Sunday, September 9, 2012

मास्टर्सचा अभिप्राय



आजचा रविवार खुप छान गेला. म्हणजे तसा तो गेला नाही, तर तो अजूनही मनात ठाण मांडून बसलाय. असं होतं कधी कधी. पकडून ठेवावेसे वाटणारे क्षण शेवटी त्यांच्या स्वभावाप्रमाणे निसटून जातात.... पण आपण त्यांच्यात गुंतून जातो, मग मात्र ते क्षण संपतच नाहीत. तसाच आजचा रविवार.... दुपारी दोन वाजल्यापासूनचे पुढचे तीन तास अगदी झोपाळ्या वाचून झुलायचे असेच होते. त्याच काय झालं नुकताच लडखला जाऊन आलेल्या रेकी इंडीयाच्या ग्रुपने परममित्र आत्माराम आणि स्मिताला खास निमंत्रीत केलं होतं. लडाख सहलीची चित्रफीत आणि अनुभव कथन असा काहीसा कार्यक्रम होता. आरती ओवाळून आणि अक्षता टाकून मोठ्या दिमाखात स्वागत झालं.

लडाख प्रवासाची ती चित्रफित चालू असताना शामल दुर्वेजी आपले अनुभव सांगत होत्या, नंतर विनय वैद्य,डॉ.संदेश खेडेकर,लय दुर्वे आणि  कमलताई सावंत (सर्व रेकी मास्टर्स) यांनी आपले अनुभव सांगितले. सगळेच भरभरून बोलत होते. वातावरण भारावलेलं होतं.


शामलताई प्रसन्न मुद्रेत 
 आत्मारामनी लडाख आणि तिथल्या लोकांबद्दल मुख्यता त्यांच्या आनंदी स्वभावाबद्दल माहिती दिली. लडाखचा निसर्ग, तिथली सिंधू नदी, मुनलॅंड, पर्वत, दर्‍या, नद्या, तलाव आणि सैनिक सगळं पुन्हा एकदा डोळ्यासमोर यायला लागलं. लडाखबद्दल आम्ही नेहमीच लोकांना सांगत असतो, आज इशा टुर्सचे पर्यटक आम्हाला लडाखबद्दल सांगत होते. भरभरून बोलत होते. सहली दरम्यान सकारात्मक भानवा बाळगल्यामुळे त्यांचा आनंद शतगुणीत झाल्याचं जाणवत होतं. असा अभिप्राय ऎकायला मिळणं हे भाग्यच आहे. पण ही दाद देणारी मंडळीही तेवढीच महत्वाची असतात, मनमोकळं बोलणं आणि खळखळून हसणं हल्ली कमी होताना दिसतं......., आजचं चित्र वेगळं होतं. जगणं हे गाणं कसं होईल या बद्दल सतत जागृत राहून आपण आनंदीत असताना दुसर्‍याला सतत आनंदीत ठेवणारी ही मंडळी आज भेटली. आजूबाजूला कितीही वाईट गोष्टी घडत असल्या तरी अशी माणसं मोठा गाजावाजा न करता सकारात्मक गोष्टी करत राहातात म्हणूनच जग चालतं यावर विश्वास बसतो. आज पुन्हा तसा अनुभव आला.     
Thank you नरेंद्र प्रभू 
             

LinkWithin

Related Posts with Thumbnails