Thursday, May 31, 2012

लडाख - द्रास-कारगील



Go Back India Go Back अशी रस्त्यावर लिहिलेली वाक्य आणि इंडीया हमे छोडेगा नही। हे मुक्तारचं म्हणणं मनात असतानाच तो दिवस काळोखात बुडाला तरी आम्हाला अजून बराच पल्ला पार करायचा होता. जोझीला मागे पडला तरी रात्र झाल्याने थंडीचा जोर वाढला होता. द्रास गावात चहाला थांबलो तेव्हा मोबाईलला रेंज होती. हॉटेल सियाचीनमध्ये सादिकभाईंना फोन करून आम्ही द्रासपर्यंत पोहोचलो असल्याचं सांगितलं. बाहेर झोंबरे वारे होते. काळोख पडला होता, द्रासचं वॉर मेमोरीयल आता काळोखातच दिसणार होतं. आत प्रवेश मिळणार की नाही? एवढ्या लांब येवून ते चूकलं तर मनाला हूरहूर लागून राहाणार होती. गाडीत बसलो, प्रवास पुन्हा सूरू झाला.

द्रासचं तपमान २००५ सालच्या हिवाळ्यात -६० (वजा साठ) या पातळीला गेलं होतं. जगातलं सर्वात जास्त थंडीचं वस्तीचं ठिकाण म्हणून द्रासची नोंद झाली होती.  बाहेर अजून संधीप्रकाश होता, एका वळणावर गाडी बाजूला उभी करून ड्रायव्हरने आकाशात उंच गेलेला एक सुळका दाखवला ती टायगर हिल होती. कारगीलच्या युद्धभूमीवरून आमचा प्रवास सुरू होता. रस्त्याच्या एका बाजूला दहा-बारा फुट उंच अशी भिंत बांधलेली होती. कारगील युद्धात आपल्या सैन्याने या भिंती रातोरात बांधून काढल्या होत्या. आता आम्ही तोलोलिंग टेकड्यांचा परिसरात येवून पोहोचलो. सर्वत्र अंघाराचं राज्य पसरलं होतं. प्रकाश काय तो आकाशातल्या तारकांचाच होता. चंद्र उगवायला अजून अवकाश होता.

 एका ठिकाणी गाडी थांबली, पाठोपाठ येणार्‍या आमच्या बाकी दोन गाड्याही थांबल्या. एवढ्यात कौन है बे? क्यो रुके है उधर?काळोखातूनच प्रश्न आले. गाडीतली लाईट लावली, बाहेरूनही टॉर्चचा उजेड आमच्यावर पडला. ऑपरेशन विजयच्या वॉर मेमोरीएयल समोर आम्ही उभे होतो.नमस्कार जी, हम लोग मुंबईसे आये है, लॅन्डस्लायडींग के वजहसे हमे रास्ते मे देर हुई। अभी काफी देर हुई है, लेकीन आपकी इजाजत हो तो हम अंदर जाके दर्शन करना चाहते है। मी एका दमात आमची कैफियत मांडली. त्या उंच्यापुर्‍या शिख जवानाने आमच्या शब्दाला मान दिला. गाड्या आत घ्यायला सागितलं. एवढ्या काळोखात जाण्याचा प्रसंग आपल्यावर  क्वचीतच येतो. वर आकाशात आपली आकाशगंगा स्पष्टपणॆ दिसत होती. आकाशदर्शनाचा आनंद घेतानाच जनरेटर सुरू झाले आणि संपुर्ण परिसर उजेडात न्हाऊन निघाला.                 
     
विजय स्मारकासमोर नतमस्तक होताना कारगील युद्धात कामी आलेल्या जवानांचा पराक्रम आठवून अंगावर शहारे, डोळ्यात पाणी, अभिमानाने छती भरून येणं अशा संमिश्र भावनांचा हलकल्लोळ माजला. उपस्थित जवान विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. जवळच्याच हॉल मध्ये समरप्रसंगाचे फोटो, पाकिस्तानी सैनिकांकडून हस्तगत केलेली शस्त्रास्त्र पहायला मिळाले. एवढा वेळ होवूनही त्या जवानांनी आम्हाला आग्रहपुर्वक एका छोट्या ऑडीटोरीयम मध्ये नेलं आणि कारगील युद्धविषयक अर्धा तासाचा एक माहितीपट दाखवला. आपल्या जनावांनी केलीलं ते स्वागत त्या कडाक्याच्या थंडीतही आम्हाला उब देवून गेलं. जवानांचे मनापासून आभार मानून आम्ही निरोप घेतला.

रात्रीचे दहा वाजून गेले होते. अजून दिड तासाचं अंतर बाकी होतं. आता चंद्र चांगलाच वर आला होता. चंद्र प्रकाशात नदीचा प्रवाह चमकत होता.  एवढ्यात एक कोल्हा रस्ता ओलांडून गेला. कारगील भागात नाईट सफारीचा आनंद घेत आमची भ्रमंती चालू होती. एका ठिकाणी गाड्या थांबल्या, ब्रोचं रस्ता रुंदीकरणाचं काम चालू होतं. गाड्या जाण्या एवढा रस्ता मोकळा झाल्यावर प्रवास पुन्हा सुरू झाला. रात्री पावणेबारा वाजता हॉटेल सियाचीनमध्ये पोहोचलो. सादिकभाईं वाटच पाहात होते. या माणसाचं कौतूक करावं तेवढं थोडं. सादिकभाईंनी कारगील युद्धाच्यावेळी पत्रकार, नागरीक, वाटसरू अशा कित्तेकाना आपल्या हॉटेल सियाचीनमध्ये आसरा दिला होता. म्हणजे आता आम्ही आपल्या माणसात पोहोचलो होतो. जेवणं झाल्यावर अंथरूणावर पडलो, डोळे मिटले तरी भव्य हिमालय नजरेसमोरून हालत नव्हता. त्या रात्री निर्धास्त झोप लागली.       

नरेंद्र प्रभू  

लडाख - जोझीला पास 


Tuesday, May 29, 2012

लडाख - जोझीला पास


श्रीनगरच्या हाऊसबोट वरचं रात्रीचं जेवण खासच होतं. गोश्त आणि शामी कबाब अजून विसरता येत नाहीत. सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती तरी स्वच्छ हवेमुळे पहाटेच जाग आली. पक्षांच्या किलबिलाटामुळे कधी एकदा बाहेर पडून आसमंत न्याहाळतो असं झालं होतं. एका बाजूला सरोवर आणि दूसर्‍या बाजूला पर्वत रांगा, सुर्य किरणं येऊ घातलेली, माझा मित्र मानव हाऊसबोटीच्या सज्ज्यात ट्रायपॉड लाऊन मासे टीपणार्‍या पक्षांची छायाचित्र घेण्यात मश्गूल होता. इकडे काठावर फुलांची फुलण्यासाठी अहमहमीका लागली होती. येणार्‍या शिशीरा आधी त्यांना फुलून घ्यायचं होतं जणू. यवढ्यात समोरून शिकार्‍यांची हालचाल दिसायला लागली. ते आमच्या दिशेनेच येत होते. आमच्या हाऊसबोट मधल्या वास्तव्याची वार्ता त्यांच्या पर्यंत पोहोचली होती तर. गेले दोन-तीन महिने संचारबंदीमुळे तिकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने हे हातावर पोट असणारे अगदी धायकूतीला आले होते. आम्ही एकूण अकरा आणि हे विक्रेतेही जवळ जवळ तेवढेच. शाली, तयार कपडे, कीचेन्स, कलाकुसरीच्या वस्तू, केशर, कहावा हर तर्‍हेच्या वस्तू त्यांनी आणल्या होत्या, पण माझं लक्ष वेधून घेत होती ती शिकार्‍यातून ओसंडून वाहणारी फुलं.

आजचा आमचा प्रवास द्रास मार्गे कारगील पर्यंतचा होता. सामानाची आवरा आवर करून मंडळी तयार झाली. गाड्या आल्या, सामान लावलं जात होतं. उन्हाचा त्रास नको म्हणून एका झाडाखाली सावलीला मंडळी थांबली होती. जवळच्याच क्वॅलीस गाडीच्या बोनेटवर कुणी पर्स तर कुणी हातातली पिशवी ठेवली होती. समोरून एक काश्मिरी मध्यमवयीन गृहस्थ(?) आला, सगळ्यांचा अकला काढत, उद्धार करीत त्याने त्या पिशव्या उधळून लावल्या. काल पासून आम्हाला कसलाच उद्रेक पाहायला मिळाला नव्हता, याने झलक दाखवली. या लोकांची मानसिकताच तशी झालीय, तो आमच्याकडे इंडीयन म्हणून पाहात होता. सगळा राग डोळ्यात उतरला होता. कसं होणार? यानाच पर्यटकांची गरज जास्त आहे. काश्मिर जळतय, हे त्यात तेल ओतताहेत. आमच्या सारखे जे फुटकळ पर्यटक आले त्याना हे असं दर्शन, वा..रे मेहमाननवाजी... आमचे ड्रायव्हर दूरून हे सगळ बघत होते. पण काहीच बोलले नाहीत. कदाचीत त्यांच्या मनात आमच्या विषयी वेगळॆ भाव नसावेत. आम्हाला हाच जोझीला पार करायचा होता, खर्‍या जोझीलाची काळजी वाटत नव्हती.  

गाड्या चालू झाल्या, वाटेत गंधरबाल, कंगन ही करफ्यूग्रस्त गावं लागली. श्रीनगर ते सोनमर्ग नव्वद किलोमीटरचा प्रवास तसा धोक्याच्याच होता पण तो भाग मागे पडला. नितांत सुंदर अशा काश्मिरच्या खोर्‍यातून आमचा प्रवास सूरू होता. जागोजागी रानफुलांचा गालीचा पसरलेला होता आणि रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदानी लगडलेल्या बागा लक्ष वेधून घेत होत्या. दोन तसात सोनमर्ग आलं, चला आता मानवनिर्मित धोक्यांची शक्यता जवळजवळ नाही. नैसर्गिक अडथळे हा तर आमच्या साहसी पर्यटनाचाच भाग होता. 
दुपारचं जेवण आटोपून आम्ही जोझीलाच्या दिशेने निघालो. आमच्या लेह-लडाख सफरीची हे खरी सूरवात होती. जोझीला पास...... हाच तो पास जिथे कारगील युद्धाच्यावेळी जवानांच्या फलटणीच्या फलटणी युद्धातूर होवून निघाल्या होत्या. आज आणि उद्या आम्ही त्याच प्रांतातून मार्गक्रमण करणार होतो. कॅप्टनमोड ला गाड्या थांबवण्याच्या सुचना मी ड्रायव्हरना दिल्या होत्या पण बालतालच्या बरोबर समोर आमच्या गाड्या थांबल्या. काय झालं? एकदोन मिनीटं गाडीतच थांबून खाली उतरलो तेव्हा समजलं पुढे लॅन्डस्लायडींग झालं आहे. चला आता बसा. मी कमेरा घेवून आजूबाजूचे फोटो काढत होतो.
 पुढे दूरवर येणार्‍या ट्रकची लांबच लांब रांग लागली होती. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (BRO) जवान रस्ता मोकळा करण्यात मग्न होते. तीथेच अर्धा-पाऊण तास गेला. रस्ता मोकळा झाला. आमची एक गाडी पुढे निघून गेली, मागे राहिलेल्या आमच्या दोन्ही गाड्यात जवान चालक होते. समोरून येणार्‍या वाहनांचा अडथळा नको म्हणून आमच्या ड्रायव्हरने कच्च्या रस्त्याला गाडी घातली. त्या उभ्या चढावर गाडी चढेना, मग आम्ही खाली उतरलो. मागून ढकलत एक एक गाडी वर चढवण्याचा प्रयत्न झाला पण तीसर्‍या प्रतत्नानंतर तो नाद सोडून पुन्हा मुळ मार्गावर परतावरं लागलं.
जोझीला पासची नागमोडी वळणं आणि खाली बालताल.
 त्या व्यापात एक तास वाया गेला. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते आणि बराच पल्ला पार करायचा होता. द्रास, कारगील आता काळोखतच येणार याची काळजी वाटायला लागली. रस्ता जेमतेम असल्याने गाड्या वेगातही धावू शकत नव्हत्या, पुढे एका वळणावर ती आमची पुढे गेलेली गाडी उभी होती. आमच्या गाड्याही थांबल्या. दोन्ही तरूण चालकांची बिनपाण्याने हजामत होत होती. पुढे जायचा नाद त्याना भारी पडला होता.   

नरेंद्र प्रभू 

लडाख - द्रास-कारगील

LinkWithin

Related Posts with Thumbnails