![]() |
उतुंग अमुची उत्तर सीमा |
पँगगॉंग त्सो हे लडाखमधलं आणखी एक आच्छर्य. 'त्सो' म्हणजे तलाव. आणि त्से म्हणजे गाव. भारत चिन सिमेवर असलेलं हे तलाव पहायला जायचं म्हणजे IPL (Inner Line Permit) काढावं लागतं. लडाख मधून कुठेही सिमावर्ती भागात जायचं म्हणजे IPL काढणं जरूरीचं आहेच. आदल्याच दिवशी सगळी तयारी करून ठेवली होती. पहाटे पाच वाजता गाड्या निघतील असं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा मंडळी नाराज झाली. एवढ्या पहाटे निघायला कुणीच तयार नव्हतं. अशा दुर्गम भागात आपण जेव्हा जातो ना तेव्हा थोडी अडचण झाली तरी तक्रार असू नये. अशा साहसी सहलीत किंवा मोहीमेत काही अचानक झालेले बदल. निसर्गाची प्रतिकुलता या गोष्टी कुणाच्याच हातात नसतात. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो आणि कारू या गावाजवळ आम्हाला आम्हाला पहिलं आर्मी पोस्ट लागलं. त्या ठिकाणी IPL तपासली गेली. जाणार्या सर्व व्यक्तींची नावं, वाहन क्रमांक याची नोंद केल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.
तीन महिने होणारी शेती |
कारु, शक्ती अशा गावांमधून प्रवास करत आपल्याला पुढे जावं लागतं. एकाबाजूला दरी मध्ये हिरवीगार शेती आणि दुसर्या बाजूला नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता. आमची जीप एका वळणापाशी आली तशी तीची गती आपसूकच मंद झाली. पुढे जाण्या ऎवजी ड्रायव्हर ने ती थांबवली. वरच्या बाजूला एक स्नो लेपर्ड रस्ता ओलांडायच्या पोज मध्ये उभा होता. कॅमेरे सावरून फोटो काढणार तोपर्यत तो डिस्टर्ब झाला आणि मागे वळला.
मरमॅट |
बाहेर येतात. त्यांची चाहूल लागल्यावर आम्ही आमची जीप बंद करून शांतपणे थांबलो. जीपच्या आवाजाने हा लाजरा-बुजरा सशासारखा आणि सशाच्याच काळजाचा प्राणी झटकन बिळात दिसेनासा झाला. थोडी वाट पाहिल्यावर पुन्हा बिळाच्या बाहेर आला. चाहूल घेतली आणि उन्हात खाणं शोधायला लागला. आवाज नकरता दबकत दबकत पुढे जावून त्याचा फोटो घेता आला. असे काही दुर्मिळ फोटो मिळाले की खुप समाधान होतं. जसे हे मरमॅट दिसले तसे याक सुद्धा दिसले. एक लडाखी म्हातारी बाई त्यांचं दुध काढतानाही पाहता आली. त्या याकच्या कानात हिरवे बिल्ले टोचलेले होते. हे काय म्हणून विचारलं तेव्हा समजलं की काही वेळा आपल्या देशातले याक सीमा ओलांडून पलिकडे चीनच्या हद्दीत जातात किंवा चीन मधले लाल बिल्ला असलेले याक आपल्या हद्दीत येतात अशा वेळी त्या बिल्ल्यांवरून ते लगेच ओळखता येतात आणि बहुतांश वेळा ते पुन्हा त्या त्या देशाच्या हद्दीत आपल्या सैनिकाद्वारे पोहोचवले जातात.
पँगगॉंगचं पहिलं दर्शन |
आता पासेसना सरावलेले आम्ही कारु,शक्ती अशी गावं पार करुन टांगसे या गावीपोहोचलो तेव्हा उंचावरून सखल भागात आल्यावर जरा बरं वाटलं. जास्त वेळ न थांबता पुढे निघालो. ब्रो (Border Road Organization) ने एअवढे चागले रस्ते बनवेले आहेत की त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. गुळगुळीत रस्त्यावरून वेगाने आमचा प्रवास सुरू होता. गाडी वेडीवाकडी वळणं पार करत एका ठिकाणाहून पुढे चार किलोमीटवर असलेलंपँगगॉंग लेक दिसायला लागलं आणि सगळा थकवा क्षणात निघून गेला. वर्णनातीत असे सौंदर्य.
पँगगॉंग लेक |
जिथपर्यंत आपली नजर जाईल तितक्या दूर-दूर पर्यंत केवळ निळेशार पाणी. त्या पाण्याला सिमा घालायची हिम्मत फक्त त्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये. वर निळं निळं आकाश आणि मध्येच एखादा पांढराशुभ्र ढग आणि त्या आकाशाचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब.ज्याना शक्य असेल त्यानी एकदा तरी हे सौंदर्य पहावंच. पँगगॉंगलेकचे फोटो पाहून कित्येक जण हे ठिकाण परदेशातलच असणार म्हणतात. पँगगॉंग लेक. १४५ कि.मी. लांबीचं हे तळं (?) खार्या पाण्याचं आहे. पेंगॉँग-त्सो हा भारत चीन सीमेवर आहे. ६० टक्के चीनमध्ये तर ४० टक्के भारतात आहे.पँगगॉंगच्या काचेसारख्या स्वछ पाण्यात पाय देण्याची हिंमत होत नव्हती, एवढं ते थंड होतं. आत जाऊन लगेचच बाहेर आलो. पण सभोवताली जे सौंदर्य होतं त्याला तोड नाही. एवढ्या शांत धीरगंभीर वातावरणात आपण निसर्गाशी एकरुप होऊन जातो. निसर्गाशी तादात्म्य पावण्याचे असे क्षण आपल्या आयुष्यात फार कमीच येतात. नाही का ? सभोववार बर्फाच्छादीत शिखरं आणि मध्ये हे तलाव. सगळं वातावरणच भारून टाकणारं. एक वेगळीच शांती मनाला लाभते. निसर्गाच्या एवढासमीप मी कधीच नव्हतो. मन शांत झालं. बहुतेक सहलसाथी उत्स्फुर्त प्रतिक्रीया देत होते. एकमेकाना मिठ्या मारत होते. सगळेच भारावून गेले होते. इथे कितीही वेळ थांबलं तरी ते कमीच असतं.

- नरेंद्र प्रभू
खूप मस्त ! खूप खूप आवडली ही पोस्ट !
ReplyDeleteनिनाद, धन्यवाद.
ReplyDelete