काय मंडळी लडाखला जायची तयारी करताय? जोझिला खिंड नुकतीच वहातूकीसाठी खुली झाली. मनाली-रोहतांगपास-लेह हा मार्गही लवकरच खुला होईल. तुम्ही इशा टुर्सचे पर्यटक अहात ना, मग तुमची योग्य ती काळजी घेतली जाईलच पण काही गोष्टी तुम्हीच करू शकता, त्या जर आपण केल्या तर आपला प्रवास आणि एकूणच सहल खुप छान होईल, संस्मरणीय होईल. काय काय करायचं बघा.
फोटो असलेलं ओळखपत्र
फोटो असलेलं एक ओळखपत्र सोबत असणं जरूरीचं आहे. विमानतळावर प्रवेश करताना, सीमावर्ती भागात जाताना सुरक्षा एजंसी कडून त्याची मागणी होऊ शकते.
सर्व प्रथम तुम्हाला लागणारे कपडे. स्वेटर, जॅकेट, विंडचिटर, थर्मल इनर्स, कानटोपी, उलनचे हातमोजे, पायमोजे, एखादी शाल अथवा मफलर हे आवश्यक आहे.
लडाखला थंड हवामानात, विशेषतः उंच असलेल्या पासमध्ये वरील सर्व ‘गरमसामान’ लागतच. वारा लागत असताना आणि पासमध्ये असताना कानटोपी मुळीच काढू नका.
पुर्ण बाह्यांचे ( full Sleeve) कपडे, टॅप, टी शर्टस्.
जेव्हा जॅकेट किंवा स्वेटर घातलेला नसेल तेव्हा पुर्ण बाह्यांचे कपडे घाला. लडाखच्या उन्हात कातडीचा रंग लगेच बदलतो. शिवाय वार्यापासूनही संरक्षण मिळते.
प्रखर उन्हापासून डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी काळा चष्मा जरूर लावावा (Sun Glasses) मात्र तो निळ्या रंगाचा नसावा.
हिमालयात अल्ट्राव्हायलेटॅ किरणांचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. बर्फावरून परावृत्त होणारी अशी किरणंसुद्धा डोळ्यांना हानीकारक असतात.
कोल्ड क्रिम आणि सन्स् क्रिम लोशन जरूर घेऊन जा.
रात्रीच्या आणि पहाटेच्यावेळी कोल्ड क्रिम आणि उन्हात असताना सन्स् क्रिम लोशन लावल्याने चामडी, ओठ फुटणं, कातडी जळणं असे प्रकार होणार नाहीत.
विजेरी (Torch with extra cells) बरोबर ठेवा.
लडाखला उपलब्ध करून दिलेली वीज ही डीझेल वापारून जनरेटर मार्फत तयार केलेली असते. ए ग्रेड हॉटेलमध्ये आपली राहण्याची सोय असली तरी क्वचीत प्रसंगी वीज जाते. काही कारणाने आपण वाटेत अडकून पडलात तर अशा ठिकाणी विजेरीचा खुप उपयोग होतो.
मोठा रुमाल अथवा कपडा.
हिमालयातल्या रस्त्यांची खात्री देता येत नाही. बर्याच ठिकाणी दरडी कोसळल्या मुळे अथवा खराब रस्यांमुळे प्रवासात धुळीचा त्रास होवू शकतो. जास्त धूळ उडत असेल तर असा रुमाल नाकावर धरा म्हणजे धुळीचा त्रास होणार नाही. ही गोष्ट फार छोटी वाटते पण एकदा का धुळीचा त्रास झाला तर मग सर्दीचा त्रास संपुर्ण सहलभर होत रहातो.
तुम्हाला लागणारी औषधं बरोबर घ्या. क्रोसीन, ऑन्डेम, निओस्प्रीन जवळ बाळगा.
लडाखच्या औषधाच्या दुकानात आपल्याला लागणारी औषधं आणि तेच ब्रॅंड मिळतीलच याची खात्री नसते, म्हणून ही औषध इथूनच घेवून जा. प्रवासात गाडी लागत असेल तर प्रवास सुरू होण्याच्या आधी किमान अर्धातास तरी ऑन्डेम घेणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. .
ड्रायफ्रुट, इतर खाणं जवळ बाळगा.
काही मधुमेहाने आजारी असतील तर त्यानी प्रवासा दरम्यान भुक लागली असता खाण्यासाठी ड्रायफ्रुट, इतर खाणं बरोबर घ्यावं. सहलीत जेवणाच्या वेळा पाळल्या जातात पण असाधारण परिस्थितीत वेळ होवू शकतो.
एक्स्टेंशन बोर्ड किंवा स्पाईक गार्ड.
डिजीटल कॅमेरा, आय् पॉड, मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनीक वस्तू वापरत असाल तर त्या चार्ज करण्यासाठी एक्स्टेंशन बोर्ड बरोबर घ्याच. हॉटेलच्या खोलीत असलेली कनेक्शंस कमी पडू शकतात.
टोपी, छोटी बॅग, सुई दोरा अशा सारख्या नेहमीच्या प्रवासात लागणार्या वस्तू आपण घ्यालच. तर मंडळी लडाखसारख्या ठिकाणी जाताना वर सांगितलेल्या वस्तू जरूर घ्या गैरसोय टाळण्यासाठी ते आवश्यक आहे. शुभास्थे पंथानः......!
नरेन्द्र प्रभू