Tuesday, May 4, 2010

घराबाहेर पडा !


मे महिना म्हणजे सुट्टीचे दिवस. मुला-बाळाना सुट्ट्या पडतात, मग घरातली जेष्ठ मंडळी सुद्धा सुट्टीच्या मुडमध्ये येतात. सुट्टीत काय करायचं याचं प्लानींग सुरू होत.   काही हुशार मंडळीनी ते आधीच केलेलं असतं. अशी मंडळी सुट्टीचीच वाट बघत असतात. जसजसा प्रयाणाचा दिवस जवळ येवू लागतो तसतसे ते तयारीत मग्न होतात. हे मधले दिवसही खुप मजेशीर असतात. उत्साह अगदी टिपेला पोहोचलेला असतो. आता निघायचं, मज्जा करायची, गरमी पासून सुटका होणार, बर्फात खेळणार, नदित डुंबणार, समुद्र किनारी फेरफटका मारणार, गड-किल्ले सर करणार,  एक ना अनेक विचारांनी चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात. सगळं लक्ष केवळ त्या एकाच गोष्टीवर केंद्रीत झालेलं असतं.

 काहीजण असे असतात की त्यानी काहीच ठरवलेलं नसतं. अचानक सुट्ट्या तोंडावर येतात. मित्र-मैत्रीणी, सखे-सोयरे, शेजारी-पाजारी भटकंतीला निघून जातात तेव्हा मंडळी खट्टू होतात. आपण कुठे जायचं? कुणाबरोबर जायचं? कसं जायचं? असे प्रश्न पडतात. सहली फुल्ल झालेल्या असतात. बस, रेल्वे, विमानाची तिकीटं मिळणं दुरापास्त होतं. आता ही सुट्टी अशीच संपणार की काय? अशी भिती वाटू लागते. काही जणांना खर्चिक प्रवास जमण्यासारखा नसतो. लांबचा पल्ला गाठणं प्रकृतीमुळे शक्य होत नाही. त्यानी काय करावं? स्वःताला घरात कोंडून घ्यावं? मुळीच नाही. मित्रहो चला घराबाहेर पडा. जवळपास कुठेही जा. आपल्या रहाण्याच्या ठिकाणापासून शंभर किलोमिटरच्या अंतरात असं एखादं तरी ठिकाण असेल की जिथे जाण्यानं तुम्ही आनंदीत व्हाल. जवळपासच्या जंगलात वनभोजनाला जा किंवा समुद्रकिनारी जावून पाण्यात पाय बुडवा वाळूत खेळा. घराबाहेर पडणं महत्वाचं मग ते जवळ असो अथवा लांब. मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात, शांत वातावरणात आप्तांसोबत चार घटका जरी घालवल्या तरी मन प्रसन्न होईलच पण तणाव, थकवा दूर निघून जाईल. काय मंडळी मग जाताय ना सहलीला? पडताय ना घराबाहेर? जाच तुम्ही.... जावून या आणि मला कळवा काय काय मज्जा केली ते.

नरेंद्र प्रभू                              

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails