हिमाचल प्रदेशातील मनाली आणि अतिशय दुर्गम भागात वसलेले लाहोल यांच्या दरम्यान वर्षभर संपर्क खुला राहण्यासाठी ८.८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची सुरुवात येत्या जून महिन्यात होणार आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांनी ही माहिती दिली.हिमालयात समुद्रसपाटीपासून १३ हजार ५० फूट उंचीवरील प्रसिद्ध रोहतांग खिंडीखालून हा १० मी. रुंदीचा बोगदा खणण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये १४५८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची कोनशिला बसविली होती. मात्र त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. आता या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार असून, फेब्रुवारी २०१५ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे.
मनाली आणि लाहोल व स्पिटी जिल्ह्य़ाचे मुख्यालय असलेल्या केईलाँग दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळे ५५ किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा कालावधीही चार तासांनी कमी होणार आहे, असे धुमल यांनी सांगितले.
हिवाळ्यातील जोरदार हिमवृष्टीमुळे रोहतांग, कुन्झाम आणि बारा लापचा ला या हिमालयातील खिंडी बंद होतात. त्यामुळे लाहोल व स्पिटी, पंगी आणि किल्लर या भागाचा जवळजवळ ५ ते ६ महिने जगाशी संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे नव्या बोगद्यामुळे या अतिशय दुर्गम भागातील अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
धुमल यांनी सांगितले की, हिंदुस्थान तिबेट आणि दार्चा-शिंकोला या मार्गावर अशाच प्रकारचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रदेशाचा संपूर्ण देशाशी वर्षभर संपर्क सुरू राहील. या मार्गामुळे लडाख भागाला अत्यावश्यक बाबींचा पुरवठा करण्यासाठी एक अतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार आहे.
साभार लोकसत्ता
No comments:
Post a Comment