Monday, June 14, 2010

फेस्टीव्हलचं लडाख


आसेतू हिमालय आणि कच्छ ते कमरूप पर्यंत अफाट पसरलेल्या आपल्या देशात  हिंदुस्थानी संस्क़ृतीची जपणूक बर्‍याच ठिकाणी जाणीवपुर्वक केलेली दिसून येते. कुंभमेळा, पुरीची जगन्नाथ यात्रा, कोलकात्याची दुर्गापुजा, राजस्थानचा पुष्कर मेळा तसच कर्नाटकातल्या दसर्‍यापासून अहमदाबादच्या पतंग महोत्सवा पर्यंत अनेक सण-महोत्सव असेकाही भव्य स्वरूपात साजरे केले जातात की आता जगभरातील पर्यटकांनी त्याची नोंद घेऊन तेथे गर्दी करायला सुरवात केली आहे. पण या सगळ्यापासून भौगोलीक आणि ऎतिहासीक असं वेग़ळं स्थान असणारा आपल्या भारतातील जम्मू-काश्मीर राज्यातला एक प्रांत आहे आणि तो म्हणजे लडाख. तुलनेने शांत आणि लोकसंखेने विरळ असलेल्या या प्रांताचं वैशिष्ठ्य असं की कमालीच विषम हवामान आणि भौगोलीक परिस्थिती असूनही इथल्या लोकांनी आपली संस्कृती प्राणापलीकडे जपून ठेवली आहे. माध्यमांच्या कोलाहलात आणि इव्हेंटच्या गदारोळात एरवी झाकोळून गेलेल्या सण उत्सवाला लडाख मध्ये मात्र थारा नाही. अजूनही अगदी परंपरागत पद्धतीने तिथले उत्सव साजरे केले जातात.

नैसर्गिक अडथळे आणि निसर्गाच्या रौद्र रुपामूळे सहा-सात महिने देशाच्या इतर भागांपासून वेग़ळ्या पडलेल्या लडाखमध्ये मात्र उत्सवाची कमी नाही. उतूंग हिमालय, काराकोरम रांगा आणि हिंदूकूश पर्वत यांच्या कुशीत वसलेला हा प्रांत आपले सण आणि उत्सव वर्षभर साजरे करत असतो. शीतकाळात लग्न समारंभ आयोजित केले जातात तर मे महिन्यापासून ऑक्टोबर पर्यंत तुलनेने थंडी कमी असताना बुद्ध पौर्णिमा, हेमिस फेस्टीव्हल, लामायुरू, फ्यॅंग, सिंधू फेस्टीव्हल असे सण साजरे केले  जातात. या वार्षीक उत्सवांच्या दरम्यान आपल्याला लडाखी संसकृतीचं दर्शन घेता येतं. पोलो ग्राऊंड वर पोलोच्या स्पर्धा भरतात तर मॉनेस्ट्रीज जवळच्या खुल्या मैदानात लडाखी नाच गाण्यांचा मनोसोक्त आनंद लुटता येतो. आजूबाजूच्या प्रदेशातून आलेल्या लडाखी जनसामान्यांची ही एक जत्राच असते. विवीध खेळ, नाच, वाद्य यांच्या सुरेख संगमातून एक अनोखा सांसकृतीक कार्यक्रम आकाराला येतो आणि जमलेला समुदाय त्याचाच एक भाग बनून जातो. लडाखी पारंपारीक वेशभुषा आणि स्त्रियांनी परिधान केलेले दागदागीने हे या वेळचं आणखी एक वैशीष्ट्य असतं. हे जड़-जवाहीर वजनानेही खुप जड असतं. याच समारंभादरम्यान लोक एकमेकांना बर्‍याच कालावधी नंतर भेटलेले असल्याने ते त्यांच्यासाठी एक वार्षिक स्नेहसंमेलनच असत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. चारशे ते हजार वर्ष जुन्या बौद्ध गुंफा हे त्यांच मुख्य ठिकाण असलं तरी स्वातंत्र्य दिनाचा सोहळाही उत्सवासारखाच साजरा केला जातो. आजूबाजूच्या दोनशे किलोमीटरच्या भागातून आलेल्या लोकांनी इथलं पोलो मैदान फुलून गेलेलं असतं. एकूण काय मे ते स्प्टेंबर हे महिने लडाखी फेस्टीव्हलचेच असतात.         
  
रंगीबेरंगी कपडे परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे लोक,  इथल्या गुंफ़ांचे आकर्षक आकार आणि रंगसंगती, भव्य बुद्ध मुर्त्या आणि परंपारिक भित्तीचित्रकला, इश्वर चिंतनात मग्न असलेले इथले लामा आणि धर्मगुरू, संपुर्ण वातावरणात भरून राहीलेली शांतता, बघावं तिकडे चंदेरी वर्ख चढवलेली हिमाच्छादीत शिखरं, क्वचीतच दिसणारा झाड झाडोरा पण असंख्य रंगछटांनी रंगवल्यासारखे दिसणारे डोंगर आणि दर्‍या, आकाशात भरून राहिलेली निळाई आणि हे सगळ जणू जवळून पहायला चांदोबाचा हात धरून खाली उतरलेल्या चांदण्या, या सगळ्यावर उठून दिसणारा व्रतस्थ तपस्वी असा शांती स्तूप. मधूनच वाहणारी आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात वास करून राहिलेली सिंधूनदी, पुढे तिच्या हातात हात घालायला आलेली झंस्कार नदी, त्यांच्या काठावर वसलेलं जीवन आणि थोडीशीच हिरवाई, या सर्वाच्या आनंदात भर घालणारे गडद रंगाचे पक्षी, मरमॅट सारखे दर्शन दुर्लभ प्राणी, गोठलेले धबधबे आणि प्रवाह, अथांग सागराची आठवण करून देणारा पॅंगॉंग लेक, जिवाची बाजी लावून देशाच्या सिमांचं रक्षण करणारे आपले बहाद्दर जवान. कारगील युद्धाची रणभुमी, द्रासचं युद्ध स्मारक, जगातील सर्वात उंच मोटारवाहतूकीचा रस्ता असलेला खारडूंग पास. लडाखचं आणखी एक आश्चर्य म्हणजे तिथलं हुंडरचं वाळवंट, तिथले सॅन्ड्यूंस्, नुब्रा व्हाली. BRO ने निर्माण केलेले रस्ते. चांद्रभुमीचा आभास निर्माण करणारी मुनलॅन्ड. हिमालयाची भव्यता त्याच्या थेट शिखरावरच जाऊन पहाण्यात धन्यता आहे म्हणून जगभरातील पर्यटकांचा तिकडे ओघ वाहत असतो. नजरेच्या एका टप्प्यात येणारा मैलोंमैलाचा प्रदेश आणि एवढं सगळं भव्य-दिव्य पाहिल्यावर आपण यत्किंचीतही नाही अशी होणारी जाणीव हे सगळं अनुभवायला तिकडेच गेलं पाहीजे, गर्दी पासून दूर. अधिक माहितीकरीता ९८९२१८२६५५ किंवा ९३२००३१९१० वर संपर्क साधावा.              
                                  

2 comments:

  1. chan post aahe "ladaakh" baddal, itki mahiti navhati mala

    Add it to marathisuchi http://www.marathisuchi.com - free marathi link sharing website and marathi blogs aggregator.

    Once your website is added to marathisuchi then your posts will be automatically published on marathisuchi.com

    ReplyDelete
  2. आभारी, मराठी-सुचीवर हा ब्लॉग लवकरच लिंक करू. धन्यवाद.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails