would like to thank you, for taking time to visit my blog

Sunday, April 3, 2016

वायटोमो केव्हज् – न्यूझीलंडसृष्टीचक्रात ज्या असंख्य घडामोडी होत असतात त्यातून कित्येक वेळा काही अद्भुत गोष्टी घडतात. असंच अद्भुत घडलंय ते न्यूझीलंडच्या उत्तरेला वायटोमा केव्हज्मध्ये. मावोरी ही या भागातील स्थानिक भाषा. वाय म्हणजे पाणी आणि टोमो म्हणजे सिंक होल. जमिनीखाली असलेल्या गुहांमधील पाणी आणि वैशिष्टय़पूर्ण अशा लाइम स्टोनच्या वर्षांनुवर्षांच्या प्रक्रियेतून वायटोमा केव्हज् चमकत असतात. लाइमस्टोनमध्ये असणाऱ्या ग्लोइंग वर्ममुळे ही जागा ग्लोइंग केव्हज म्हणून ओळखली जाते.

१८८९ मध्ये टेन टिनोरु आणि त्याची पत्नी घुटी यांनी या गुहांचा शोध घेतला. पर्यटकांना तिकडे घेऊन जायला सुरुवात केली. एकंदरीतच या जागेचे भौगोलिक महत्त्व पाहिल्यावर न्यूझीलंड सरकारने १९०६ मध्ये त्या स्वत:च्या ताब्यात घेतल्या. संरक्षित केल्या, संवर्धित केल्या आणि पर्यटनाला चालना दिली.

या गुहांमध्ये जाण्यासाठी खास होडय़ांची व्यवस्था केलेली असते. ठरावीक अंतर आतमध्ये गेला की सर्व लाइटस बंद केले जातात. आणि आपल्या तीनही बाजूंनी असंख्य काजवे चकाकू लागतात. एका वेगळ्या जगात असल्याचा आनंद देणारं एक निसर्गाचं अद्भुत आपण स्तिमित होऊन पाहत राहतो. ते सारं दृश्य केवळ अवर्णनीय असेच म्हणावे लागेल. शंभर टक्के शुद्धही न्यूझीलंडच्या पर्यटनाची टॅगलाइन सार्थ ठरवणारं असे हे ठिकाण आहे.

अर्थातच तेथील शासनाने पर्यटन विकासासाठी मोठय़ा खुबीने गुहांचा वापर केला आहे. या गुहांतील गूढ अशा अंतर्गत रचनेचा वापर करून येथे साहसी पर्यटनाच्या काही सुविधा तयार केल्या आहेत. छताला असलेल्या दोराला लटकतदेखील या गुहेतील प्रवास तुम्ही करू शकता. थेट काजव्यांच्या बाजूने होणारा हा प्रवास अत्यंत रोमांचक असाच म्हणावा लागेल. तसेच पाण्यावरील इतर साहसी पर्यटनाच्या सुविधा येथे आहेत. गुहेच्या आत कॅमेरा फ्लॅश वापरायची परवानगी नाही. तुमची होडीदेखील एका विशिष्ट दोराला बांधलेली असते. त्यामुळे तुम्ही उगाच भरकटत नाही.

वायटोमा केव्हजपासून जवळच पुईया हे गावदेखील असेच निसर्गाच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या संपूर्ण गावात गरम पाण्याचे फवारेच्या फवारे उसळत असतात. ते अद्भुत पाहण्यासाठी पुईयाला नक्कीच जावे.

न्यूझीलंडचे आपल्यापासूनचे अंतर आणि त्यामुळे होणारा विमान प्रवासाचा खर्च पाहता, केवळ यासाठीच येथे येणे परवडत नाही. आठदहा दिवसांची न्यूझीलंडची टूर करावी. दक्षिण न्यूझीलंडमध्ये तर आणखीनच धम्माल ठिकाणं पाहायला मिळतात. क्विन्स टाऊन या ठिकाणी मुक्काम करून अनेक ठिकाणांना जाणे शक्य आहे. क्विन्स टाऊन जवळच काही ग्लेशिअर्स आहेत. आपल्याकडच्या हिमालयीन ग्लेशिअर्सच्या तुलनेत अगदीच छोटी. पण या ग्लेशिअर्ससाठी हेलिकॉप्टर्स टूर असते. चाळीस ते पन्नास हेलिकॉप्टर दिवसभरात या ग्लेशिअर्सवर उतरतात. क्विन्स टाऊन ते मिडफर्ड साउंड हा प्रवास जरूर करावा. तीनही बाजूंनी मोठय़ा काचा असणाऱ्या आणि खुच्र्याची उतरती रचना असणाऱ्या बसने १८० अंशातील नजारा पाहत होणारा प्रवास हा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे.

केव्हा जाल : आपला उन्हाळा हा त्यांचा हिवाळा आणि आपला हिवाळा त्यांचा उन्हाळा असतो. त्यामुळे ऑक्टोबर ते एप्रिल हा येथे जाण्यासाठीचा योग्य कालवधी आहे. कसे जाल : थेट विमानसेवा


आत्माराम परब 

Saturday, April 2, 2016

ताक्सांग मोनास्ट्रीएखादी वास्तू अथवा नैसर्गिक भौगोलिक रचना ही त्या देशाची ओळख बनून राहते. त्या वास्तूचा इतिहास, तिचं पावित्र्य, देशवासीयांनी केलेली जपणूक अशा सर्वामुळे तिला एक वलय प्राप्त झालेलं असते. ती वास्तू त्या देशाची प्रतिमा बनून गेलेली असते. भूतानमधील ताक्संग मोनास्ट्रीचं स्थान असंच आहे. अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या भूतानमधले ताक्संग म्हणजे मानाचे ठिकाण. भूतानची ९० टक्के लोकसंख्या ही बौद्ध आहे. स्थानिकांची या वास्तूवर प्रचंड श्रद्धा आहे. आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाकडे गेल्या काही वर्षांत पर्यटकाचा ओघ वाढला आहे. मात्र येथे पोहोचायचे असेल तर बऱ्यापैकी परिश्रम करावे लागतात.

ताक्संग म्हणजे वाघाचे अर्थात टायगरचे वास्तव. एका कडय़ावर वसलेली ही मोनास्ट्री. येथे पोहोचायचे असेल तर किमान सहासात तास चालत जावे लागते. अगदी थोडय़ा अंतरापर्यंत घोडय़ांची सुविधा आहे. पण तीदेखील मर्यादितच आहे. चढउतार आहेत, पण तुलनेने सहज पार करता येण्यासारखं अंतर आहे. वातावरण खूपच आल्हाददायक असल्यामुळे येथे थकवा फारसा येत नाही. आणि आपली ऊर्जा टिकून राहते. महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे वैष्णवदेवीची यात्रा ही जशी पूर्णपणे कमर्शिअल झाली आहे. तसे येथे नाही. येथे येण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, असं भूतान नरेशांचेदेखील ठाम मत आहे. त्यामुळे ते स्वत:देखील चालतच येतात.

अर्थातच हे सारं करण्यासाठी मानसिक आणि मग शारीरिक तयारी हवी. तरच हे शक्य होईल. हजारपैकी केवळ दोनएकशेच पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. पण ताक्संग पाहिलं नाही तर भूतान पाहिलं नाही असं म्हणावं लागेल अशी जागा आहे. त्यामुळे जरा सायास करून जायला हरकत नाही.

या परिसरात पर्यटकांना राहण्याची परवानगी नाही. त्यामुळे परत यावेच लागते. बौद्ध भिख्खू आणि अभ्यासकांसाठी काही सुविधा आहेत. पण त्यासाठी परवानगी काढावी लागते. मोनास्ट्रीच्या आतमध्ये छायाचित्रणाला परवानगी नाही. संपूर्ण मोनास्ट्रीत बुद्ध आणि इतर मूर्ती आहेत. अर्थातच त्या मूर्ती म्हणजे चित्र आणि शिल्पाच्या माध्यमातून सांगितलेल्या कथाच आहेत. मोनास्ट्रीच्या आतमध्ये टायगर नेस्ट आहे. एका बौद्ध भिख्खूने येथे केलेली तपश्चर्येची छोटीशी खोली. ही व्यवस्थित जपून ठेवण्यात आली आहे. मोनास्ट्री दाखवण्यासाठी पारंपरिक मार्गदर्शक असतो. ही जागा फार काही मोठी नाही. फार फार तर दोनशे तीनशे लोकांना सामावून घेईल इतकीच. मोनास्ट्रीजवळ खाण्यापिण्याची कसलीही सोय नाही. वाटेत एक हॉटेल आहे. पण ते खूपच महाग असल्यामुळे सारं काही आपल्यासोबत घेऊन जावे. नमकिन चहा म्हणावा असा गुरुगुर हा भूतानचा पारंपरिक चहा येथे मोफत मिळतो.

केव्हा जाल : सर्वोत्तम कालखंड- मार्च ते जून कसे जाल : थेट पारोला विमानाने भारतात पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावरून फुन्श्तोलिंगला भूतानमध्ये प्रवेश.

आत्माराम परब 
Related Posts with Thumbnails