व्हिएतनाम म्हटल्यावर आठवते ते अमेरिकेने छेडलेले युद्ध आणि
२० वर्षे त्याचा निकराने प्रतिकार करणारा हा छोटासा देश. पण अशा या संहारक
युद्धानंतरदेखील हा देश नव्याने उभा राहिला आहे. इतकेच नाही तर त्याच्या ठायी
असणाऱ्या अनेक प्रथा परंपरा तो जोपासतोय. आणि त्या पाहण्यासाठी सारं जग येथे
लोटतंय. दक्षिण चीन समुद्रात असणारे व्हिएतनाममधले होय यान हे छोटेसे गाव जगभरातील
पर्यटकांचे आकर्षण बनून राहिले आहे ते त्याच्या ‘लँटर्न सिटी’ या ओळखीमुळे. संपूर्ण गावात लटकणारे विविधरंगी आणि विविध आकारांतील शेकडो
प्रकारचे कंदील ही या शहराची ओळख झाली आहे. तेथे तयार होणारे हे पारंपरिक कंदील
पाहण्यासाठी, विकत घेण्यासाठी आणि या पुरातन शहराला भेट
देण्यासाठी अक्षरश: हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे येत असतात.
ही झाली या शहराची आजची ओळख झाली. पण साधारण १५ व्या
शतकापासून होय यान हे दक्षिण पूर्व अशियातील व्यापाराचे मध्यवर्ती केंद्र म्हणनूा
ओळखले जात होते. १५९५ पासून येथे व्यापाराची भरभराट होऊ लागली. मुख्यत: पोर्तुगीज
दर्यावर्दी अंतोनिया दी फारियाने केलेल्या प्रवासातून हे गाव प्रकाशात आले. चिनी
आणि जपानी व्यापाऱ्यांसाठी तर हे सर्वात सोयीस्कर व्यापारी केंद्र होतं. मात्र १८
व्या शतकात दा नांग या बंदरातून व्यापार करण्याचे विशेषाधिकारी फ्रेंचांना
दिल्यानंतर होय यानचे महत्त्व कमी झाले आणि पुढे २०० वर्षे ते दुर्लक्षित राहिले.
अर्थात त्यामुळेच येथील वास्तूंना धक्का लागला नाही. तेथील प्रथा परंपरा टिकून
राहिल्या. आणि १९९० मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत याचा समावेश केला.
होय यान म्हणजे शांतपणे चर्चा करण्याची जागा. या अर्थालाच
हे गाव सध्या जागत आहे. मूळ जुन्या गावाला अजिबात धक्का न लावता त्याचे जतन
करण्यात आले आहे. येथील लोकांना दुसरीकडे जागा देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. या
मूळ गावात कसलेही नवे बांधकाम केले जात नाही. जे आहे त्याचे संवर्धन करण्यात येते.
इतकेच काय पण या गावात भटकायचे असेल तर तुम्हाला पायीच फिरावे लागते. कारण येथे
तेल इंधनावर चालणारे कोणतेही वाहन वापरले जात नाही (अग्निशमन दलाची गाडी
सोडल्यास). संपूर्ण गावात पारंपरिक वस्तू तयार करणारी आणि विकणारी अनेक दुकानं
आहेत. पण मुख्य भर आहे तो कंदिलांवर. असंख्य प्रकारचे कंदील येथे तयार होतात.
रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव कंदिलांच्या प्रकाशात न्हाऊन निघते. तर दर पोर्णिमेला
सरकारतर्फे येथे कंदिलांसाठी तेल पुरवले जाते. तेव्हाचा नजारा पाहण्यासाठी आवर्जून
येथे यायला हवे. व्हिएतनाम तसे पर्यटनाच्या नकाशावर कमीच आहे. पण जे आहे ते या
देशाने मोठय़ा हिकमतीने पेश केले आहे. गनिमी युद्धासाठी रचलेलं भूमिगत गाव अजूनही
जपून ठेवलं आहे. रम्य समुद्र किनारे आहेत. बेटांची तर गणतीच नाही. खरे तर युद्धात
जवळपास पुरते कंबरडे मोडलेला हा देश. पण गेल्या चाळीस वर्षांत अनेक क्षेत्रांत
प्रगती करतोय. पर्यटनाच्या माध्यमातून त्यांच्या परंपरा जोपासतोय. आणि त्या परंपरा
पाहण्यासाठी सारं जग लोटतंय यातच त्यांच यश सामावलं आहे.
केव्हा जाल – पावसाळा टाळून (जुलै ते
सप्टेंबर) वर्षभर केव्हाही. कसे जाल – व्हिएतनाम-कंबोडिया अशी
ट्रीप करता येते. मुंबई-होचिमिन्ह (सायगॉव) विमानप्रवास, नंतर रस्त्याने होययान.
No comments:
Post a Comment