निशांत सरवणकर
काही वर्षांपूर्वी बर्फ पाहण्यासाठी मनालीला गेलो होतो. नोव्हेंबरचा काळ होता. मनालीपासून साधारणत: ५० किलोमीटरवर असणाऱ्या रोहतांग पासच्या अगदी टोकाशी (१३,४०० फूट) पोहोचलो होतो. मात्र बर्फ कुठेच सापडला नाही. घोडेस्वारी करून साधारणत: दोन किमीचे अंतर कापल्यानंतर बर्फाचे दर्शन झाले. थोडा वेळ खेळलो. परंतु त्याने समाधान झालेच नाही.
लेह-लडाख पाहण्याची संधी चालून आली तेव्हा बर्फ पाहायला मिळेल ना, एवढीच अपेक्षा होती. परंतु लडाखचे पर्यटन करणे हे त्याही पलीकडचे असल्याचे अनुभवायला मिळाले. लडाखच्या फिवरमधून मी अजून बाहेरच पडलेलो नाही. आयुष्यातला सर्वांगसुंदर असा निसर्गाच्या चमत्काराचा ‘आँखो देखाँ हाल’ मी पाहिला आणि थक्कच झालो. बर्फ तर इतका की पाहून डोळ्याचे पारणे फिटले. मी, पत्नी आणि मुलीने एक सौंदर्यानुभव प्रत्यक्ष घेतला, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
श्रीनगरमार्गे द्रास-कारगिल, लेह, केलाँगमार्गे मनालीला जाण्याचा बेत इशा टूर कंपनीच्या आत्माराम परब यांनी आखला होता. या मार्गे गेल्यास हाय अॅल्टिटय़ूड सिकनेस वा कमी ऑक्सिझनचा त्रास होत नाही, असे सांगितले जात होते. सुरुवातीला मी एकटाच जाणार होतो. परंतु नंतर कुटुंबीयही तयार झाले. एका वेगळ्या मार्गाचा प्रवास सुरू झाला असल्याचे जेव्हा कारगिल सोडले तेव्हा लक्षात आले. (कारगिलपासून लडाख सुरू होते) भारत-पाकिस्तान युद्ध झाले नसते तर द्रास-कारगिल कोणाच्याच लक्षात आले नसते.
काश्मीरचा अनुभव घेणे म्हणजे सोनमर्ग वा गुलबर्ग इतकेच माहिती होते. परंतु निसर्गसुंदर सोनमर्ग सोडल्यानंतर अवघ्या तीन-चार किमीच्या अंतरावर झोझीला पास सुरू होतो आणि बर्फाच्छादित पर्वतांचे नितांतसुंदर दर्शन दृष्टिस पडते. बर्फापेक्षाही मन वेधून घेतो तो झोझीलाचा खडतर व अंगावर शहारे आणणारा प्रवास. एका टोकाला पोहचल्यानंतर काही ठराविक ठिकाणांवरून झोझीला टॉपकडे येणारी जीवघेणी एकापाठोपाठ एक अशी नऊ वळणे दिसतात आणि आपण या खडतर रस्त्यांवरून प्रवास केल्याची खात्री पटते. त्यामुळे यापूर्वी केलेला रोहतांग पासचा प्रवास त्यापुढे काहीच वाटत नाही. बोर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कौशल्य त्यातून पावलोपावली दिसत असते.
कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे वॉर मेमोरियल वाटेतच आढळते. तेथे एक जवान कारगिलच्या शौर्याची उत्स्फूर्तपणे माहिती देत असतो. जिथे आपण उभे असतो तेथे रक्ताची होळी कशी खेळली गेली वा टायगर हिल, तोलोलिंग, पॉइंट ४८७५ वा मश्को दरीत जवानांनी प्राणांची जी बाजी लावली त्याच्या कथा ऐकायला मिळतात. आता त्या ठिकाणी कायमस्वरूपी छावणी उभारण्यात आल्याचीही माहिती मिळते. पाकिस्तानच्या अनेक छावण्या आपण ताब्यात घेतल्याचे सांगताना त्या जवानाचा उर भरून आलेला असतो. द्रास-कारगिलमधील युध्दप्रसंगाला त्याने कसे तोंड दिले असेल, असा प्रश्न अस्वस्थ करून सोडतो.
कारगिल सोडले आणि लडाखच्या एका वेगळ्या सृष्टिसौंदर्याचा आम्हाला अनुभव येऊ लागला. पावलोपावली निसर्गाचा एक वेगळा चमत्कार कॅमेऱ्याने टिपत होतो. प्रोफेशनल फोटोग्राफर नसलो तरी आपसूकच नजाकत पाहून क्लिक केले जात होते. माझ्यासोबत माझा जुना मित्र आणि लोकसत्ताचा मेट्रो एडिटर विनायक परब हाही होता. त्याच्यासाठी ते काही नवीन नव्हते. चार-पाचवेळा प्रवास झालेला असल्याने कदाचित त्यामागील सौंदर्य तो चुपचापणे हाय रिसोल्यूशन कॅमेऱ्यात बंदिस्त करीत होता. मला लडाखच्या पर्वतराजींचे वैशिष्टय़ समजावून सांगत होता आणि त्याचा मी व कुटुंबीय प्रत्यक्ष साक्षीदार होतो. प्रदर्शनांतून लडाख पाहिले होते. तेव्हा फारसे काही वाटले नव्हते. रखरखीत, ओडक्याबोडक्या डोंगरांचे या फोटोग्राफर्सना आकर्षण का वाटते, असा प्रश्न मनात यायचा. परंतु प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसणारा नजारा तोच असला तरी त्याचे सौंदर्य जसा हटके होते. फोटोग्राफर्स वा निसर्गप्रेमींना लडाख का खुणावते याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. मनाली, सिमला वा नैनिताल वा निसर्गाने बहरलेल्या अन्य ठिकाणांपेक्षाही लडाखचा निसर्ग (रखरखीत पर्वतराजी) नितांतसुंदर आहे. प्रत्येक पर्वताचे एक आगळे वैशिष्टय़ आहे. नैसर्गिदृष्टय़ा तयार झालेले अनेक ‘अँगल्स’ आपल्याला मोहून टाकतात. खरोखरच प्रेमात पाडतात. एका आगळ्यावेगळ्या विश्वास घेऊन जातात. काश्मीरला भूतलावरचा स्वर्ग म्हटले जाते हे ठिक आहे. परंतु लडाख त्याही पेक्षा वेगळे आहे. असे सांगितले जाते की, कैक हजारो वर्षांंपूर्वी समुद्राला पोटात घेऊन भूगर्भातील आत्यंतिक हालचालींमुळे लडाखची निर्मिती झाली. ते काहीही असो पण लडाखचे वैशिष्टय़ हे की, तुम्ही वाटेत दिसणाऱ्या पर्वतराजांची एकमेकांशी सांगड घालून दाखविणे तुम्हाला जमणारच नाही. प्रत्येक डोंगर हा नैसर्गिकतेने वेगळी नजाकत घेऊन येतो आणि त्याच्या सौंदर्याकडे पाहत राहावेसे वाटते. रखरखीत डोंगरांना काय पाहायचे असा ज्यांना प्रश्न पडेल त्यांनी लडाखच्या वाटय़ाला जाऊच नये, हे खरे.
कारगिल ते लेह या मार्गावरील नमकीला, फोटुला पास ओलांडताना मून लँडचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. चंद्रावर जी माती आढळली त्याची छायाचित्रे नासाच्या वेबसाईटवर पाहिली होती. ती प्रत्यक्ष पाहत असल्याचा अनुभव घेतला. चंद्रावरील छायाचित्रात अनुभवलेले खाचखळगे प्रत्यक्ष पाहत होतो.
लेहमधून येणारी सिंधू आणि कारगीलमधील झंस्कार नदीच्या संगमाचे नयनमनोहर दृश्य खूपच रमणीय आहे. मॅग्नेटिक हिल आमच्या गाडय़ा खेचून घेत होत्या. जेथे प्रत्यक्षात गुरुनानकांचा स्पर्श झाला त्या नानक हिलला भेट देऊन प्रथमदर्शनी प्रेमात पाडणाऱ्या लेह शहरात येऊन पोहोचलो. मोबाईल फोनची रेंज या ठिकाणी मिळाली. तोपर्यंत कुणाशी संपर्क नव्हता. फक्त आगळ्यावेगळ्या निसर्गाशी नाते जोडले गेले होते. लेह शहर मला खूपच आवडले. तेथील तिबेट बाजार व त्या गल्ल्यांनी वेगळ्या जगात वावरत असल्याची अनूभूती मिळाली. हॉटेल बिजूच्या मालकाचे इशिकभाईचे खास आदरातिथ्य अद्यपही विसरू शकत नाही. पत्नीची तब्येत बिघडली तेव्हा डॉ. सय्यदने दिलेली योग्य औषधे या तशा अलिप्त भागातही मोलाची वाटतात. लेह शहर सोडावे असे वाटतच नव्हते.
लेहवरून दिक्सिट (नुब्रा व्हॅली) या आणखी एका दुर्गम गावी गेलो. जगातल्या सर्वांत उंचावरच्या (१८, ३६० फूट) खर्दुंगला पास या मोटरेबल रोडवर होतो. सर्वत्र बर्फाची चादर ओढली गेली होती आणि त्यात मी माझ्या कुटुंबीयांसह मार्गक्रमण करीत होतो. झोझीला पासमुळे आधीच डोळ्याचे पारणे फेडले होते. परंतु त्यापेक्षा वेगळा अनुभव या पासने दिला. हुंदरच्या शीत वाळवंटात उंटसवारी खासी होती. निसर्गाच्या पावलोपावली वेगवेगळ्या दर्शनाने मोहून निघालो होतो.
दिक्सिटहून परतताना सुरुवातील अन्सा व नंतर स्टॅमस्टिल या मॉनेस्टरीत गेलो. अन्सा मॉनेस्टरीपासून पाकिस्तानची हद्द फक्त ४८ किमीपर्यंत होती. या मॉनेस्टरीज् म्हणजे बौद्धकालिन मंदिरेच. मात्र त्यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांची विशिष्ट पद्धतीत केलेली उभारणी. या काळात हेमीस फेस्टिवलाचाही अनुभव घेतला. टिकसे मॉनेस्टरी असो वा लेह पॅलेस असो त्यावेळच्या कलात्मकतेचा वेगळा रंग चाखायला मिळाला. मॉनेस्टरी या सर्व सारख्याच असतात ना असा अनेक पयॅटकांना प्रश्न पडला होता. परंतु प्रत्येक मॉनेस्टरीचे एक वेगळे महत्त्व होते. त्याच्या कलात्मकतेचा आस्वाद घेणे महत्त्वाचे होते. शांती स्तूप, टिकसे मॉनेस्टरीच्या मैत्रेय बुद्धाचे दर्शन घेतल्याशिवाय लडाखचा दौरा पूर्ण होत नाही.
‘थ्री इडिएट’मध्ये पेगाँग लेकचे दर्शन घडते. आम्ही तो प्रत्यक्षात पाहायला निघालो होतो. माझी मुलगी तर हर्षोल्हासाने आनंदित झाली होती. १४,५०० फुटावरचा खाऱ्या पाण्याच लेक पाहणे हा वेगळाच निसर्गानुभव होता. कॅमेऱ्याचे क्लिक अनेक अँगल्सनी नुसते फडकत राहतात. पेगाँग लेकचे वैशिष्टय़ म्हणजे इंद्रधनुष्यातील रंगांचा तुम्हाला आस्वाद घेता येतो. अगदी तळ दिसणारे स्वच्छ पाणी आणि डोंगरदऱ्यातून चीनपर्यंत वाहणाऱ्या या लेकचा फक्त एक पंचमांशपेक्षा कमी भाग आपल्या हद्दीत आहे. संपूर्ण लष्कराच्या ताब्यात असलेल्या या लेकला भेट देण्यासाठी खास परवाना काढावा लागतो. याच वाटेत १७८०० फुटावरच्या जगातल्या तिसऱ्या क्रमांकावरचा मोटरेबल रोड (चांगला पास) लागतो. पाच-सहा दिवस कसे गेले हे कळलेच नाही. आता आमचा प्रवास केलाँगच्या दिशेने सुरू होणार होता. मनालीमार्गे आम्ही मुंबईला परतणार होतो. तेव्हा मन उदास झाले. निसर्गाच्या या चमत्कारातून बाहेर पडूच नये असे वाटत होते.
थांगलागला पास, नकिला पास, बार्छागला पास पार करीत आम्ही केलॉँगपर्यंत पोहोचलो खरे. परंतु वाटेत भूतलावरच्या स्वर्गाचा प्रत्यक्षानुभव घेता आला तो बार्छागला पासमध्ये. बर्फाच्छादित वाटेतून गाडी सरकत होती. वाटेत पगला नाला लागला. या नाल्याचे वैशिष्टय़ म्हणजे हा नाला कसाही वाहतो. एखादी गाडीही वाहून नेऊ शकतो इतका पाण्याला जोर असल्याचे दिसून येते. सर्चुच्या गर्द डोंगरराजीत पोहोचलो तेव्हा निसर्गाच्या एका वेगळ्या पट्टय़ात असल्याचा अनुभव आला. केलाँगवरून रोहतांगपर्यंत पोहोचलो आणि मानवनिर्मित ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो. तब्बल दहा-बारा तास त्यामुळे वाया गेले आणि मनालीचे रात्रीचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना झालो. मात्र लडाखचे निसर्गरम्य दर्शन काही केल्या स्मृती पटलावरून जात नव्हते. मी व मुलीने ठरविले की, पुन्हा जायचे आपण लडाखला. मात्र यावेळी आमची नजर लडाखचे आणखी वेगळे रूप टिपेल याची खात्री आहे. लडाखला अनेकजण वारंवार का जातात याची त्यामुळे खात्री पटली.
साभार - लोकसत्ता
No comments:
Post a Comment