Go Back India Go Back अशी रस्त्यावर लिहिलेली वाक्य आणि “इंडीया हमे छोडेगा नही।“ हे मुक्तारचं म्हणणं मनात असतानाच तो दिवस काळोखात बुडाला तरी आम्हाला अजून बराच पल्ला पार करायचा होता. जोझीला मागे पडला तरी रात्र झाल्याने थंडीचा जोर वाढला होता. द्रास गावात चहाला थांबलो तेव्हा मोबाईलला रेंज होती. हॉटेल सियाचीनमध्ये सादिकभाईंना फोन करून आम्ही द्रासपर्यंत पोहोचलो असल्याचं सांगितलं. बाहेर झोंबरे वारे होते. काळोख पडला होता, द्रासचं वॉर मेमोरीयल आता काळोखातच दिसणार होतं. आत प्रवेश मिळणार की नाही? एवढ्या लांब येवून ते चूकलं तर मनाला हूरहूर लागून राहाणार होती. गाडीत बसलो, प्रवास पुन्हा सूरू झाला.
द्रासचं तपमान २००५ सालच्या हिवाळ्यात -६० (वजा साठ) या पातळीला गेलं होतं. जगातलं सर्वात जास्त थंडीचं वस्तीचं ठिकाण म्हणून द्रासची नोंद झाली होती. बाहेर अजून संधीप्रकाश होता, एका वळणावर गाडी बाजूला उभी करून ड्रायव्हरने आकाशात उंच गेलेला एक सुळका दाखवला ती टायगर हिल होती. कारगीलच्या युद्धभूमीवरून आमचा प्रवास सुरू होता. रस्त्याच्या एका बाजूला दहा-बारा फुट उंच अशी भिंत बांधलेली होती. कारगील युद्धात आपल्या सैन्याने या भिंती रातोरात बांधून काढल्या होत्या. आता आम्ही तोलोलिंग टेकड्यांचा परिसरात येवून पोहोचलो. सर्वत्र अंघाराचं राज्य पसरलं होतं. प्रकाश काय तो आकाशातल्या तारकांचाच होता. चंद्र उगवायला अजून अवकाश होता.
एका ठिकाणी गाडी थांबली, पाठोपाठ येणार्या आमच्या बाकी दोन गाड्याही थांबल्या. एवढ्यात “कौन है बे? क्यो रुके है उधर?”काळोखातूनच प्रश्न आले. गाडीतली लाईट लावली, बाहेरूनही टॉर्चचा उजेड आमच्यावर पडला. ऑपरेशन विजयच्या वॉर मेमोरीएयल समोर आम्ही उभे होतो.“नमस्कार जी, हम लोग मुंबईसे आये है, लॅन्डस्लायडींग के वजहसे हमे रास्ते मे देर हुई। अभी काफी देर हुई है, लेकीन आपकी इजाजत हो तो हम अंदर जाके दर्शन करना चाहते है।“ मी एका दमात आमची कैफियत मांडली. त्या उंच्यापुर्या शिख जवानाने आमच्या शब्दाला मान दिला. गाड्या आत घ्यायला सागितलं. एवढ्या काळोखात जाण्याचा प्रसंग आपल्यावर क्वचीतच येतो. वर आकाशात आपली आकाशगंगा स्पष्टपणॆ दिसत होती. आकाशदर्शनाचा आनंद घेतानाच जनरेटर सुरू झाले आणि संपुर्ण परिसर उजेडात न्हाऊन निघाला.
विजय स्मारकासमोर नतमस्तक होताना कारगील युद्धात कामी आलेल्या जवानांचा पराक्रम आठवून अंगावर शहारे, डोळ्यात पाणी, अभिमानाने छती भरून येणं अशा संमिश्र भावनांचा हलकल्लोळ माजला. उपस्थित जवान विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. जवळच्याच हॉल मध्ये समरप्रसंगाचे फोटो, पाकिस्तानी सैनिकांकडून हस्तगत केलेली शस्त्रास्त्र पहायला मिळाले. एवढा वेळ होवूनही त्या जवानांनी आम्हाला आग्रहपुर्वक एका छोट्या ऑडीटोरीयम मध्ये नेलं आणि कारगील युद्धविषयक अर्धा तासाचा एक माहितीपट दाखवला. आपल्या जनावांनी केलीलं ते स्वागत त्या कडाक्याच्या थंडीतही आम्हाला उब देवून गेलं. जवानांचे मनापासून आभार मानून आम्ही निरोप घेतला.
रात्रीचे दहा वाजून गेले होते. अजून दिड तासाचं अंतर बाकी होतं. आता चंद्र चांगलाच वर आला होता. चंद्र प्रकाशात नदीचा प्रवाह चमकत होता. एवढ्यात एक कोल्हा रस्ता ओलांडून गेला. कारगील भागात नाईट सफारीचा आनंद घेत आमची भ्रमंती चालू होती. एका ठिकाणी गाड्या थांबल्या, ब्रोचं रस्ता रुंदीकरणाचं काम चालू होतं. गाड्या जाण्या एवढा रस्ता मोकळा झाल्यावर प्रवास पुन्हा सुरू झाला. रात्री पावणेबारा वाजता हॉटेल सियाचीनमध्ये पोहोचलो. सादिकभाईं वाटच पाहात होते. या माणसाचं कौतूक करावं तेवढं थोडं. सादिकभाईंनी कारगील युद्धाच्यावेळी पत्रकार, नागरीक, वाटसरू अशा कित्तेकाना आपल्या हॉटेल सियाचीनमध्ये आसरा दिला होता. म्हणजे आता आम्ही आपल्या माणसात पोहोचलो होतो. जेवणं झाल्यावर अंथरूणावर पडलो, डोळे मिटले तरी भव्य हिमालय नजरेसमोरून हालत नव्हता. त्या रात्री निर्धास्त झोप लागली.
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment