Friday, April 26, 2013

प्राणी-पक्षांचं नंदनवन: केनिया-टांझानिया




या भूतलावरची जंगलांची संख्या आणि आकार जसा कमी-कमी होत चालला आहे तशी प्राणी आणि पक्षांची संख्याही रोडावत चाललीय. बंदीस्त जागेत प्राण्यांची रवानगी करण्यात आलीय आणि त्यांच्या हक्काच्या जागेत मानवाने अतिक्रमण केलय. आपल्या देशात सर्वत्र दिसणारं हे दृष्य. प्राणी आणि पक्षी पाहाण्यासाठी जंगलात जावं आणि हिरमुसलं होवून परत यावं असं हल्ली सर्रास घडतं. पण आफ्रिका खंडातल्या केनिया आणि टांझानिया या देशात मात्र अगदी उलट आहे. या देशांमध्ये वन्यप्राणी अगदी सुखनैव वावरत आसतात. काही वेळा गाडीत किंवा हॉटेलमध्ये बंद असलेली माणसं आणि आजूबाजूच्या परीसरात उघड्यावर वावरणारे प्राणी अशी दृष्य पाहायला मिळतात. प्राणी आणि पक्षी डोळेभरून पाहायचे असतील तर या आफ्रिकन देशात गेलच पाहीजे.

वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या केनियाच्या जंगलात प्रवेश करण्यासाठी आपण जेव्हा नैरोबीच्या विमानतळावर उतरतो तेव्हा आपली उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली असते. विमानतळाच्या बाहेर पडून वाहनात बसल्यापासून अगदी पाचच मिनीटात आपल्याला जिराफ दिसू लागतात आणि मग प्राणी आणि पक्षांच्या दर्शनाचा हा सिलसिला सुरूच राहातो. हे नेत्रसुख घेण्यासाठीच तर आपण एवढ्यालांबवर आलेलो असतो. क्षितीजापर्यंत पसरलेलं खुरट गवत आणि त्यामुळेच लांबवर दिसणारा प्रदेश हे तिथलं खास वैशिष्ट्य. मुख्यत: अँबोसेली नॅशनल पार्क मध्ये तर हे असंच दृष्य असतं. केनिया आणि टांझानियाच्या सिमेवर असलेलं आफ्रिकेतील किलिमंजारो हे तेथील सर्वात उंच शिखरही त्याच भागात आहे. किलिमंजारोची लांबवर दिसणारी बर्फाच्छादीत शिखरं हे अँबोसेलीचं प्रमुख आकर्षण आहे तसंच तिथे दिसणारे आफ्रिकन हत्ती पाहाणं हा खरोखरीच आनंद सोहळा असतो. हत्ती आणि हत्तीण या दोघांनाही असणारे सुळे हे या ठिकाणच्या हत्तींचं खास वैशिष्ट्य आहे. विविध जातीच्या मसाई लोकांचं वास्तव्य या अँबोसेली नॅशनल पार्कच्या भोवती असून 400 वर्ग किलोमीटर एवचा भाग या पार्कने व्यापला आहे. या नॅशनल पार्क मघ्ये जंगली हत्तीबरोबरच वाईल्डबिस्ट, झेब्रा आणि चित्ता हे इथे नेहमी दिसणारे प्राणी आहेत. या प्राण्यांचं खुल्या वातावरणातलं दर्शन हा मनाला खुखावणारा अनुभव असतो.


विषूववृत्तावर असलेलं ओल पजेटा कंझरवंसी हे खाजगी संरक्षीत जंगल म्हणजे आफ्रिकन जंगल सफारीलं उत्तम ठिकाण आहे. 360 वर्ग किलोमीटर एवढा अव्याढव्य व्याप असलेलं हे जंगल अबेरडर आणि माऊंट केनियाच्या पायथ्याशी वसलेलं आहे. वन्य प्राण्यांचं जतन करण्याबरोबरच पर्यटकांना जंगल सफारीचा पुरेपूर आनंद देण्यासाठी ओल पजेटा पसिद्ध आहे. जंगलसफारीतून जंगलाचा विकास आणि संवर्धन कसा करावा याचं हे ठिकाण म्हणजे उत्कृष्ट नमूना आहे. पुर्व आफ्रिकेत असलेल्या दोन शिंगी काळ्या गेंड्यासाठी (Black Rhino) हे ठिकाण मुख्यत: ओळखलं जातं.  सिंह, रानरेडा, हत्ती, चित्ता आणि गेंडा हे बिग फाय म्हणून ओळखले जाणारे प्राणी इथे पहायला मिळतात. हिप्पो, जिराफ, बाबून, पटस माकड अशी अन्य मंडळीही आपलं दर्शन देतात. जॉन आणि जेन केयॉन यानी 1949 मध्ये या जंगलाचा कायापालट आणि संवर्धन करायला घेतलं आणि एक अप्रतीम संरक्षीत जंगल जगभरातील पर्यटकांना भटकंतीसाठी उपलब्ध झालं. तारांकीत तंबूमधून जंगलात उघड्यावर फिरणारे प्राणी न्याहाळण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो. पाणवठ्यावर येणारे प्राणी अगदी जवळून पाहाता येतात पण त्यांच्यापासून धोका उत्पन्न होवू नये याची पुरेपूर काळजी व्यवस्थापनाने घेतलेली असते. आपल्या राहण्याच्या ठिकाणासभोवती मोठे चर खणून त्यात विद्युत प्रवाह असलेलं तारांचं कुंपण असतं ज्यामुळे ते प्राणी आपली सीमा ओलांडत नाहीत आणि चरात असलेल्या कुंपणाचा अडसर आपल्या  नजरेसमोरही येत नाही.

ओल पजेटामध्ये असलेलं स्विटवॉटर चिंपांझी सेंटर हे चिंपाझीसाठी पसिद्ध असलेलं ठिकाण पाहिल्याशिवाय ती सफर पुर्ण होत नाही. गृहयुद्धाने ग्रस्त असलेल्या बुरूंडी या देशातून 1993 मध्ये तीन चिंपाझींची सुटकाकरून त्यांना या ठिकाणी आणलं गेलं, त्यानंतर चिंपाझिंचं या भागात स्थलांतर होत राहीलं आणि आजच्या घडीला तब्बल 43 चिंपाझी इथे वास्तव्य करून आहेत. सकाळ संध्याकाळ असणार्‍या जंगलसफारी बरोबरच रात्रीच्यावेळी जंगलसफारी करून इथल्या वन्यजीवनाचं निरीक्षण करता येतं. प्राण्यांना लागणारं गवत इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घेतल्याने इथले प्राणी स्थलांतर करत नाहीत हे सुद्धा या ठिकाणचं एक खास वैशिष्ट्य आहे.


नैरोबीच्या उत्तरेला 100 किलोमीटरवर असलेलं ऍबरडेअर नॅशनल पार्क हे मध्य केनियामधलं समुद्र सपाटीपासून 7000 ते 14000 फुट उंचीवर असलेलं घनदाट जंगल आहे. इतर ठिकाणी असलेल्या गवताळ जंगलामुळे तिथे प्राणी चटकन नजरेस पडतात पण या जंगलात ते पाणवठ्यावर आले तरच आपण पाहू शकतो. या ठिकाणी असलेल्या रिसॉर्टमध्ये राहून जवळच्या पाणवठ्यावर आलेले प्राणी पाहाणं एवढच काम इथे जाणारे पर्यटक करू शकतात. एका अर्थी आपण पिंजर्‍यात असतो आणि प्राणी बाहेर मुक्त संचार करीत असतात.  या समृद्ध जंगलात 250 च्यावर पक्षी वास्तव्य करून आहेत.


आत्तापर्यंत मोठमोठ्या प्राण्यांना पाहायला सरावलेले आपले डोळे पक्षीही शोधत असतात आणि लेक नकुरू सारख्या ठिकाणी गेल्यावर ती तहान नक्कीच शांत होते. खुप मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंची संख्या असलेलं हे जगातल्या काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. क्षारयुक्त पाण्यामुळॆ इथे फ्लेमिंगो आकृष्ट होतात. 188 वर्ग किलोमीटर भागावर पसरलेलं हे नॅशनल पार्क 1961 मध्ये संरक्षीत म्हणून जाहीर करण्यात आलं. फ्लेमिंगो प्रमाणे पेलिकन्स हे पक्षीही इथे मुबलक प्रमाणात पाहता येतात. लेक नकुरू हे पक्षांचं नंदनवन असलं तरी सिंह, झेब्रा, काळे आणि पांढरे गेंडे, हत्ती आणि रानरेडे इत्यादी प्राणीही आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. रोथशिल्ड या जिराफाच्या वेगळ्या जातींसाठीही  हे ठिकाण प्रसिद्ध आहे. केनियात जावून चित्ता पहायचा असेल तर तो या ठिकाणी दिसण्याची अधिक शक्यता असते. सिंह मात्र इथे सहज पाहायला मिळतात.  हरीण वर्गातील निलगाय सदृष्य इलांड (Eland) हा प्राणीही इथे पाहता येतो.

जिराफासरखीच लांब मान असलेला आणि मागच्या दोन पायांवर उभं राहून झाडाचा पाला खाणारा गेरेनुक (Gerenuk) हा प्राणी सांबूरू नॅशनल पार्क मध्ये पाहता येतो. त्या प्रमाणेच चित्यांची संख्या ही इथे खुप असून ते पहायला मिळण्याची शक्यता जास्त असते. इथल्या इवासो न्गिरो नदीमध्ये मोठ्याप्रमाणात  मगरी असून सोमाली आस्ट्रीच, ग्रे हेडेह किंगफीशर, सनबर्डस, बी इटर्स, मराबो स्टॉर्क, तावनी इगल, गिधाड, रोलर, तांबड्या आणि पिवळ्या चोचीचे  धनेश असे अनेक पक्षी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

520 वर्ग किलोमीटरवर पसरलेलं मसाई माराचं नॅशनल पार्क हे केनियामधलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. गवताळ प्रदेश असलेल्या या ठिकाणी जवळजवळ सर्व आफ्रिकन प्राणी पाहायला मिळतात, असं असलं तरी इथे मुख्यत: सिंहांचच राज्य आहे. स्थलांतर करून येणारे प्राणी या सिंहांच्या भक्क्षस्थानी पडतात. दिड पावणेदोन फुट एवढ्याच उंचीचं गवत आणि लांबवर एखादं झाड असल्याने या ठिकाणी आपण प्राण्यांना बारकाईने न्याहाळू शकतो. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मसाई मारा येथे वाईल्ड बिस्ट आणि झेब्रा यांच होणारं स्थलांतर (Migration)  पहाणं हा वेगळाच थरार आहे. लाखोंच्या संखेने हे प्राणी मारा नदी पार करून उत्तरेला येतात. नवीन उगवलेल्या गवताच्या शोधात हे प्राणी स्थलांतर करतात आणि दरवर्षी होणारं स्थलांतर पाहण्यासाठी हजारो पर्यटक तिकडे धाव घेत असतात. मसाई आणि सेरेंगेटी यांच्या मध्ये असलेल्या मारा नदीतून जेव्हा हे स्थलांतर होतं तेव्हा या प्राण्यांपैकी अनेकांची शिकार होते. तसेच मारा नदी मधल्या अनेक मगरी या प्राण्यांच्या पायांखाली तुडवल्या जातात. शिकारी प्राणी आणि शिकार होणारे प्राणी या दोघांमधलं घमासान, एकेमेकांवर कुरघोडी करण्याची कला, जीव वाचवण्याची आणि जीव जगवण्याची चाललेली धडपड या सर्व प्रकारांमुळे वेळोवेळी निर्माण होणारं नाट्य हे या सफरीतलं मुख्य आकर्षण असतं.    

टांझानिया मधलं सेरेंगेटी नॅशनल पार्क हे मसाई मारा पेक्षा सहा पटीने मोठं असलेलं ठिकाण असून याच भागातून जगातलं सर्वात जास्त प्राण्यांच स्थलांतर होतं. साधारण पणे 70 च्या वर मोठे प्राणी मिळून 500 प्रकारचे प्राणी पक्षी इथे पाहायला मिळतात. केनिया पेक्षा फार कमी प्रमाणात पर्यटक टांझानियात येत असल्याने इथलं प्राणी जीवन फार समृद्ध आहे आणि म्हणूनच इथे प्राण्यांची संख्याही जास्त आहे आणि आपण निवांतपणे त्याच्या दर्शनाचा आनंद घेवू शकतो.  

आफ्रिकेतील सात नैसर्गीक आश्चर्यापैकी एक असलेला गोरंगोरोचा प्रदेशही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर ठिकाणी तप्त ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो बाहेर पडतो आणि आसमंतात पसरतो पण या ठिकाणी ज्वालारस जमिनीखालीच वाट करून गेला आणि त्या भागात नैसर्गिक खोल भाग तयार झाला. त्याच ठिकाणी तलावाची निर्मिती झाली. लाखो वर्षापुर्वी इथे अनेक प्राण्यांची उत्पत्ती झाली. पण इथल्या प्राण्यांचं स्थलांतर होत नसल्याने त्यांच्यात वांशीक दोष निर्माण होत आहेत.

 

लेक मनियारा हे टांझानिया मधलं आणखी एक ठिकाण, जीथे तीनशेच्यावर स्थलांतरीत पक्षी पहावयास मिळतात. इथल्या सिंहांचं वैशिष्ट्य म्हणजे ते झाडांवर चढून बसतात. काही वेळा सिंहाचं अख्ख कुटुंब झाडावर बसलेलं दिसून येतं. टंझानियामधून जाणारी  रिप्ट व्हाली हे आणखी आगळंवेगळं स्थान. सिरीया, लेबनॉन, जॉर्डन, इस्त्राईल, कांगो, टांझानिया आणि मोझांबीक अशा देशात पसरलेली ही व्हाली असून मृत समुद्राचा भाग यातच आहे. साधारणत: सहा हजार किलोमीटरचा प्रदेश या व्हालीने व्यापलेला आहे.

वन्य जीवनाने समृद्ध असलेल्या या प्रदेशात फेरफटका मारताना ते क्षण कायमचे कॅमेर्‍यात बंदीस्त करायचे असतील तर एका कमेर्‍याने ते साध्य होईलच असे नाही. विशेषत: लेक नकुरू सारख्या ठिकाणी गेल्यावर पक्षांच्या क्लोजअपसाठी टेले लेन्स ची आवश्यकता भासते त्याच वेळी निसर्गदृष्यासाठी वाईडअँगल लेन्सची जरूरी असते. लेन्सची अदलाबदल करताना काही वेळा एखादं अप्रतिम दृष्य किंवा क्षण कायमचा निसटून जातो. दूरवर दिसणार्‍या प्राण्यांना कॅमेर्‍याने टिपण्यासाठी 100-400 ची झुम लेन्स किंवा 400 किंवा 500 ची फिक्स लेन्स बरोबर असलीच पाहीजे आणि त्या बरोबरच वाईड अँगल लेन्सची आवश्यकता भासतेच. जीप सफारी, प्रवास या दरम्यान होणार्‍या धावपळीत लेन्स तसंच इतर साधनांची पडझड होवू नये म्हणून जॅकेट किंवा मोठे आणि भरपूर खिसे असलेली पॅंट अशावेळी असावी. धावत्या किंवा चालू असलेल्या वाहनातून फोटो काढायचे असल्याने बिन बॅग किंबा छोटीशी उशी बरोबर बाळबण्यास हरकत नाही. पक्षांची किंवा प्राण्यांची विशिष्ट हालचाल टिपण्यासाठी कंट्युनीअस मोड मध्ये फोटो काढून मग त्यातील चांगला फोटो निवडावा. वन्यजीवनाची आवड असलेल्या पर्यटकांनी केनिया टांझानियाची सफर जरूर करावी, ती सहल आयुष्यात कायमची स्मरणात राहील अशी होईल यात शंकाच नाही.


नरेन्द्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails