Monday, January 28, 2013

लडाखचा हिवाळा


साप्ताहिक लोकप्रभा मध्ये ट्रॅव्हलोग्राफी या सदरात आत्मारम परब यांची लेखमाला सुरू झाली आहे त्या लेखमालेती हा पहिला लेख 


http://www.lokprabha.com/20130201/travalography.htm

लडाखचा हिवाळ्यातला गोठलेला निसर्ग तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करायचा असेल तर तुम्हाला घरातून निघतानाच तयारी करायला हवी आणि तिथे गेल्यावरही काळजी घ्यायला हवी...
गेल्या सतरा वर्षांंत मी केलेल्या लडाखवाऱ्यांची आता शतकाकडे वाटचाल सुरू आहे तरीदेखील एक छायाचित्रकार म्हणून लडाख मला अजूनही खुणावत असतो. एवढय़ा वेळा लडाखला गेल्यावरही लडाख माझ्या मनात घर करून बसला आहे. खऱ्या फोटोग्राफरला लडाखचा अख्खा प्रांत म्हणजे फोटोसाठी पर्वणीच आहे. लडाखला कितीही वेळा जा तिथला नित्य बदलत असणारा निसर्ग छायाचित्रकारासाठी नवनवीन संधी सतत देतच आला आहे. लडाखचा उन्हाळा मी अनेक वेळा अनुभवला पण तिथला हिवाळा मला अनुभवायचा होता. २००६ च्या हिवाळ्यात मला ती संधी मिळाली आणि नंतर मी सातत्याने लडाखला हिवाळ्यातही जातच राहिलो.
आपल्याला माहीतच आहे की काळ हा कधीच थांबत नाही, पण काळही थांबलेला पाहायचा असेल तर हिवाळ्याच्या दिवसात लेह लडाखला गेलं पाहिजे. अतिशय विरळ लोकवस्ती असलेल्या या प्रदेशातील जनजीवन त्या काळात ठप्प झालेलं असतं. पण त्याच वेळी निसर्गाचे विभ्रम टिपण्यासाठी खऱ्या भटक्याने या काळात लडाखला गेलंच पाहिजे. उन्हाळ्यातलं रूप पालटलेला लडाख प्रांत टिपण्यासाठी जायचं म्हणजे तयारी ही तशीच करावी लागते. उणे वीस ते उणे तीस तापमानात लागणारे कपडे घेऊन जसे आपण तिथे जातो, जी काळजी स्वत:साठी घेतो तशीच काळजी कॅमेरा आणि त्याच्या इतर उपकरणांसाठीही घ्यावी लागते. दूपर्यंत दिसणारा हा प्रांत फोटोत बंदिस्त करायचा असेल तर येथे एसएलआर कॅमेऱ्याला पर्याय नाही. तीनशे साठ अंशात दिसणारा नजारा टिपण्यासाठी आपण कमी पडतो, पण निदान १० ते २०ची वाइड अ‍ॅंगल लेन्स घेऊन गेल्यास मनासारखे फोटो आपण काढू शकतो. ७५ - ३००ची लेन्ससुद्धा सोबत असावी कारण दूरवर दिसणारी एखादी फ्रेम किंवा आपल्या दिनचय्रेत व्यग्र असणारी लडाखी माणसं टिपायची असतील तर त्या लेन्सला पर्याय नाही. एसएलआर कॅमेऱ्याऐवजी अलीकडे बाजारात आलेला एखादा चांगला प्रोकॅमेराही आपल्याला चांगले फोटो देऊ शकेल. लडाखला निसर्ग जसा आपल्याला भारून टाकतो तशा तिथल्या मॉनेस्ट्रीजही खूप आकर्षक आहेत. आतल्या भागाचे फोटो घेताना कित्येक वेळा ट्रायपॉडची आवश्यकता भासते. गाडीतून जात असताना किंवा वाऱ्याशी सामना करीत फोटो काढताना कॅमेरा हलू नये म्हणून बिन बॅग सोबत असावी. कडाक्याच्या थंडीत जाडजूड हातमोजे घालून जेव्हा आपण फोटो घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शटर रिलीज बटन योग्य वेळी दाबलं जात नाही किंवा दुसऱ्याच ठिकाणी आपण दाब देत राहातो, हे टाळण्यासाठी रिमोटचा वापर करणे चांगले. थंडीत योग्य काळजी घेतली नाही तर बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याचा संभव असतो. एवढय़ा लांबच्या ठिकाणी जाताना किमान एक जास्तीची बॅटरी सोबत घेणं उपयुक्त ठरतं. वर सांगितल्याप्रमाणे आपण जशी आपल्यासाठी लोकरीचे कपडे घेतो तसंच एखादं लोकरीचं कापड कॅमेरा गुंडाळण्यासाठी बरोबर घ्यावं. अशा तयारीनिशी सफरीवर गेल्यास आयत्या वेळी आपला रसभंग होणार नाही.
बर्फात फोटो घेणं ही एक कला आहे. हिवाळ्यात लडाखचं गडद निळं आकाश आणि पांढराशुभ्र बर्फ यांचे फोटो काढायचे असतील तेव्हा सक्र्युलर पोलरायजर फिल्टर वापरणं केव्हाही चांगलं.
वरीलप्रमाणे जय्यत तयारी करून गेल्यावर लेहच्या विमान तळावर विमान उतरत असतानाच तिथली हिमशिखरं आपल्याला खुणावू लागतात. पण विमानाबाहेर आल्या आल्या सामना करावा लागतो तो तिथल्या थंडीचा आणि हाय अल्टील्टयूड सिकनेसचा. विमानाने लेहला गेल्यावर कधीही चोवीस तासांची विश्रांती घेतलेली बरी. त्या नंतर मात्र आपण मनसोक्त भ्रमंती आणि फोटोग्राफीला तयार होतो. हिवाळ्यात सर्वत्र पसरलेल्या बर्फात फोटो घेणं ही एक कला आहे. हिवाळ्यात लडाखचं गडद निळं आकाश आणि पांढराशुभ्र बर्फ यांचे फोटो काढायचे असतील तेव्हा सक्र्युलर पोलरायजर फिल्टर वापरणं केव्हाही चांगलं. पोलरायजर फिल्टरशिवाय फोटो घेताना तो एक किंवा दोन स्टॉप अंडर एक्स्पोज करावा जेणेकरून बर्फाच्छादित भागाचीही खोली (डेप्थ) योग्य प्रकारे चित्रित केली जाईल.
बर्फाच्छादित शिखरांबरोबरच परंपरागत वेशात असलेली लडाखी माणसं आपलं लक्ष वेधून घेत असतात. त्यांना ‘जुले' म्हणून (लडाखीत प्रणाम) फोटो घेतला तर ते आनंदाने फोटो घ्यायला तयार होतात, पण जर दुरूनच त्यांचे मूळ आविर्भाव टिपले तर ते अधिक चांगले वाटतात. त्यासाठीच ७५ -३००ची टेलिलेन्स जवळ बाळगावी लागते. लडाखला मॉनेस्ट्रीजमध्ये फोटो घेता येतात मात्र फ्लॅश वापरायला बंदी आहे. अशा वेळी ट्रायपॉड वापरता येतो किंवा आयएसओ वाढवूनही फोटो घेता येतात. मॉनेस्ट्रीज किंवा इतर इमारतींचे वाइड अँगल लेन्सने फोटो घेताना योग्य अंतर राखले पाहिजे अन्यथा इमारतीच्या िभती, खांब फोटोत तिरके दिसण्याची शक्यता असते.
लडाखला मॉनेस्ट्रीजमध्ये फोटो घेता येतात मात्र फ्लॅश वापरायला बंदी आहे. अशा वेळी ट्रायपॉड वापरता येतो किंवा आयएसओ वाढवूनही फोटो घेता येतात.
लडाखला केव्हाही गेलं तरी पँगाँग लेकला भेट दिली नाही तर ती सफर पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. पँगाँग लेकला जाताना लागणारा छांगला पास ही हटकून थांबण्यासारखी जागा आहे. पांढऱ्या चादरीवरच्या रंगीत देवळाचं दर्शन घेतल्यावर (देवाचं दर्शन घेण्याची हिम्मत त्या तापमानात होत नाही.) आपण पुढे जातो तेव्हा केव्हा एकदा पँगाँग लेक पाहातो असंहोऊन जातं. साधारण तीन किलोमीटरवर असतानाच एरवी ते दर्शन होतंही, पण हिवाळ्यातला गोठलेला हा तलाव आजूबाजूच्या बर्फात मिसळून जातो आणि अगदी जवळ जाईपर्यंत आपणाला त्याच्या भव्यतेची कल्पना येत नाही. एकदा का आपण पँगाँग लेकजवळ पोहोचले की मग खरंच स्तिमित व्हायला होतं. १४७ किलोमीटर पसरलेला हा खाऱ्या पाण्याचा तलाव हे एक आश्चर्यच आहे. पुढे दोन तृतीयांश चीनमध्ये असलेला हा गोठलेला तलाव मन मोहून टाकतो. त्याचे फोटो काढणं हे खऱ्या छायाचित्रकाराचं स्वप्न असतं. एवढय़ा उंचीवर असूनही समोरचे डोंगर आपल्या रंगांचे विभ्रम दाखवत असतात. सर्वत्र पसरलेलं बर्फ, धवल शिखरं आणि गोठलेला तलाव, पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा एकमेकांत मिसळलेल्या असतात. या अशा ठिकाणचे फोटो काढणं ही एक कला आहे. दूरवर तलावाच्या पलीकडे असणाऱ्या भागावर सूर्य किरणांचा झोत पडलेला असेल तर तो तेवढाच भाग सोनेरी दिसत असतो, हा भाग म्हणजे त्या फ्रेमचा केंद्र िबदू असतो. अशा वेळी किनाऱ्याचा काही भाग, गोठलेल्या तलावाच्या लाटा, त्यावरून परावर्तीत होणारा प्रकाश आणि तो सोनेरी भाग यांचा एकत्रित फोटो मनासारखा परिणाम साधतो आणि आपल्याला एक उत्तम फोटो मिळतो. अशा फोटोत डेप्थ ऑफ फिल्डला खूप महत्त्व आहे. जास्त अ‍ॅपर्चर ठेवून फोटो घेतल्यास पांढऱ्या पाश्र्वभूमीवर सुद्धा सुंदर फोटो घेता येतात.
हिवाळ्यात लडाखमधून वाहणाऱ्या झंस्कार आणि सिंधू या नद्याही गोठलेल्या असतात. संगमाच्या ठिकाणी या दोन्ही नद्यांचा वाहत्या प्रवाहाचे रंग आपलं लक्ष नक्कीच वेधून घेतात. दोन्ही प्रवाहातून पाणी वाहत असलं तरी त्यांचे रंग मात्र वेगवेगळे असतात आणि हेच त्या संगमाचं वैशिष्टय़ आहे. हिरवं, निळं पाणी, त्यातून परावर्तीत होणारे आकाशाचे रंग, नदीकाठची पांढुरकी तसंच राखाडी रंगाची पुळण, त्या पल्याड दिसणारी बर्फाच्छादित शिखरं हे सगळं एका फोटोत चित्रित करता येतं आणि यात जे समाधान मिळतं त्याला खरंच तोड नाही. पुढे गोठत जाणाऱ्या या नद्यांच्या प्रवाहावर आइस हॉकीच्या दर्दी खेळाडूंचा पदन्यास चालू असतो. अलीकडे कॅनडासारख्या देशातून आलेले खेळाडू तिथे या खेळाची मजा लुटत असतात आणि स्थानिक खेळाडूंनाही प्रशिक्षण देत असतात. पांढऱ्या चादरीवर रंगी-बेरंगी कपडे परिधान करून लीलया वावरणारे हे खेळाडू टिपल्यावर आपण एका अद्भुत क्षणाचे साक्षीदार झालेलो असतो आणि तो क्षणही आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेला असतो.
वर काही फूट गोठलेला बर्फ आणि त्या खालून खळाळत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज कान लावून ऐकण्यात जी मजा वाटते, जो थरार आहे तो क्वचितच एखाद्या गोष्टीत आपल्याला जाणवेल.
गोठलेल्या झंस्कार नदीच्या प्रवाहावरून करण्यात येणारा चादर ट्रेक हा या सफरीतला परमोच्च िबदू असतो. याच हिवाळ्याच्या काळात गावातले लोक उदरनिर्वाहासाठी झंस्कार व्हॅलीतून याच प्रवाहावरून चालत लेहला येतात. हौशी पर्यटकही अद्भुत ट्रेकचा आनंद अलीकडे घेऊ लागले आहेत. चादर ट्रेक हा तसा साहसी खेळ असला तरी, लेहला अगदी सर्वसामान्य पर्यटकांनी आणि अनेक फोटोग्राफरनी ही सफर सहज आणि आनंदात पार केली आहे. नदी प्रवाहावर चालणं, त्यावर तंबू ठोकून राहणं हा प्रकार आयुष्यात एकदा तरी करण्यासारखा आहेच आहे. वर काही फूट गोठलेला बर्फ आणि त्या खालून खळाळत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज कान लावून ऐकण्यात जी मजा वाटते, जो थरार आहे तो क्वचितच एखाद्या गोष्टीत आपल्याला जाणवेल. या ट्रेकमध्ये फोटोग्राफरची आणि बरोबरच्या उपकरणांची परीक्षा असते. एकदा ट्रेकला निघाल्यावर वाटेत कॅमेऱ्याची बॅटरी चार्ज करता येत नाही, म्हणूनच प्रवासाला निघतानाच एकापेक्षा जास्त बॅटऱ्या बरोबर घ्याव्या लागतात. त्या खूप जपून वापराव्या लागतात. बाहेरच्या थंडगार हवेत त्या लवकर डिसचार्ज होऊ नयेत म्हणून गरम कपडय़ांत गुंडाळून ठेवाव्या लागतात. सर्व उपकरणांची काळजी घ्यावी लागते. काटकसर करून फोटो घ्यावे लागलात. विशेष म्हणजे बॅटरी वाचवण्यासाठी फोटो पाहण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागते. या उपकरणांनाही हुडहुडी भरलेली असते.
चार िभतींआडची दुनिया मात्र या थंडीशी सामना करायला सज्ज असते. आलेल्या अतिथीला आदरातिथ्याचा लाभ तर होतोच, पण काही कमी पडू दिलं जात नाही. लडाखच्या पारंपरिक घरात विशेषत: स्वयंपाक घरात आणि देवघरात फोटोग्राफीला खूप वाव आहे. अनेक पुरातन वस्तू आपलं लक्ष वेधून घेत असतात. घराबाहेरच्या जगात बौद्ध धर्मीयांनी लावलेल्या पताका वाऱ्यावर नाच करत असतात आणि त्यांचा खेळ पाहाता पाहाता आकाशातले ढग, त्यांचे आकार, सावल्या यांचा संगम होऊन एक वेगळाच फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपता येतो. या सगळ्या पाश्र्वभूमीवर उंचावर असलेला शांती स्तूप, लेह पॅलेस, थिकसे गुंफा, शे पॅलेस ही ठिकाणं एखाद्या ऋषी-मुनीसारखी ध्यानस्थ भासतात आणि छायाचित्रकारांना तसंच चित्रकारांना आवाहन करत उभी असतात. नजर जाईल तिथे बर्फ अंगाखांद्यावर घेऊन पसरलेल्या काराकोरम पर्वत रांगा, िहदूकुश पर्वत आणि हिमालयाच्या कुशीतला हा नयनरम्य प्रदेश आपली वाट पाहातोय. हा अप्रतिम नजारा याची देही याची डोळा पाहायचा असेल तर हा संपूर्ण प्रदेश छायाचित्रकारांसाठी नंदनवनच आहे.
response.lokprabha@expressindia.com

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails