Saturday, April 2, 2016

ताक्सांग मोनास्ट्री



एखादी वास्तू अथवा नैसर्गिक भौगोलिक रचना ही त्या देशाची ओळख बनून राहते. त्या वास्तूचा इतिहास, तिचं पावित्र्य, देशवासीयांनी केलेली जपणूक अशा सर्वामुळे तिला एक वलय प्राप्त झालेलं असते. ती वास्तू त्या देशाची प्रतिमा बनून गेलेली असते. भूतानमधील ताक्संग मोनास्ट्रीचं स्थान असंच आहे. अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या भूतानमधले ताक्संग म्हणजे मानाचे ठिकाण. भूतानची ९० टक्के लोकसंख्या ही बौद्ध आहे. स्थानिकांची या वास्तूवर प्रचंड श्रद्धा आहे. आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाकडे गेल्या काही वर्षांत पर्यटकाचा ओघ वाढला आहे. मात्र येथे पोहोचायचे असेल तर बऱ्यापैकी परिश्रम करावे लागतात.

ताक्संग म्हणजे वाघाचे अर्थात टायगरचे वास्तव. एका कडय़ावर वसलेली ही मोनास्ट्री. येथे पोहोचायचे असेल तर किमान सहासात तास चालत जावे लागते. अगदी थोडय़ा अंतरापर्यंत घोडय़ांची सुविधा आहे. पण तीदेखील मर्यादितच आहे. चढउतार आहेत, पण तुलनेने सहज पार करता येण्यासारखं अंतर आहे. वातावरण खूपच आल्हाददायक असल्यामुळे येथे थकवा फारसा येत नाही. आणि आपली ऊर्जा टिकून राहते. महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे वैष्णवदेवीची यात्रा ही जशी पूर्णपणे कमर्शिअल झाली आहे. तसे येथे नाही. येथे येण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, असं भूतान नरेशांचेदेखील ठाम मत आहे. त्यामुळे ते स्वत:देखील चालतच येतात.

अर्थातच हे सारं करण्यासाठी मानसिक आणि मग शारीरिक तयारी हवी. तरच हे शक्य होईल. हजारपैकी केवळ दोनएकशेच पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. पण ताक्संग पाहिलं नाही तर भूतान पाहिलं नाही असं म्हणावं लागेल अशी जागा आहे. त्यामुळे जरा सायास करून जायला हरकत नाही.

या परिसरात पर्यटकांना राहण्याची परवानगी नाही. त्यामुळे परत यावेच लागते. बौद्ध भिख्खू आणि अभ्यासकांसाठी काही सुविधा आहेत. पण त्यासाठी परवानगी काढावी लागते. मोनास्ट्रीच्या आतमध्ये छायाचित्रणाला परवानगी नाही. संपूर्ण मोनास्ट्रीत बुद्ध आणि इतर मूर्ती आहेत. अर्थातच त्या मूर्ती म्हणजे चित्र आणि शिल्पाच्या माध्यमातून सांगितलेल्या कथाच आहेत. मोनास्ट्रीच्या आतमध्ये टायगर नेस्ट आहे. एका बौद्ध भिख्खूने येथे केलेली तपश्चर्येची छोटीशी खोली. ही व्यवस्थित जपून ठेवण्यात आली आहे. मोनास्ट्री दाखवण्यासाठी पारंपरिक मार्गदर्शक असतो. ही जागा फार काही मोठी नाही. फार फार तर दोनशे तीनशे लोकांना सामावून घेईल इतकीच. मोनास्ट्रीजवळ खाण्यापिण्याची कसलीही सोय नाही. वाटेत एक हॉटेल आहे. पण ते खूपच महाग असल्यामुळे सारं काही आपल्यासोबत घेऊन जावे. नमकिन चहा म्हणावा असा गुरुगुर हा भूतानचा पारंपरिक चहा येथे मोफत मिळतो.

केव्हा जाल : सर्वोत्तम कालखंड- मार्च ते जून कसे जाल : थेट पारोला विमानाने भारतात पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावरून फुन्श्तोलिंगला भूतानमध्ये प्रवेश.

आत्माराम परब 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails