Tuesday, April 21, 2015

त्याचं मनोहर असणं


आयुष्यातली एखादी गोष्ट करावी की करू नये? असा प्रश्न आपल्याला पडला असताना योग्य मार्गदर्शन करणारा तो ‘गुरू’. ती गोष्ट का केली पाहिजे? याचं पटेल असं उत्तर देणारा तो ‘तत्वज्ञ’ आणि त्या निर्णयाच्या परिणामांमध्ये साथ देणारा तो ‘मित्र’. मनोहर  गांगण माझ्यासाठी हे तिन्ही होता. हे ‘होता’ म्हणताना जीभ जड होतेय. मनोहरचं नसणं एखादा अवयव गमावण्यासारखं वाटतं मला. देण्याघेण्याच्या पलिकडे जावून फक्त मैत्रीखातर पाठीशी उभा राहणारा हा आधार आता नाहीसा झाला आहे. त्याचं ते ‘मनोहर’ असणं हाच माझ्यासाठी दिलासा असायचा...!

कस्टमच्या नोकरीचा राजिनामा देवून टुर कंपनी काढायचा जगाच्या दृष्टीने आतबट्ट्याचा वाटणारा निर्णय मी घेवू पहात होतो आणि असं करावं की करू नये या व्दंद्वात फसलेला असताना मनोहर गांगण या माझ्या मित्राने मला जीवनाला कलाटणी देणारा तो निर्णय घ्यायला मला मानसिक ताकद दिली. मनोहर सोडून ‘परळच्या गल्लीतल्या माझ्यासारख्या सरकारी नोकरीत स्थिर झालेल्याला’ ती नोकरी सोडायचा सल्ला कुणीही दिला नसता. त्याच्या ‘लेन्सला’ आजचा ‘ईशा टुर्स’चा उज्वल भविष्यकाळ त्या वेळीच दिसला होता.  मनोहर माझा भविष्यकार होता.

गेली सात-आठ वर्षं आम्ही अगोदरसारखे भेटू शकत नव्हतो. पण त्याचं लक्ष असायचं ‘टेली
लेन्स’मधून. जहांगीर दालनातील त्याच्या प्रदर्शन सोहळ्यासारख्या समारंभाना आम्ही आवर्जून एकत्र यायचो. ईशा टुर्सच्या सहलींना तो यायचा, नजर कशावर असली पाहिजे हे शिकायला मिळायचं ते त्याच्या बोलण्यातून आणि छायाचित्रातूनही. पट्टीचा छायाचित्रकार होता तो. कितीतरी गहीरे क्षण कॅमेर्‍यात बंदिस्त करून मनोहर कायमचा निघून गेला. न सांगता सवरता तो असा उठून गेला. माझ्यासारख्या शेकडो जणांना त्याने  प्रेरणा दिली, स्वत:च्या पायावर उभं केलं. आणि पुढच्या पायरीवर हात दिला, साथ दिली.

मी, मनोहरच्या घराचाच मित्र, माझ्या अनेक समस्यांवर विचार करण्यात किती रात्री त्याच्या घरी जागवल्या आम्ही. आणि हे सगळं हक्काने व्हायचं, हट्टाने व्हायचं. आता तो क्षितिजावरचा तारा बनलाय, दिवसाच्या उजेडातही लुप्त होणारा.


आत्माराम परब. 

Sunday, March 22, 2015

'आत्मा'कथन



मित्र हो...! म्हणता म्हणता एक तप पुर्ण झालं. बारा वर्षापुर्वी आजच्याच दिवशी ‘ईशा टुर्स ’ची
सुरुवात झाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा प्रवास खरंच अविस्मरणीय असा झाला. लडाखपासून सूरू केलेला हा प्रवास अनेक दिशांनी, अनेक मार्गांवर होत राहिला आणि ईशा टुर्स चे पर्यटक विदेशातील सहलींनाही जावू लागले.

बारा वर्षांपूर्वी लावलेला एक वेलू आता गगनावर जायला सज्ज झाला तो केवळ आपल्यासारख्या जिव्हाळ्याच्या पर्यटकांमुळेच. विस्तार भयास्तव नाव घेत नाही. पण आज मागे वळून बघताना दिसतात ते तुमचे सर्वांचे आशिर्वादाचे हात, सतत दिलेलं प्रोत्साहन आणि अगदी प्रत्येक पायरीवर दिलेला मदतीचा देकार.

पर्यटक मित्रांना फिरवायचं तर ते मळलेल्या वाटांवरून नाही तर लडाखसारख्या अनोख्या प्रदेशात,  स्कॅन्डेनेव्हीया सारख्या धृवप्रदेशात, अंदमान सारख्या सागरी व्दिपावर, पुर्वांचलासारख्या हिमालयीन रांगावर किंवा कैलास सारख्या शिखरांवर. जाणूनबुजून या वेगळ्या वाटा आम्ही धुंडाळल्या त्या तुम्ही वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळेच. प्रत्येक सहलीनंतर जसजशी आपली कौतूकाची आश्वासक थाप पाठीवर पडत गेली तसतसा आमचा उत्साह वाढत गेला आणि आता अगदी कुठेही गेलात तरी आम्ही तुमच्याबरोबर येणार म्हणणारे आपल्यासारखे पर्यटक हाच आमचा ऑक्सिजन होवून बसला आहे.
आपल्या सर्वांच्या सहवासात एक तप पुर्ण होत आहे आणि पुढच्या सहप्रवासाठी ‘ईशा टुर्स ’ सज्ज होत आहे. नेमक्या या वळणावर मनात असंख्य आठवणी दाटून येत आहेत. या आठवणींनीच आम्हाला समृद्ध केलं आहे. या प्रवासादरम्यान आम्ही कमावलं ते आपलं प्रेम आणि विश्वास. हे सर्व असचं कायम असू द्या. नवनवीन मार्गांवरच्या सहली तर आपण करीत राहूच पण पर्यटनाच्या वाटेवरची ही साखळी वृदींगत होताना आपला सर्वांचा त्यात सहभाग असेल, नाही असणारच अशी खात्री बाळगतो.

आपले नम्र

‘टीम ईशा’
आणि
आत्माराम परब

२२ मार्च २०१५ 

LinkWithin

Related Posts with Thumbnails