Sunday, August 8, 2010

पर्यटकांनो घाबरू नका.




(आत्माराम परब यांचा, लोकसत्ता, रविवार, ऑगस्ट २०१० मधला लेख)
atmparab2004@yahoo.com 
जम्मू-काश्मीरचा लेह-लडाख हा प्रांत आणि निसर्गाशी खेळ हे एक समीकरणच बनलं आहे. वर्षांचे सहा-सात महिने इतर जगापासून तुटलेला हा प्रांत उन्हाळ्याच्या चार-पाच महिन्यांतच रस्ता मार्गाने देशाच्या संपर्कात राहतो. श्रीनगर-लेह हा जवळजवळ ४४० कि.मी. असलेला राष्ट्रीय महामार्ग आणि लेह-मनाली हा दुसरा राष्ट्रीय महामार्ग या दोनच बाजूंनी या प्रांतात जाता येतं. जसे हे मार्ग शीतकाळात बंद असतात तसच इथलं जीवनही या दरम्यान ठप्प झालेलं असतं. तीबेटच्या पठारावरून येणारे अतीशीत वारे जसे त्या दरम्यान संपूर्ण लडाख खोऱ्याला गारठवून टाकतात तसंच उत्तर-पूर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पूर्वेला हिमालयाच्या रांगा आणि गाभात असलेल्या ट्रान्स हिमालयन रांगांवर फक्त बर्फाचंच राज्य असतं. अशा विषम परिस्थितीमुळे हिवाळ्यात एखादं तृणपातही तिथे शोधूनसुद्धा सापडत नाही. पण आता चालू असलेल्या उन्हाळ्याच्या दिवसांत तिथलं वातावरण आल्हाददायक असतं. याच दिवसांत तिथला भाग देशी विदेशी पर्यटकांनी गजबजलेला असतो. इशा टूर्सचे पंचावन्न पर्यटक कालच अकरा दिवसांची सहल यशस्वीरीत्या पूर्ण करून परतले आणि एक दिवस उलटायच्या आत लेहमध्ये झालेल्या ढगफुटीची बातमी येऊन थडकली. बातम्यांसाठी आसुसलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने मग लगेच त्या बातमीचा ताबा घेतला आणि लोकांना घाबरवून सोडण्याची आणखी  एक संधी साधली.
लडाखशी मी स्वत: गेली पंधरा-सोळा वर्षे सर्वार्थाने बांधला गेलो आहे, समरस झालो आहे. आता झालेली ढगफुटी नि:संशय असाधारण अशीच आहे पण ती अपवादात्मकही आहे. लडाख प्रांतात संपूर्ण वर्षांत पाच मि.मी. एवढाच पाऊस पडतो आणि बहुतांशी तो बर्फवृष्टीच्या स्वरूपात असतो. नजीकच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे. राजस्थानात येणारे पूर आणि आता लेहला झालेली ही ढगफुटी हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. या काळात पर्वतमाथ्यावरचं बर्फ वितळून तिथल्या नद्यांना पाणी आलेलं असतं. पृथ्वीची रचना होताना सर्वात नंतर अस्तित्वात आलेला असा हा भाग असल्याने तिथली माती ठिसूळ आहे. दरवर्षी बर्फ वितळतं तेव्हा बरोबर मातीही घेऊन येतं. तिथले पर्वत कच्चीढांग (ठिसूळ मातीचे) म्हणूनच ओळखले जातात. गुरुवारच्या रात्री झालेल्या ढगफुटीने आलेल्या प्रपाताबरोबर हे कच्चे कडेही वाहून खाली आले आणि सखल भागांत असलेल्या इमारतींवर कोसळले. लडाखला झाडं अपवादात्मक ठिकाणीच बघायला मिळतात. कारण हा रूक्ष असाच प्रदेश आहे आणि त्यातच त्या भागाचं सौंदर्य लपलेलं आहे.
पंधरा वर्षांपूर्वी मुंबई-लडाख-मुंबई असा मोटरसायकलवरून मी केलेला प्रवास म्हणजे एक वेडं साहसच होतं. त्या वेळेचे आलेले अनुभव हा या लेखाचा विषय नाही पण त्या पहिल्याच भेटीत मी लडाखच्या प्रेमात पडलो आणि त्यानंतर निरंतर जातच राहिलो. शंभरहून अधिक वेळा लडाखला गेलो असेन पण अजूनही लडाखविषयीचं मला असलेलं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही. मी जो काही उभा आडवा भारत देश फिरलो त्यातलं जे ठिकाण कायमचं मनात घर करून राहिलं ते म्हणजे लडाख. ज्याचं नाव घेताच माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात ते म्हणजे लडाख. चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या पण डोक्यावर आठय़ा नसलेल्या हसतमुख लोकांचा प्रांत म्हणजे लडाख आणि शेकडो मैलपर्यंत झाडं सोडाच पण तृणपात्यांचासुद्धा पत्ता नसलेला, पण देखणा असलेला प्रदेश म्हणजे लडाख. अख्खा देश, अगदी श्रीनगरसारखा भागही जेव्हा उष्णतेने हैराण झालेला असतो तेव्हा शीतल गारवा साठवून असलेला इलाखा म्हणजे लडाख. वनश्रींची शोभा नाही. त्यामुळे फुलं नाहीत पण रंगाच्या असंख्य छटा लेवून प्रथमदर्शनीच प्रेमात पाडणारं ते म्हणजे लडाख आणि घर, अंगण, खिडकीमधूनही बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घडवतं ते लडाख. अशा या लडाख प्रांतात मी जवळजवळ सर्व ऋतूंमध्ये गेलो आहे आणि मला ते बदलणारं लडाखचं रूप कायमच भुरळ घालत आलं आहे. 
लडाखी जनता सोडली तर त्यांच्यापेक्षा संख्येने जास्त असलेले आपले जवान त्या परिस्थितीला तोंड देतच सीमेचं रक्षण करत असतात. खारदुंगला पासवरून सियाचीनकडे जाणारा रस्ता हा जगातला सर्वात उंच मोटरवाहतुकीचा रस्ता, तिकडे आपले जवान खडा पहारा देत असतात. अशा दुर्गम भागात राहून देशाच्या सीमांचं रक्षण करणं किती कठीण आहे हे त्या ठिकाणी गेल्याशिवाय समजत नाही. 
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (ब्रो) हा लष्कराचा एक विभाग कशाप्रकारे काम करतो हे प्रभाकर पेंढरकर यांच्या रारंग ढांगया पुस्तकात चांगल्या प्रकारे आलं आहे. कित्येक मैल मनुष्यवस्ती नाही आणि मध्येच कुठेतरी ब्रोची माणसं रस्ते बनवत असतात ते पाहून हे इथे आले कुठून असा प्रश्न पडतो. दुर्गम म्हटलं तरी आपली जीप त्यांनी बनवलेल्या ज्या रस्त्यांवरून जाते तेव्हा तो रस्ता इथल्या मुंबई-पुण्याच्या रस्त्यांपेक्षा चांगला असल्याचं आपणाला जाणवतं. या रस्त्यांचीपण कहाणीच असते. किंबहुना तिथला प्रत्येक दगड जर जिवंत झाला तर तो आपल्या कितीतरी हृदयद्रावक कहाण्या वर्णन करून सांगेल. काय आहे दरवर्षी, अगदी दरवर्षी हे रस्ते नीट करताना, त्या आधी ते बर्फाखालून शोधून काढताना आपले शेकडो सैनिक प्राणाला मुकतात. सगळीकडे फक्त पांढरंशुभ्र बर्फ पसरलेलं असतं तेव्हा त्यांच्या लक्षातच येत नाही की कुठे रस्ता आहे आणि कुठे ठिसूळ बर्फ. मग एखादा कटर, ट्रॅक्टर खोल दरीत जवानांसहित कोसळतो आणि कपाळमोक्ष होतो. रस्त्याच्या कडेला अशा जवानांच्या आठवणीप्रीत्यर्थ जागोजागी दगड लावलेले आहेत. हेच ब्रोचे जवान आता बंद पडलेले रस्ते तात्काळ सुरू करतील यात शंकाच नाही. ‘‘ईश्वर आणि सैनिक या दोघांचे आपल्याला संकटाच्या वेळीच स्मरण होते. त्या संकटात मदत मिळाल्यानंतर ईश्वराचा विसर पडतो आणि सैनिकाची उपेक्षा होते.’’ 
इथले लोकही तसेच जिवाला जीव देणारे. लेह शहर, खरं तर ते खेडंच पण बाजारपेठ आणि त्यातल्या त्यात जवळ जवळ असलेल्या इमारती, घरं, हॉटेल्समुळे हा भाग सतत गजबजलेला असतो. याच भागात ढगफुटीच्या पाण्याचा लोंढा आल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात त्याची  दखल घेतली गेली. मालमत्तेचं आणि जीविताचं नुकसान झालं. ढगफुटीमुळे नुकसान होतं ते उत्तरांचल आणि हिमाचलमध्ये, लडाखमध्ये प्रथमच असं घडतं आहे. काही मिनिटांतच सर्व घडून जातं. दोन वर्षांपूर्वी कारगील-लेह मार्गावर लेहपासून ६० कि.मी.वर असलेल्या ससपूल भागात पाण्याच्या प्रवाहात रस्त्यावरचा पूल वाहून गेला होता आणि मी पर्यटकांसोबत अडकलो होतो. लेहहून माझा मित्र पद्मा ताशी याला बोलावून घेतलं. त्याने गाडय़ा आणल्या आणि आम्ही पुढे लेहला रवाना झालो. या वर्षीही मे महिन्यात अनपेक्षित अशी बर्फवृष्टी झाली आणि लेह-मनाली मार्ग बंद झाला. 
दरवर्षी मे महिन्यातच वाहतुकीसाठी खुला होणारा लेह-मनाली मार्ग यावर्षी पंधरा जूननंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला. पर्यटकांना तो मार्ग बंद झाल्याने सहल संपल्यावर पुन्हा श्रीनगर मार्गे परतावं लागलं. 
म्हणूनच लडाखचं पर्यटन हे साहसी पर्यटनात मोडतं. आपण निसर्गाशी एकरूप झालो तर त्याचा आनंद नक्कीच उपभोगता येतो. लेहच्या परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल यात मला तरी शंका वाटत नाही. तिथे जाणाऱ्या पर्यटकांच्या ओघात खंड पडता कामा नये.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails