‘हिमालयन वंडरलँड’ या पुस्तकाचे लेखक, केंद्रीय मंत्रिमंडळात यूथ अफेअर्स अॅण्ड स्पोर्ट्स खात्याचे मंत्री असलेले मनोहर सिंह गिल यांची सनदी अधिकारी म्हणूनही करकीर्द गाजलेली आहे. प्रशिक्षणादरम्यान दार्जिलिंगला गेले असता प्रथमदर्शनीच एव्हरेस्टच्या प्रेमात पडले होते. १९९१ साली तेनझिंग नॉर्गे यांच्या हाताखाली गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेऊन व नंतर स्वत:ची नेमणूक हिमप्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात करवून घेत त्यांनी आपले हे प्रेम कायम राखले. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी ते लाहौल-स्पितीचे डेप्युटी कमिशनर झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचे लाहौल-स्पिती लोकांशी घनिष्ट संबंध आहेत. लाहौल-स्पिती येथे असताना गिल यांनी त्या प्रदेशाच्या चालीरीती, रूढी, संस्कार, सणवार, सामाजिक अभिसरण, इतिहास, दंतकथा, भूगोल इत्यादींचा सखोल अभ्यास केला. तेथे राहण्याच्या, फिरण्याच्या आणि प्रशासनाच्या स्वानुभवावर तसेच अभ्यासावर आधारित पुस्तक लिहिताना गिल यांना प्रश्न पडला तो असा की, तिबेटच्या सीमेला लागून पाच हजार चौरस मैल पसरलेल्या आणि फक्त वीस हजार लोकसंख्या असलेल्या प्रदेशाला एक स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा का?
या प्रदेशात कोणताही उपद्रव नसल्याने ब्रिटिशांनी येथे ढवळाढवळ करण्याचे टाळले होते. जुन्या काळातले काही किस्से गिल यांनी पुस्तकात सांगितले आहेत. त्यापैकी एक असा : फेअरली नावाचा एक कमिशनर लाहौलला आला असता, त्याच्या स्वागतासाठी गावाचा मुखिया वेशीवर आला. फेअरलीला मुखियाचे जोडे फार आवडले. त्याने मुखियाला जोडे काढण्यास सांगितले. ते जोडे फेअरलीला नीट बसले. आपले जोडे त्याने मुखियाला दिले आणि जोडय़ांसाठीचे तीस रुपये मिळाल्याची पावती मुखियाकडून आणण्यास आपल्या नोकराला सांगितले. असो. भारत-चीन संबंध बघता १९६६ साली सरकारी कारभारातली शिस्त वाढविण्यासाठी लाहौल-स्पितीला पंजाबातील एक स्वतंत्र जिल्हा करण्यात आला. १९६६ पासून हा जिल्हा हिमाचल प्रदेशात आहे.
लाहौल-स्पितीचे महत्त्व भारत-चीन संबंधांच्या संदर्भात आहे. लाहौल हा प्रदेश पंजाबच्या उत्तरेस आणि लद्दाखच्या दक्षिणेस आहे. कुलू जिल्हा आणि लाहौलमध्ये हिमालयातील अनेक पर्वत आहेत, ज्यांची उंची १,८०० फूट किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे. कुलू-मनालीकडे इथून जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे १०,३५० फूट उंचीवरचा रोहतांग पास. स्पिती प्रदेश पूर्वेस आहे. २०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीची अनेक शिखरं लाहौल-स्पिती प्रदेशात आहेत. लाहौल आणि स्पिती या दोन प्रदेशांमध्ये हिमालयाची पर्वतश्रेणी आहे. त्यांना जोडणारा रस्ता १५,००० फूट उंचीवरील अत्यंत निमुळत्या कुन्झाम खिंडीतून आहे.
एवढय़ा उंचीवर ऑक्सिजन विरळ असल्यामुळे श्वासोच्छ्वास करताना धाप लागते. लवकर थकवा येतो. डोंगरावरून अचानक कोसळणाऱ्या बर्फाच्या कडय़ांचा आणि महाकाय दगडांचा धोका सतत असतो. एकदा तर गिल कोसळणाऱ्या बर्फाच्या कडय़ाखाली येता येता बचावले. लाहौल-स्पितीत कडाक्याची थंडी असते. मैलौन् मैल ६ ते ३० फूट बर्फाचे ढीग असतात. सर्व वातावरण पांढरे शुभ्र होऊन जाते. तापमान -४० अंशांपर्यंत जातं. आकाशाच्या गाढ निळ्या रंगाचे व खालच्या पांढऱ्या रंगाचे मिश्र सौंदर्य अवर्णनीय. थंडी संपली की चोहीकडे वृक्षांच्या हिरव्या रंगाची लयलूट असते. हा हिरवा रंग उंच शिखरांच्या आणि पर्वतांच्या उतरणीच्या पांढऱ्या बर्फाच्या पाश्र्वभूमीवर अतीआकर्षक आणि लोभस दिसतो.
सप्टेंबरपासून चार महिने बऱ्याच गावांचा-खिंडींचा बर्फामुळे जगाशी संपर्क तुटतो. अशा परिस्थितीतही गिल सतत पायी भटकंती करीत असत. अनेक विघ्ने, नैसर्गिक आपत्ती येऊनही त्यात खंड पडला नाही. एकदा ऋतुमानाच्या भाकितापेक्षा अगोदर प्रचंड प्रमाणावर हिमवर्षांव झाल्यामुळे २४ तासांत ५४ मैल चालत जाण्याचा प्रसंग आला. मोठय़ा प्रमाणावर कडे कोसळून खोकसार गावाच्या क्षेत्रात रस्ता बांधणीच्या कामासाठी आणलेले दोन हजार कामगार अडकून पडले होते. फिल्म्स डिव्हिजनची एक तुकडी आणि भूगर्भशास्त्रज्ञांची एक तुकडीही अडकली होती. गिल तिथे पोहोचल्यावर तातडीने सर्वाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अडकलेल्यांकडे थंडीचे कपडे तर नव्हतेच, पण खाण्यापिण्यासही फार थोडे होते. जिवाचे रान करून बचावतुकडीने गिल यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवसांत सर्वाची सुटका केली. शेकडो मेंढय़ा मात्र ते वाचवू शकले नाहीत.
लाहौल-स्पितीतील लोक बौद्धधर्मीय आहेत. बौद्ध धर्म येथे इ.स.पू. २४० मध्ये आला. गावोगावी लक्षवेधक मठ दिसतात. बहुतेक मठ पर्वतांच्या अरुंद कडय़ांवर तोल सांभाळून उभे राहिल्यासारखे दिसतात. पांढऱ्या-सोनेरी रंगांच्या मठांमधून जवळपासची खेडी आणि बर्फाच्छादित शिखरं मनोहारी आहेत.
लाहौल-स्पितीचे लोक उत्सवप्रिय आहेत. तेथे अनेक उत्सव साजरे केले जातात. केलँग गावी वार्षिक ‘गोटसी’ उत्सव साजरा केला जातो. छांग (स्थानिक दारू) पिणे यात महत्त्वाचे. सार्वजनिकरीत्या, झाडाखाली त्या दिवशी फक्त केलँग देवाची पूजा केली जाते. इतर कुठल्याही देवाची आठवण करायची नसते. संध्याकाळ झाली की उरलीसुरली छांग संपवून लोक घरी परततात आणि पुढील वर्षी गोटसी उत्सवाच्या दिवसापर्यंत केलँग देवाची आठवणदेखील करायची नसते.
मरणोपरान्त मृतदेह ठेवलेल्या खोलीत नातलगांना प्रवेश नसतो. मृतदेहाच्या कानात लामा ओरडून सांगतो, ‘तू मेला आहेस.’ म्हणजे आत्म्याला कळते की हा देह मृत झाला आहे आणि तो निघून जातो. मृतदेहाला ताठ बसवून बांधून अग्नी दिला जातो. त्या वेळीदेखील नातलग हजर राहत नाही.
जानेवारीत प्रकाशोत्सव साजरा करण्यात येतो. आपल्या नववर्ष आणि दिवाळीच्या सोहळ्याचे हे मिश्रण वाटते. मंगळवारी सण आल्यास तो अत्यंत पवित्र मानला जातो. घरातील प्रत्येक पुरुषाच्या नावे एक हल्दा (मशाल) तयार केला जातो. घरातील नव्याने सारवलेल्या एका भिंतीपाशी सर्व हल्दे उभे केले जातात. तिथेच जमिनीवर पूजा मांडली जाते. त्या वेळी दोन भावना व्यक्त करण्यात येतात. ‘लोसोमाताशी शॉग’ (नववर्षांच्या शुभेच्छा) आणि ‘लखीम कार्पो झाल्दो’ (देवांचे पक्वान्न आमच्या तोंडात पडो). लामाने काढलेल्या मुहूर्तावर सर्व मशाली पेटविण्यात येतात. मग जमेल तेवढी छांग प्राशन करून ‘ओम अहा ओम’चा जप करत सगळे हल्दे घराबाहेर नेण्यात येतात. नंतर ‘हल्दा हो’च्या गजरात गावाबाहेर लांब ते हल्दे फेकून दिले जातात. हल्द्यांबरोबर आपल्या सर्व वाईट गोष्टी, अनिष्ट गोष्टीदेखील अग्नीत भस्म होतात, असा समज आहे.
या परिसरातील बहुपतित्वाच्या प्रथेमागची मानसिकता, या पर्वतीय प्रदेशांच्या गरजा आणि मागण्या यांवरही गिल विचारमंथन करतात. दीर्घ आणि कडाक्याच्या थंडीने जगाशी संपर्क तुटतो तेव्हा लोकअसंतुष्ट नसतात तर मठांमध्ये जाऊन तीन-चार महिने ध्यानधारणा करतात, असे निरीक्षण त्यांनी मांडले आहे. ७५ वर्षांचे मनोहर सिंह गिल यांनी लाहौल-स्पिती या खडकाळ पण रमणीय व सात्त्विक सौंदर्याच्या प्रदेशाबद्दल व तिथल्या साध्या लोकांबद्दल अत्यंत आत्मीयतेने हे वाचनीय पुस्तक लिहिले आहे.
हिमालयन वंडरलॅण्ड :
ट्रॅव्हल्स इन लाहौल अॅण्ड स्पिती
लेखक : मनोहर सिंह गिल
प्रकाशक : पेंग्विन-व्हायकिंग
पृ : २६८ + २०
साभार- लोकसत्ता
No comments:
Post a Comment