आत्माराम परब यांचं "व्हिंटर लडाख' हे छायाचित्रांचं प्रदर्शन सद्द्या प्रभादेवी येथे सुरू आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर, २०१०,
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
(सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश)
स्थळ: पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई २५
या प्रदर्शनानिमित्त दैनिक प्रहार मध्ये आलेला आत्माराम परब यांचा लेख:
हाडं गोठवणारी लडाखची थंडी
आत्माराम परब |
लडाख हा जम्मू- काश्मीरमधील अतिरेकी कारवाया नसलेला एकमेव अतिदुर्गम आणि नितांतसुंदर भाग. जगातील कोणत्याही प्रदेशाची त्याच्याशी तुलना करता येणार नाही.. (आणि हे मत लडाखमध्ये येणा-या परदेशी पर्यटकांचं आहे.) लडाखला कोणत्याही मार्गे जाणं खडतरच, अगदी विमानानंदेखील. लडाखला जाण्यासाठी मनालीमार्गे आणि श्रीनगरमार्गे असे दोन अतिशय खडतर रस्ते आहेत. परंतु नोव्हेंबर ते मे या कालावधीत खिंडी बर्फाच्छादित झाल्यामुळे ते बंद असतात. त्यामुळे लडाखमधील लोकांचा फक्त विमानानंच भारतातल्या इतर भागांशी संपर्क राहू शकतो. तो तिथल्या सर्वसामान्यांसाठी परवडणारा नाही.
मी गेली 12 वर्षे लडाखवा-या करतो आहे. 1994 साली मोटरसायकल मोहिमेसाठी गेलो म्हणून लडाखची तोंडओळख झाली आणि प्रथमदर्शनीच लडाखच्या प्रेमात पडलो. 2005 पर्यंत 12 वा-या झाल्या पण, हिवाळ्यामध्ये लडाखला भेट देणं अद्यापही जमलेलं नव्हतं. म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लडाखला जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीहून निघालेलं विमान लेह विमानतळावर उतरलं. तिथल्या ‘उणे सात अंश सेल्सियस’ तापमानासाठी आवश्यक उबदार कपडे माझ्याकडे नसल्यामुळे हुडहुडी भरली होती. त्याच वेळी माझा मित्र, कासिमनं माझ्यासाठी आणलेलं ऑस्ट्रेलियन फेदर जॉकेट आणि पॅन्ट मला दिली. विमानतळावरच हे कपडे अंगावर चढवले, तेव्हा कुठे जिवात जीव आला. या मोसमात सर्व हॉटेलं बंद असल्यामुळे वांगचूक या मित्राच्या घरीच मुक्काम होता. घरात शिरताच लहान-थोर मंडळींनी ‘झुले’(लडाखीमध्ये नमस्कार) म्हणून स्वागत केलं. हवामानाशी जुळवून घेण्यासाठी त्या घरात किमान दोन फूट रुंदीच्या भिंती, घर उबदार रहावं म्हणून प्रत्येक ठिकाणी केलेला लाकडाचा वापर, पारंपरिक लडाखी बैठक आणि प्रत्येक घरात हिवाळ्यात मधोमध असायलाच हवी अशी बुखारी (पारंपरिक हिटर) होतं.
बाहेरून आधुनिक वाटत असलेलं वांगचुकचं घर आतून मात्र पारंपरिक होतं. गरमागरम चहाचा आस्वाद घेता घेता तासभर गप्पा झाल्या आणि त्याच वेळी लक्षात आलं, श्वास घ्यायला त्रास होतोय, डोकं जड झालंय. विमानानं पहिल्यांदाच लडाखला आलो होतो,त्यामुळे सुरुवातीच्या तासाभरात झालेला त्रासाचा अनुभव नवीनच होता. समुद्रसपाटी पासून 11500 फूट प्रवास फक्त दोन तासांत केल्यामुळे आणि 100 टक्के ऑक्सिजन असलेल्या वातावरणातून 62 टक्के ऑक्सिजनवर आल्यावर त्रास सुरू झाला होता. त्यादिवशी सकाळी 11 वाजता जो अंथरुणात पडलो ते थेट दुपारी एक वाजेपर्यंत.
आपण ज्या तापमानाचा विचारही करू शकत नाही, अशा 45-50 अंशापर्यंत लडाखमध्ये पारा खाली घसरतो. मी स्वत: -26 अंश तापमान अनुभवलं. अशा थंडीत सर्वसामान्य लडाखी लोक कसं काम करीत असतील? त्यांचा जीवनक्रम कसा असेल? त्यांची करमणुकीची साधनं काय असतील? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. लडाखमध्ये साधारणपणे ऑक्टोबरपासूनच थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. नोव्हेंबरमध्ये दिवसा +3 ते 4 अंश तापमान तर रात्री - 7 ते 8 अंश तापमान खाली उतरतं. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये -10 ते -40 ते 45 अंश इतकं तापमान खाली घसरतं! खरं तर लडाखमध्ये बर्फवृष्टी फार कमी म्हणजे सहा इंचपेक्षा जास्त होत नाही; परंतु तिबेटच्या पठारावरून येणारे थंड वारे लडाख- झंस्कारचा संपूर्ण परिसर गोठवून टाकतात. डिसेंबर 1994 मध्ये द्रासमध्ये नोंदवलेल्या -60 अंश तापमानानं तर थंडीचा विश्वविक्रम केला होता. मानवी शरीराच्या रचनेप्रमाणे हे तापमान सहन करण्यापलीकडचंच आहे. कडाक्याची व रक्त गोठवणारी थंडी याच्याही पलीकडच्या परिस्थितीत लडाखमधील लोकांचा जीवनक्रम अतिशय खडतर आणि कंटाळवाणा असतो. नळाद्वारे येणारं पाणी गोठल्यामुळे बंद होतं. त्यामुळे लडाखच्या ब-याचशा भागात दिवसातून दोन वेळा टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. पाण्याअभावी टॉयलेटही वापरता येत नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून केवळ लडाखमध्येच वापर होणा-या ‘लडाखी शौचालय’चा वापर करावा लागतो.
डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये शाळा- कॉलेजेही पूर्णपणे बंद असतात. कोणत्याही प्रकारची शेतीची कामं होत नाहीत. पर्यटन पूर्णपणे बंद असतं. दोन- तीन स्थानिक हॉटेल्स सोडली तर सर्व हॉटेल्स बंद असतात. एखाददुस-या जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाखेरीज बरीचशी दुकानं बंद असतात. रस्ते रिकामे असतात. जणू काही अघोषित संचारबंदीच असावी! तिला लेहमधील हिंदू संस्कृतीचं प्रतीक असलेली सिंधू नदी आणि झंस्कार नदी ही पूर्णपणे गोठून साथ देते. एकंदर वातावरणच असं असतं की, पूर्ण जीवनच गोठून गेलंय, पूर्णपणे स्तब्ध झालंय. भरीस भर म्हणून या कालावधीमध्ये विजेचं भारनियमन होतं. संध्याकाळी केवळ 7 ते 10 या कालावधीमध्येच वीज असते. त्यामुळे टीव्ही हे एकमेव मनोरंजनाचं साधनही केवळ तीन तासांसाठीच उपलब्ध असतं. सरकारी कार्यालये सुरू असून नसल्यासारखीच असतात. कार्यालयांमध्येही लोक बुखारींभोवती शेक घेत ‘गुरगुर चाय’चा आस्वाद घेत कवड्यांचा खेळ किंवा पत्ते खेळत असतात. जर चांगला सूर्यप्रकाश असेल तर हेच खेळ उन्हात होतात.
स्थानिक स्त्रिया या कालावधीमध्ये घरातील कामांव्यतिरिक्त लोकरीची वस्त्रं विणण्यात आपला वेळ घालवतात. मुलं मात्र कोणत्याही वातावरणात क्रिकेट किंवा इतर खेळ खेळतात. या कालावधीतलं हमखास मनोरंजन म्हणजेच धार्मिक कार्य किंवा उत्सव. कोणतीही कामं नसल्यामुळे लग्न, बारसं यांसारखी करय सर्वाधिक होतात. लडाख म्हणजे उत्सवांची भूमी. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये उत्सव साजरे होतात. लडाखमध्ये बौद्ध धर्माचा पगडा असल्यामुळे तेथील बौद्ध मठांमध्ये उत्सव साजरे केले जातात. हे उत्सवच बहुधा लडाखी लोकांना अशा प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगण्यासाठी आत्मिक बळ देत असावेत!
लडाखी लोकांसाठी ही थंडी परिचयाची असल्यामुळे त्यांची किमान मानसिक तयारी असते; परंतु लडाखमध्ये जेवढे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्या 30 टक्के एवढय़ा प्रमाणात भारतीय सैन्य आहे. हे सैनिक तुम्हा-आम्हा सर्वसामान्य भारतीयांसारखेच असल्यामुळे त्यांना शत्रूपेक्षा या अतिथंड वातावरणाशी लढताना शारीरिक समस्येबरोबरच मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही सीमारेषेवर जाण्यासाठी लडाख हे मध्यवर्ती ठिकाण आहे. अशा मोक्याच्या ठिकाणी भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाचं रान करणा-या या सैनिकांचा लडाखमधील खडतर जीवनक्रम जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर हिमालयाची उंची गाठतो.
लडाख हे जगातील असं एकमेव ठिकाण आहे, जिथं हिवाळ्यामध्ये प्रखर सूर्यप्रकाशात खूप वेळ बसलेले असाल आणि तुमचे अनवाणी पाय सावलीत असतील तर एकाच वेळी सनस्ट्रोक आणि फ्रॉस्टबाइट होऊ शकतो. लडाखमध्ये मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये म्हणजेच तेथील उन्हाळ्यात तापमान 25 ते 30 असतं. लडाखमधला हा अनुभव कमालीचा रोमांचक आणि थरारक असतो, आणि लडाखवासीयांसाठी जीवघेणाही.
Prabhu, photos far sahi ahet winter ladakh che...!!
ReplyDeletefull temptation zalay ata winter ladakh pan karayacha..
baghu ata kadhi yog yetoy..!
Neha Lele
नेहा, मुंबईत उन्हाळा असूनही आम्ही गेले चार दिवस लडाखच्या थंडीने गारठून गेलो होतो. धीर द्यायला लेहहून पद्मा सुद्धा आला होता. या वर्षी प्रथमच इशा टुर्स ने व्हिंटर लडाख टुर्स आयोजित केल्या आहेत.
ReplyDelete