Saturday, May 15, 2010

पर्यटनाची ऎसी की तैसी




















आज श्री. ज्ञानेश्वर मुळे  यांचा बदलता भारत बदलते विश्व : मालदीव ते मलबार : नवे दुवे! हा लेख वाचला. नेहमीप्रमाणे हा लेखही मनाला भावला. मुळेसाहेबांनी याच लेखात इतर बाबींबरोबरच आपल्या देशातील पर्यटनाविषयी नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे. ते लिहितात मालदीवच्या रिजॉर्ट बेटांवरला अनुभव जसा अद्वितीय आहे तसाच केरळमधला बॅकवॉटरचा अनुभव अनुपमेय आहे. दोन्हीही आनंद समुद्राशी आणि पाण्याशी जवळीक असणारे. रिजॉर्टमध्येही संपूर्ण जगापासून अलिप्त होण्यातले सुख आहे, तसेच सुख हाऊस बोटीतून बॅकवॉटरमधल्या मुक्कामातही आहे. साम्य स्थळांबरोबरच आपली काही वैगुण्येही नजरेत येतात. आलेप्पीत ज्या स्थानकावर हाऊसबोटी पर्यटकांना घ्यायला किंवा सोडायला येतात तिथे तलाव आणि तलावाच्या आसपासचे वातावरण हळूहळू घाणेरडे होत चालले आहे. जलपर्णीचा प्रादुर्भाव इतक्या प्रचंड प्रमाणात आहे, की १०-२० वर्षांत बॅकवॉटरऐवजी जलपर्णीचा हिरवा गालिचा दाखविण्यासाठी पर्यटकांना आणावे लागेल. मालदीवमध्ये पर्यटकांची प्रचंड आवक असूनही, स्पीड बोटींचा वावरही खूप असूनही समुद्राचे पाणी धक्क्यांजवळसुद्धा स्फटिकवत पारदर्शक असते. त्यामुळे माशांची विविधता कल्पनेपलीकडची आहे आणि जिथे पाहू तिथे समुद्र म्हणजे एखाद्या नैसर्गिक मत्स्यालयासारखा समोर येतो. पर्यावरण चळवळीत जोपर्यंत हाऊस बोटींचे मालक, तिथले कर्मचारी आणि पर्यटक सर्वाचा सहभाग घेत नाही तोपर्यंत बॅकवॉटरची घसरण होत राहणार आहे. शेजारी छोटा असला तरी त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.

त्या मालदीव बेटावर त्यांच्या लोकसंखेच्या दुपटीहून अधिक पर्यटक भेट देतात. काय आहे तीथे? केवळ पणीच पाणी आणि तुटपुंजी जमीन, असं ससलं तरी योग्य नियेजनामुळे आणि देशप्रेम तसच शिस्तीमुळे त्यांना ते शक्य होतं. हे वाचताना मला तीन वर्षापुर्वी अनुभावालेलं नैनीताल आणि आसपासचा परिसर आठवत राहीला आणि हे पोस्ट लिहावस वाटलं. निसर्गाने भरभरून दिलं असताना आपल्याला मात्र त्याची पर्वा नाही, किंबहूना अनास्थेपोटी आता ते धन आपण गमावून बसणार की काय अशी भिती वाटायला लागली आहे. मे महिन्यात हिमालयाचं मनोहारी दर्शन घ्यावं, उकाड्यावर उतारा म्हणून नैनीतालला जावं म्हणून आम्ही तिकडे गेलो. चिड पाईन च्या  वृक्षांच्या साथीने फिरताना मनाला आनंद होत होताच पण दुरवरची शिखरं आणि प्रदेश दिसत नव्हता कारण वातावरणात धुरकटपणा भरून राहिला होता. ड्रायव्हरशी बोलताना लक्षात आलं की साधारण एप्रिल पासून हे असच वातावरण असतं. त्याचं कारण जंगलाला लागणारे वणवे  अख्खा परिसर धुराने व्यापून राहिलेला. चिडाच्या झांडांना छेद देऊन त्याचा चिक वनखात्यामार्फत जमा केला जातो. त्या झाडाची वाळलेली पानं आणि हा चिक ज्वालाग्राही असतो. जरा कुठे ठिणगी पडली की बघता बघता त्याचं वणव्यात रुपांतर होतं. मोठमोठी झाडं आणि जंगल आगिच्या भक्षस्थानी पडतं. याला जबाबदार कोण? वाटसरूंनी टाकलेलं एखादं विडीचं थोटूक जसं याला कारणीभूत ठरतं तसच मुद्दामहून लावलेली आग याला कारण असते. जंगलातले प्राणी पकडण्यासाठी एकाबाजूला आग लावून दुसर्‍याबाजूला जाळी लावली जातात, विनासाय्यास शिकार जाळ्यात येते पण वनसंपत्तीची अपरिमीत हानी होते.

नुकतेच माझे काही मित्र नैनीतालला जाऊन आले. अशा प्रकारच्या वातावरणात आणखी भर पडली आहे हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. हे असं किती दिवस चालणार? हे वणवे कधी विझणार? निसर्ग दयामाया दाखवत नाही हे आपणाला कधी समजणर? आपल्या देशातलं पर्यटन वाढलं पाहिजे तर अशा गोष्टींना आपणच पायबंद घातला पाहिजे. आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड चालवतो आहोत, आता तरी जागे होऊया.       
               
   

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails