्षणाच्या गोष्टी. भारतात असं उदाहरण नसले तरी आपल्याकडेही एक ममी आहे. स्पिती व्हॅलीमध्ये. तब्बल ५५० वर्ष जुनी. नैसर्गिकरीत्या संरक्षित अशी ही ममी स्पिती व्हॅलीतल्या गेवू गावात इंडो-तिबेटियन पोलिसांच्या खणनकामादरम्यान १९७५ मध्ये सापडली. सिमल्यापासून सुमारे २७० किलोमीटरवर असणाऱ्या या गावाला तेंव्हापासून वेगळी ओळख मिळाली. स्थानिकांच्या दाव्यानुसार ही ममी पंधराव्या शतकातील टेनझिन नामक माँकची आहे. अर्थात त्याला सध्या तरी कोणताही ठोस पुरावा नसला तरी ही ममी ५५० वर्षे जुनी असल्याचे मात्र सिद्ध झाले आहे.

तेव्हापासून पर्यटनाच्या नकाशावर गेवूचे नाव दिसू लागले. मध्यंतरी ही ममी चोरून नेली जात असताना, पुन्हा गेवूमध्ये आणण्यात यश आले. सध्या ही ममी एका खोलीत काचेच्या पेटीत बंदिस्त आहे. त्या खोलीत कोणासही प्रवेश नाही. मात्र बाहेरून छायाचित्र घेता येते. ममीच्या जतनासाठी वापरलेल्या तंत्राचा उलगडा झाला नसला तरी आजही ममीच्या चेहऱ्यावर अनोखे तेज जाणवते.

स्पिती व्हॅलीच्या पर्यटनाला चालना देणारी ही घटना म्हणून याची नोंद घ्यावी लागेल. ममीच्या निमित्ताने किन्नोर आणि स्पिती व्हॅलीची भटकंती आपण करू शकतो. हिरवागार निसर्ग, देवदार वृक्षांच्या सावलीतला प्रवास किन्नोरमध्ये घडतो तर स्पितीमध्ये लडाखचा फिल येतो. लडाख लिटिल तिबेट म्हणून ओळखले जाते, तर स्पिती लिटिल लडाख म्हणून. सिमला सोडलं की सरहान येथील अतिउंचावरचे डोंगरावरील भीमकाली पुरातन मंदिर, सांगला आणि चितकुल व्हॅलीचा मोहक निसर्ग, तर त्यापुढे कल्पा येथे वर्ल्ड फेमस किन्नोरी अ‍ॅपलचा आस्वाद असा प्रवास आहे.

नाको येथे स्पिती व्हॅलीत प्रवेश करायचा आणि ताबो मोनास्ट्री, धनकर मोनास्ट्री पाहत गेवूमध्ये पोहचायचे. माँकची ममी पाहून जिल्ह्य़ाचे हिवाळी मुख्यालय असणाऱ्या काझा येथे मुक्काम करायचा. काझा येथे पर्यटकांसाठी अनेक सोयी सुविधा आहेत. येथून जवळच असणारे किब्बर व्हिलेज हे आवर्जून भेट द्यायचे ठिकाण. जगात सर्वात उंचावर म्हणजेच १३६०० फुटावर वसलेले किब्बर व्हिलेज हे केवळ ३६६ लोकवस्तीचं छोटं टुमदार गाव. येथे शाळा. पोस्ट ऑफिसदेखील आहे.

पूर्वी स्पिती व्हॅलीत ट्रेकर्सचा राबता असायचा. पण ममी ऑफ माँकमुळे गेल्या सात-आठ वर्षांत पर्यटकांची गर्दीदेखील दिसते. काझावरून चंद्रताल लेकचा सोप्पा ट्रेक करता येतो किंवा परत मागेही फिरता येते. तर येथूनच पुढे कूंझम पास, रोहतांगमार्गे मनालीलाही जाता येते. त्यासाठी जून ते ऑक्टोबर हा योग्य कालावधी आहे. केव्हा जाल : स्पिती व्हॅलीत वर्षभरात केव्हाही जाऊ शकता. पण जून ते ऑक्टोबर हा सर्वाधिक योग्य कालावधी आहे. कसे जाल : चंदिगड सिमला काझा रोहतांग मनाली अशी साधारण दहा दिवसांची टूर करता येते. आत्माराम परब


Friday, March 25, 2016

सांगेत्सर लेक




निसर्गातला एखाद्या घटनेने मनमोहक रचना निर्माण होते. नेहमीच्या पर्यटनात अशा ठिकाणांची फारशी चर्चा नसते; पण त्या ठिकाणच्या एखाद्या कृतीने त्या विवक्षित ठिकाणाला पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळते. असेच काहीसे सांगेत्सर लेकबद्दल म्हणता येईल.

तवांग आणि परिसरात सुमारे १०० हून अधिक तळी आहेत; पण हा सांगेत्सर लेक काही नैसर्गिक नाही. १९५० साली भूकंपात डोंगराचा अख्खा कडा व्हॅलीत कोसळला. व्हॅली मुळातच पसरट असल्यामुळे कडय़ाच्या या भागाच्या अलीकडे पाणी साचत गेले. मध्ये असणारी झाडे पर्णरहित झाली, बुंधे शाबूत राहिले. कालांतराने तेदेखील नष्ट होतील. व्हॅलीच्या पसरटपणामुळे या तलावाची खोली आठ-दहा फुटांपेक्षा अधिक नाही. जी काही खोली आहे ती फक्त मधल्या भागात. दोन्ही बाजूंनी डोंगर आणि दरीत हा निसर्गरम्य असा तलाव. काही वर्षांपर्यंत पर्यटकांच्या फारसा परिचयाचा नव्हता. माधुरी दीक्षितच्या कोयलाचित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण येथे झाले. तेव्हा सांगेत्सर लेकला  माधुरी लेकम्हणून नवीनच ओळख मिळाली.

मात्र येथे राहण्याची कसलीही सोय नाही. तुम्हाला कॅम्पिंग करायचे असेल तर करू शकता. मात्र येथे पोहोचेपर्यंत बरेच प्रयास करावे लागतात. तवांग ते सांगेत्सर या वाटेवर १६ हजार ५०० फुटांवरचा बूमला पास पार करावा लागतो. येथे असणाऱ्या आर्मीच्या कॅम्पने एका रस्त्याचे नाव शिवाजी पथ ठेवले आहे. तशी पाटीच आहे येथे. इंडो-चायना सीमेवर होणाऱ्या फ्लॅग मीटिंग बूमला पासपासून साधारण ११ किलोमीटरवर होतात. विशेष परवानगी काढून येथे जाता येते. तवांग येथील सैन्यदलाच्या कार्यालयात तशी परवानगीदेखील मिळते. प्रत्यक्ष मीटिंगच्या काळात तेथे जाता येत नाही.

अरुणाचलच्या पर्यटनात तवांगला मुक्काम करून सांगेत्सर पाहता येते. तवांगला हॉटेल्स सुविधा प्राथमिकच आहेत, पण अरुणाचलचा संपूर्ण प्रवास हा सिनिक म्हणावा असा आहे. या रस्त्याने प्रवास करणे जरा परिश्रमाचेच आहे, पण अशी निसर्गलेणी पाहायची असतील थोडे परिश्रम करायला हरकत नाही. दलाई लामा तिबेटमधून भारतात आले ते तवांगमार्गेच. येथेच भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोनास्ट्रीदेखील आहे. अरुणाचलमध्ये असताना भारतीय प्रमाणवेळेनुसार व्यवहारांची सवय असल्यामुळे दिवस लवकर उगवत असला तरी कामकाज उशिरा सुरू होते आणि संध्याकाळी अंधार पडण्याच्या वेळी कामकाज बंद होताना घडय़ाळातला दिवस बराच शिल्लक असतो.


या भागात पर्यटनाचा विकास करण्याची गरज खूप आहे. त्यातूनच या भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणता येईल. आज वर्षांला फार फार तर ३५-४० हजार पर्यटक येथे येतात. अरुणाचलमध्ये फिरण्यासाठी इनर लाइन परमिटची आवश्यकता असते. ही परवानगी मिळवणे काही अतिकठीण काम नाही. तवांगबरोबरच अरुणाचल पक्षिनिरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. इगलनेस्ट राष्ट्रीय उद्यान, पाक्के अभयारण्य ही आवर्जून भेट द्यावी अशी काही ठिकाणे आहेत. उत्तर पूर्वेकडील राज्यांच्या पर्यटनाला जोडूनच अरुणाचलची भटकंती करावी. केव्हा जाल : फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत. फेब्रुवारी-मार्चपर्यंत तळी गोठलेली असतात. एप्रिल-मेमध्ये मात्र पाण्याची मजा औरच असते. पाण्याच्या विवक्षित अशा नैसर्गिक रंगाचा आनंद अनुभवता येतो. या काळात सूर्य अधिक काळ असतो. तरीदेखील तवांगचे तापमान पंधरा डिग्रीच्या वर जात नाही. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर या काळातदेखील जाता येते; पण हिवाळ्यात वाटेतील पासेस (खिंडी) बंद होण्याची शक्यता अधिक, तसेच तापमान शून्याच्या खाली जाते. कसे जाल : गुवाहाटीमार्गे भालूकपाँग, बोमदीला, दिरांग आणि तवांग. तवांगच्या आधी साडेतेरा हजार फुटांवरील सेला पास पार करावा लागतो. अरुणाचलमध्ये जाण्यासाठीचे इनर लाइन परमिट गुवाहाटी किंवा भालूकपांगच्या बॉर्डरवर मिळते. 

Wednesday, January 13, 2016

भटकंती टिपताना..


छायाचित्रण हा हल्ली पर्यटनाचा अविभाज्य घटकच झाला आहे. कधी कधी तर पर्यटन कमी आणि छायाचित्रण अधिक असं चित्र दिसून येतं. पण बहुतांश वेळा आपण आपल्या कॅमेऱ्याचा संपूर्ण आणि योग्य वापर करतो का? याचं उत्तर सध्या तरी नकारात्मकतेकडे झुकणारं आहे.

डिजिटल युगात छायाचित्रण तुलनेनं सोपं झालं असलं तरी मूलभूत गोष्टी त्याच आहेत हे पुन्हा अधोरेखित करावसं वाटतं. कॅमेरा किती महागडा अथवा आधुनिक यापेक्षा तुम्ही फ्रेम कशी निवडता, प्रकाश कसा आहे आणि तुमचा हात किती स्थिर आहे यावरच छायाचित्राचा दर्जा दिसून येतो हे लक्षात घ्यायला हवे. दुसरा मुद्दा आहे तो वापराचा. मुळात तुम्हाला कॅमेरा कशासाठी हवा आहे? व्यावसायिक छायाचित्रणासाठी की हौस म्हणून. हौस म्हणूनच हवा असेल तर आज बाजारात कॉम्पॅक्ट कॅमेरे (पाइंट टू शूट) अनेकविध सुविधांसहित परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. डिजिटल एसएलआर कॅमेरादेखील अनेकांना परवडत असला तरी त्याचा पूर्ण वापर करण्यासाठी तुम्हाला भविष्यात अनेक लेन्सेस, फिल्टर्सची आवशक्यता असते. त्यामुळे सर्वसामान्य हौशी पर्यटकांसाठी कॉम्पॅक्ट कॅमेरा हा पर्याय सध्या तरी योग्य म्हणावा लागेल.

बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक ब्रॅण्डच्या कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यांमध्ये बहुतांश अनेक मोड उपलब्ध असतात. एसएलआरशी तुलना केल्यास त्या तडजोडी वाटतील, पण हौशी आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठी या सुविधा पर्याप्त आहेत. या सुविधांबरोबरच तांत्रिक बाबींचा वापर करून कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यानेदेखील अनेक प्रयोग करता येतात. पण त्यासाठी किमान एखादा क्रॅश कोर्स करावा लागेल आणि भटकंतीदरम्यान उपलब्ध वेळेत प्रत्येकालाच या तांत्रिक बाबी वापरता येतीलच असे नाही. त्यासाठी ऑटो मोड किंवा प्रसंगानुरूप मोड वापरावे. प्रवासात वजन कमी असावे म्हणून आपण कमी वजनाच्या कॅमेऱ्याची निवड करतो. पण कॅमेरा जितका वजनाने हलका तितकाच हात हलण्याचे प्रमाण अधिक असते हे लक्षात ठेवावे. म्हणून वजनदार कॅमेरा घेऊन तो हाताला पेलवणार नाही असेदेखील होऊ देऊ नका. पेलवेल असाच कॅमेरा घ्या. तसेच चालता चालता एखादं दृश्य दिसल्यावर लगेचच कॅमेरा सरसावणे योग्य नाही. खरे तर त्यावेळी आपलं शरीर स्थिर होण्यास थोडासा वेळ देण्याची गरज असते. तो वेळ दिला नाही तर आपला हात स्थिर राहत नाही. तसेच एखाद्या दृश्याचे छायाचित्र मिळवण्याच्या आंनदाबरोबरच ते दृश्य उघडय़ा डोळ्यांनी अनुभवण्याचा आनंद घ्या. नाही तर एकापाठोपाठ एक छायाचित्र काढताना मूळ दृश्य पाहणंच विसरून जाल. पुढे जाऊन छायाचित्रण शिकायचंय म्हणून डीएसएलआरच घ्यायचा असेल तर शक्यतो सुरुवातीला प्राथमिक डीएसएलआर घ्यावा. लेन्सची निवड करताना वाईड टू झूम अशा १८-१३५, १८-२००/२५० अशा लेन्स घ्याव्यात. एखादा प्राथमिक अभ्यासक्रम करावा. आपला कॅमेरा चांगला असेल आणि तो वापराचे शिक्षणच नसेल तर काहीच उपयोग नाही. कॉम्पॅक्ट कॅमेरा घेणाऱ्यांनीदेखील कॅमेऱ्याचे युजर मॅन्युअल पूर्णपणे वाचून आपला कॅमेरा समजून घ्यावा; अन्यथा काही नावीन्यपूर्ण मोड केवळ माहीत नसल्यामुळे एखादी चांगली फ्रेम गमवावी लागेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे छायाचित्रण जमतंय असं वाटल्यावर त्यावरच समाधान मानून थांबू नका. फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियासारख्या संस्थांचे सभासद व्हावे. तेथे असणाऱ्या कार्यशाळा, स्पर्धा, सादरीकरण यांचा लाभ घ्यावा आणि यातून मिळणारं ज्ञान आपल्या फ्रेममध्ये उतरवत जावे.

मेगा पिक्सेलचं महत्त्व किती?
सर्वाधिक मेगा पिक्सेल म्हणजे खूप चांगला कॅमेरा अशी आपली समजूत आहे. पण ती फसवी आहे. अधिकाधिक मेगा पिक्सेलची गरज असते ती जाहिरात फलकांसाठी, मोठय़ा आकारातील छायाचित्रांच्या प्रदर्शनासाठी. हौशी छायाचित्रकरांसाठी १२ मेगा पिक्सेलचा कॅमेरा पुरेसा असतो. कॅमेरा घेताना मेगा पिक्सेलपेक्षा अधिक महत्त्व आहे ते झूमला. त्यातही ऑप्टिकल झूम महत्त्वाचं. डिजिटल झूम हा फसवा शब्द आहे.

हे लक्षात ठेवा:
भटकंतीदरम्यान कॅमेऱ्याचा झूम पूर्णपणे वापरण्याचा मोह टाळावा. आपल्या कॅमेऱ्याची क्षमता जरी असली तरी तुमचा हात त्या झूमला स्थिर राहण्याची खात्री नसते. त्यासाठी ट्रायपॉडची गरज भासते. ट्रायपॉडवरून क्लिक करतानादेखील बारीकसा धक्का छायाचित्र बिघडवू शकतो. त्यामुळे रिमोटदेखील गरजेचा असतो. म्हणूनच झूमची सुविधा पूर्ण क्षमतेने वापरण्यापेक्षा, ज्या मर्यादेपर्यंत हात स्थिर राहील इतपतच वापरून शक्यतो वाइड अँगलमध्ये छायाचित्रण करावे. प्राणी, पक्षी, हिमशिखरे, दूरवरच्या ठिकाणांचे, क्लोजअप न घेता फ्रेममध्ये चारी बाजूने जागा सोडावी; जेणेकरून ऑब्जेक्ट स्थिर राहते. नंतर अनावश्यक जागा क्रॉप करता येते. पूर्ण झूम करून चलचित्रण करणे पूर्णत: टाळावे. तेथेदेखील वाइड अँगल वापरावा.

कॅमेऱ्याची काळजी:

पर्यटनादरम्यान कॅमेऱ्याला धूळ, धूर, धुकं, पाऊस, वारा अशा अनेक घटकांपासून सांभाळणे महत्त्वाचे असते. लेन्सेसवर जर धुळीचे कण बसले तर त्या आतबाहेर होताना संपूर्ण सर्किटलाच धोका निर्माण होऊ शकतो. कॅमेरा कायमच स्वतंत्र बॅगमध्ये असावा. बाजारात कॅमेरा क्लििनग किट माफक किमतीत उपलब्ध असते, ते सदैव जवळ बाळगावे. लेन्स कॅप उघडून पटापट फोटो काढाण्याची सवय लावू नये. त्याआधी प्रवासात लेन्सवर काही डाग पडले आहेत का ते तपासावे. किटमधील साहित्य वापरून लेन्सचा पृष्ठभाग पुसून घ्यावा. कॅमेऱ्याच्या बॅटरीजचा (रिचार्जेबल अथवा लिथिअम) एक अधिकचा जोड बरोबर ठेवावा. फोटो काढल्या काढल्या त्याचा प्रिव्ह्य़ू सर्वाना दाखवण्याचा मोह टाळावा. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची बचत होईल. नॉदर्न लाइटसारख्या दुर्मीळ सफरीवर जाताना, शक्य असेल तर किमान सुविधा असलेला आणखी एक कॅमेरा सोबत बाळगावा. प्रवासात पहिला कॅमेरा हरवला, काही बिघाड झाला तर इतके पैसे खर्च करून गेलेल्या सफरीतील दुर्मीळ दृश्य प्रतिमा हातातून निसटून जातील. atmparab2004@yahoo.com

LinkWithin

Related Posts with Thumbnails