आत्माराम परब यांचं "व्हिंटर लडाख' हे छायाचित्रांचं प्रदर्शन सद्द्या प्रभादेवी येथे सुरू आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर, २०१०,
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
(सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश)
स्थळ: पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई २५
या प्रदर्शनानिमित्त दैनिक प्रहार मध्ये आलेला आत्माराम परब यांचा लेख:
हाडं गोठवणारी लडाखची थंडी
आत्माराम परब |
लडाख हा जम्मू- काश्मीरमधील अतिरेकी कारवाया नसलेला एकमेव अतिदुर्गम आणि नितांतसुंदर भाग. जगातील कोणत्याही प्रदेशाची त्याच्याशी तुलना करता येणार नाही.. (आणि हे मत लडाखमध्ये येणा-या परदेशी पर्यटकांचं आहे.) लडाखला कोणत्याही मार्गे जाणं खडतरच, अगदी विमानानंदेखील. लडाखला जाण्यासाठी मनालीमार्गे आणि श्रीनगरमार्गे असे दोन अतिशय खडतर रस्ते आहेत. परंतु नोव्हेंबर ते मे या कालावधीत खिंडी बर्फाच्छादित झाल्यामुळे ते बंद असतात. त्यामुळे लडाखमधील लोकांचा फक्त विमानानंच भारतातल्या इतर भागांशी संपर्क राहू शकतो. तो तिथल्या सर्वसामान्यांसाठी परवडणारा नाही.
बाहेरून आधुनिक वाटत असलेलं वांगचुकचं घर आतून मात्र पारंपरिक होतं. गरमागरम चहाचा आस्वाद घेता घेता तासभर गप्पा झाल्या आणि त्याच वेळी लक्षात आलं, श्वास घ्यायला त्रास होतोय, डोकं जड झालंय. विमानानं पहिल्यांदाच लडाखला आलो होतो,त्यामुळे सुरुवातीच्या तासाभरात झालेला त्रासाचा अनुभव नवीनच होता. समुद्रसपाटी पासून 11500 फूट प्रवास फक्त दोन तासांत केल्यामुळे आणि 100 टक्के ऑक्सिजन असलेल्या वातावरणातून 62 टक्के ऑक्सिजनवर आल्यावर त्रास सुरू झाला होता. त्यादिवशी सकाळी 11 वाजता जो अंथरुणात पडलो ते थेट दुपारी एक वाजेपर्यंत.
लडाखी लोकांसाठी ही थंडी परिचयाची असल्यामुळे त्यांची किमान मानसिक तयारी असते; परंतु लडाखमध्ये जेवढे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्या 30 टक्के एवढय़ा प्रमाणात भारतीय सैन्य आहे. हे सैनिक तुम्हा-आम्हा सर्वसामान्य भारतीयांसारखेच असल्यामुळे त्यांना शत्रूपेक्षा या अतिथंड वातावरणाशी लढताना शारीरिक समस्येबरोबरच मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही सीमारेषेवर जाण्यासाठी लडाख हे मध्यवर्ती ठिकाण आहे. अशा मोक्याच्या ठिकाणी भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाचं रान करणा-या या सैनिकांचा लडाखमधील खडतर जीवनक्रम जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर हिमालयाची उंची गाठतो.
लडाख हे जगातील असं एकमेव ठिकाण आहे, जिथं हिवाळ्यामध्ये प्रखर सूर्यप्रकाशात खूप वेळ बसलेले असाल आणि तुमचे अनवाणी पाय सावलीत असतील तर एकाच वेळी सनस्ट्रोक आणि फ्रॉस्टबाइट होऊ शकतो. लडाखमध्ये मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये म्हणजेच तेथील उन्हाळ्यात तापमान 25 ते 30 असतं. लडाखमधला हा अनुभव कमालीचा रोमांचक आणि थरारक असतो, आणि लडाखवासीयांसाठी जीवघेणाही.