Sunday, March 3, 2019

सलीम






सलीम आज आमच्यात नाही हे खरं वाटत नाही. वयाच्या ५४ वर्षी अकाली मृत्यूने त्याला गाठलं. हा सलीम, २००७ साली पहिल्यादा भूतान भेटीच्यावेळी जलपायगुडीला एका फोनवर मराठी बोलत असताना माझ्या दृष्टीस पडला. तिकडे महाराष्ट्रापासून  हजारो मैल दूर जलपायगुडीत हा स्थानिक गाडीमध्ये बसून मराठी बोलणारा, कोण बरं असेल...! असं म्हणून विस्मयचकीत व्हायला झालं होतं. त्याचं बोलणं संपेपर्यंत वाट पाहिली आणि त्याच्याशी बोललो तेव्हा तो टुरीस्ट गाडी चालवतो हे समजलं. मूळचा पुणेकर असलेला सलीम १५ वर्षांपूर्वी काही कामानित्ताने आला आणि भारत आणि भूतानच्या सीमेवरील जयगाव गावात स्थायिक झाला तो शेवटपर्यंत. जरी धर्माने मुस्लिम असला तरी त्याचं शिक्षण मराठी माध्यमातुन झालं होतं,  त्याची नाळ मराठी लोकांशी बांधली गेली होती.

२००६ साली ईशा टूर्स साठी नव्यानेच भूतानच्या सहली सुरू केल्या होत्या आणि त्याच वेळी आम्हाला सलीमच्या रूपाने नवा मित्र आणि भूतानची खडानखडा माहीत असणारा मार्गदर्शक मिळाला होता. २००७ पासून अगदी काल परवा पर्यंत भूतानच्या सहलीला सलीम नाही असं कधीच झालं नाही. अगदी मी स्वतः  किंवा आमचे टूर लीडर्स टूर वर असताना सुद्धा सलीम आहे म्हणून आम्हाला कधीच काळीज नाही वाटली. गेल्या १२ वर्षात ईशा टूर्स ने भूतान च्या शेकडो सहली हजारो पर्यटकांना घेऊन केल्या, प्रत्येकवेळी बागडोगरा विमानतळावर हा हसतमुख सलीम सामोरा यायचा आणि मराठीत बोलून पर्यटकांचं स्वागत करायचा, तेव्हा सगळेच आपला माणूस भेटला म्हणून आनंदित व्हायचे. त्याच्या गाडीत बसल्यावर मराठी भावगीतं सुरू व्हायची आणि पुन्हा त्याला दाद दिली जायची. त्याचं मराठी गाण्याचं collection एवढं  होतं की पुढील ८ दिवसात एकही गाणं repeat होत नव्हतं. जेव्हापासून माझी सलीमशी ओळख झाली तेव्हापासून मुंबईहून सलीमसाठी पुरणपोळी आणि श्रीखंड नेलं नाही असं झालं नाही, त्याची ही आवड पाहून काही पर्यटक सुद्धा त्याला ही भेट न विसरता आमच्या सोबत पाठवायचे.

आम्हाला भेटला तोपर्यत सलीम केवळ स्वतःची टुरिस्ट गाडी चालवणारा एक ड्राइवर होता पण ईशा टूर्स च्या संपर्कात आल्यानंतर त्याच्याकडे एकाच्या ३ गाड्या झाल्या, तो एक लोकल टूर ऑपरेटर झाला आणि भूतानमधल्या  हॉटेल, गाड्यांचा ताफा, गाईड अशा सर्व तत्सम गोष्टीं सलीमने आपल्या ताब्यात घेतल्या, कोणतीही समस्या आली तर सोडवण्यासाठी त्याच्याजवळ उत्तर तयार होतं.

रांगड्या मराठी भाषेसोबत, हिंदी, बंगाली, भुतानी, नेपाळी आणि थोड्याफार प्रमाणात इंग्रजी एवढ्या भाषांवर प्रभुत्व असणारा सलीम म्हणजे एक वल्ली होता.

आज सलीम, आमचा भूतानचा वाटाड्या आम्हाला सोडून आडवाटेने कायमचा निघून गेला आहे, आज ईशा टूर्स चे सर्व टूर लिडर्स भूतान समर्थ पणे हाताळत असले तरी आम्ही जेव्हा जेव्हा भूतान मध्ये जावू तेव्हा तेव्हा सलीम ची उणीव नेहमीच भासत राहील.

सलीम सारखे मित्र फार अभावानेच मिळतात, अजून कितीतरी सहली  आम्हाला त्याच्यासोबतीने करायच्या होत्या, पण...

आत्माराम परब,
ईशा टूर्स, मुंबई

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails