Saturday, May 22, 2010

तेथे कोणाचे चालेना........!

निसर्गापुढे सगळेच हतबल असतात. या वर्षीचा लडाखचा हंगाम नुकताच सूरू झाला. स्मिताच्या नेतृत्वाखाली १७ मे ला पहिली बॅच श्रीनगर मार्गे लेह ला जाण्यासाठी निघाली सुद्धा, पण एरवी सरळपणे जाणार्‍या आमच्या सहलीची वाट यावेळी निसर्गाने आडवली. जोझिला पास परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाल्याने ग्रुपला श्रीनगर येथेच तीन दिवस अडकून पडावं लागलं. जोझिला बंद असला तरी गुलमर्ग, पहलगाम इथे ग्रुप फिरला आणि त्यानी काश्मिर मधल्या पर्यटनाचा आनंद घेतला. जोझिला मार्गे रस्ता खुला झाल्याबरोबर काल स्मिताची बॅच कारगिलला पोहोचली आणि आज लेहला पोहोचत आहे.
हिमालया सारख्या ठिकाणी सफरीवर जाताना या गोष्टींची तयारी ठेवावीच लागते. कधी लॅन्ड स्लायडींग तर कधी जोरदार बर्फवृष्टी यांचा सामना करावा लागतो. असो आता हि बॅच ते अडथळे पार करून लेहला पोहोचली आहे. अशा वेळी ग्रुपलिडरच्या नेतृत्वाची कसोटी लागते. या वर्षीची ही पहिलीच बॅच घेऊन स्मिता निघाली तेव्हाच मी तीच्या धैर्याला सलाम केला होता. हॅटस् ऑफ टू यू स्मिता...!             

Wednesday, May 19, 2010

रोहतांग बोगद्याचे काम लवकरच मार्गी लागणार

हिमाचल प्रदेशातील मनाली आणि अतिशय दुर्गम भागात वसलेले लाहोल यांच्या दरम्यान वर्षभर संपर्क खुला राहण्यासाठी ८.८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची सुरुवात येत्या जून महिन्यात होणार आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांनी ही माहिती दिली.हिमालयात समुद्रसपाटीपासून १३ हजार ५० फूट उंचीवरील प्रसिद्ध रोहतांग खिंडीखालून हा १० मी. रुंदीचा बोगदा खणण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये १४५८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची कोनशिला बसविली होती. मात्र त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. आता या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार असून, फेब्रुवारी २०१५ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे.
मनाली आणि लाहोल व स्पिटी जिल्ह्य़ाचे मुख्यालय असलेल्या केईलाँग दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळे ५५ किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा कालावधीही चार तासांनी कमी होणार आहे, असे धुमल यांनी सांगितले.
हिवाळ्यातील जोरदार हिमवृष्टीमुळे रोहतांग, कुन्झाम आणि बारा लापचा ला या हिमालयातील खिंडी बंद होतात. त्यामुळे लाहोल व स्पिटी, पंगी आणि किल्लर या भागाचा जवळजवळ ५ ते ६ महिने जगाशी संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे नव्या बोगद्यामुळे या अतिशय दुर्गम भागातील अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
धुमल यांनी सांगितले की, हिंदुस्थान तिबेट आणि दार्चा-शिंकोला या मार्गावर अशाच प्रकारचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रदेशाचा संपूर्ण देशाशी वर्षभर संपर्क सुरू राहील. या मार्गामुळे लडाख भागाला अत्यावश्यक बाबींचा पुरवठा करण्यासाठी एक अतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार आहे.   



साभार लोकसत्ता

    Saturday, May 15, 2010

    पर्यटनाची ऎसी की तैसी




















    आज श्री. ज्ञानेश्वर मुळे  यांचा बदलता भारत बदलते विश्व : मालदीव ते मलबार : नवे दुवे! हा लेख वाचला. नेहमीप्रमाणे हा लेखही मनाला भावला. मुळेसाहेबांनी याच लेखात इतर बाबींबरोबरच आपल्या देशातील पर्यटनाविषयी नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे. ते लिहितात मालदीवच्या रिजॉर्ट बेटांवरला अनुभव जसा अद्वितीय आहे तसाच केरळमधला बॅकवॉटरचा अनुभव अनुपमेय आहे. दोन्हीही आनंद समुद्राशी आणि पाण्याशी जवळीक असणारे. रिजॉर्टमध्येही संपूर्ण जगापासून अलिप्त होण्यातले सुख आहे, तसेच सुख हाऊस बोटीतून बॅकवॉटरमधल्या मुक्कामातही आहे. साम्य स्थळांबरोबरच आपली काही वैगुण्येही नजरेत येतात. आलेप्पीत ज्या स्थानकावर हाऊसबोटी पर्यटकांना घ्यायला किंवा सोडायला येतात तिथे तलाव आणि तलावाच्या आसपासचे वातावरण हळूहळू घाणेरडे होत चालले आहे. जलपर्णीचा प्रादुर्भाव इतक्या प्रचंड प्रमाणात आहे, की १०-२० वर्षांत बॅकवॉटरऐवजी जलपर्णीचा हिरवा गालिचा दाखविण्यासाठी पर्यटकांना आणावे लागेल. मालदीवमध्ये पर्यटकांची प्रचंड आवक असूनही, स्पीड बोटींचा वावरही खूप असूनही समुद्राचे पाणी धक्क्यांजवळसुद्धा स्फटिकवत पारदर्शक असते. त्यामुळे माशांची विविधता कल्पनेपलीकडची आहे आणि जिथे पाहू तिथे समुद्र म्हणजे एखाद्या नैसर्गिक मत्स्यालयासारखा समोर येतो. पर्यावरण चळवळीत जोपर्यंत हाऊस बोटींचे मालक, तिथले कर्मचारी आणि पर्यटक सर्वाचा सहभाग घेत नाही तोपर्यंत बॅकवॉटरची घसरण होत राहणार आहे. शेजारी छोटा असला तरी त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.

    त्या मालदीव बेटावर त्यांच्या लोकसंखेच्या दुपटीहून अधिक पर्यटक भेट देतात. काय आहे तीथे? केवळ पणीच पाणी आणि तुटपुंजी जमीन, असं ससलं तरी योग्य नियेजनामुळे आणि देशप्रेम तसच शिस्तीमुळे त्यांना ते शक्य होतं. हे वाचताना मला तीन वर्षापुर्वी अनुभावालेलं नैनीताल आणि आसपासचा परिसर आठवत राहीला आणि हे पोस्ट लिहावस वाटलं. निसर्गाने भरभरून दिलं असताना आपल्याला मात्र त्याची पर्वा नाही, किंबहूना अनास्थेपोटी आता ते धन आपण गमावून बसणार की काय अशी भिती वाटायला लागली आहे. मे महिन्यात हिमालयाचं मनोहारी दर्शन घ्यावं, उकाड्यावर उतारा म्हणून नैनीतालला जावं म्हणून आम्ही तिकडे गेलो. चिड पाईन च्या  वृक्षांच्या साथीने फिरताना मनाला आनंद होत होताच पण दुरवरची शिखरं आणि प्रदेश दिसत नव्हता कारण वातावरणात धुरकटपणा भरून राहिला होता. ड्रायव्हरशी बोलताना लक्षात आलं की साधारण एप्रिल पासून हे असच वातावरण असतं. त्याचं कारण जंगलाला लागणारे वणवे  अख्खा परिसर धुराने व्यापून राहिलेला. चिडाच्या झांडांना छेद देऊन त्याचा चिक वनखात्यामार्फत जमा केला जातो. त्या झाडाची वाळलेली पानं आणि हा चिक ज्वालाग्राही असतो. जरा कुठे ठिणगी पडली की बघता बघता त्याचं वणव्यात रुपांतर होतं. मोठमोठी झाडं आणि जंगल आगिच्या भक्षस्थानी पडतं. याला जबाबदार कोण? वाटसरूंनी टाकलेलं एखादं विडीचं थोटूक जसं याला कारणीभूत ठरतं तसच मुद्दामहून लावलेली आग याला कारण असते. जंगलातले प्राणी पकडण्यासाठी एकाबाजूला आग लावून दुसर्‍याबाजूला जाळी लावली जातात, विनासाय्यास शिकार जाळ्यात येते पण वनसंपत्तीची अपरिमीत हानी होते.

    नुकतेच माझे काही मित्र नैनीतालला जाऊन आले. अशा प्रकारच्या वातावरणात आणखी भर पडली आहे हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. हे असं किती दिवस चालणार? हे वणवे कधी विझणार? निसर्ग दयामाया दाखवत नाही हे आपणाला कधी समजणर? आपल्या देशातलं पर्यटन वाढलं पाहिजे तर अशा गोष्टींना आपणच पायबंद घातला पाहिजे. आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड चालवतो आहोत, आता तरी जागे होऊया.       
                   
       

    Tuesday, May 11, 2010

    लडखला जाताय? ही काळजी घ्याच!

    काय मंडळी लडाखला जायची तयारी करताय? जोझिला खिंड नुकतीच वहातूकीसाठी खुली झाली. मनाली-रोहतांगपास-लेह हा मार्गही लवकरच खुला होईल. तुम्ही इशा टुर्सचे पर्यटक अहात ना, मग तुमची योग्य ती काळजी घेतली जाईलच पण काही गोष्टी तुम्हीच करू शकता, त्या जर आपण केल्या तर आपला प्रवास आणि एकूणच सहल खुप छान होईल, संस्मरणीय होईल. काय काय करायचं बघा.

    फोटो असलेलं ओळखपत्र 

    फोटो असलेलं एक ओळखपत्र सोबत असणं जरूरीचं आहे. विमानतळावर प्रवेश करताना, सीमावर्ती भागात जाताना सुरक्षा एजंसी कडून त्याची मागणी होऊ शकते.  

    सर्व प्रथम तुम्हाला लागणारे कपडे. स्वेटर, जॅकेट, विंडचिटर, थर्मल इनर्स, कानटोपी, उलनचे हातमोजे, पायमोजे, एखादी शाल अथवा मफलर हे आवश्यक आहे.

    लडाखला थंड हवामानात, विशेषतः उंच असलेल्या पासमध्ये वरील सर्व गरमसामान लागतच. वारा लागत असताना आणि पासमध्ये असताना कानटोपी मुळीच काढू नका.

    पुर्ण बाह्यांचे ( full Sleeve) कपडे, टॅप, टी शर्टस्.
       
    जेव्हा जॅकेट किंवा स्वेटर घातलेला नसेल तेव्हा पुर्ण बाह्यांचे कपडे घाला. लडाखच्या उन्हात कातडीचा रंग लगेच बदलतो. शिवाय वार्‍यापासूनही संरक्षण मिळते.

    प्रखर उन्हापासून डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी काळा चष्मा जरूर लावावा (Sun Glasses) मात्र तो निळ्या रंगाचा नसावा.

    हिमालयात अल्ट्राव्हायलेटॅ किरणांचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. बर्फावरून परावृत्त होणारी अशी किरणंसुद्धा डोळ्यांना हानीकारक असतात.

    कोल्ड क्रिम आणि सन्स् क्रिम लोशन जरूर घेऊन जा.

    रात्रीच्या आणि पहाटेच्यावेळी  कोल्ड क्रिम आणि उन्हात असताना सन्स् क्रिम लोशन लावल्याने चामडी, ओठ फुटणं, कातडी जळणं असे प्रकार होणार नाहीत.    

    विजेरी (Torch with extra  cells) बरोबर ठेवा.

    लडाखला उपलब्ध करून दिलेली वीज ही डीझेल वापारून जनरेटर मार्फत तयार केलेली असते. ए ग्रेड हॉटेलमध्ये आपली राहण्याची सोय असली तरी क्वचीत प्रसंगी वीज जाते. काही कारणाने आपण वाटेत अडकून पडलात तर अशा ठिकाणी विजेरीचा खुप उपयोग होतो.    

    मोठा रुमाल अथवा कपडा.
    हिमालयातल्या रस्त्यांची खात्री देता येत नाही. बर्‍याच ठिकाणी दरडी कोसळल्या मुळे अथवा खराब रस्यांमुळे प्रवासात धुळीचा त्रास होवू शकतो. जास्त धूळ उडत असेल तर असा रुमाल नाकावर धरा म्हणजे धुळीचा त्रास होणार नाही. ही गोष्ट फार छोटी वाटते पण एकदा का धुळीचा त्रास झाला तर मग सर्दीचा त्रास संपुर्ण सहलभर होत रहातो.

    तुम्हाला लागणारी औषधं बरोबर घ्या. क्रोसीन, ऑन्डेम, निओस्प्रीन जवळ बाळगा.

    लडाखच्या औषधाच्या दुकानात आपल्याला लागणारी औषधं आणि तेच ब्रॅंड मिळतीलच याची खात्री नसते, म्हणून ही औषध इथूनच घेवून जा. प्रवासात गाडी लागत असेल तर प्रवास सुरू होण्याच्या आधी किमान अर्धातास तरी ऑन्डेम घेणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. .        

    ड्रायफ्रुट, इतर खाणं जवळ बाळगा.

    काही मधुमेहाने आजारी असतील तर त्यानी प्रवासा दरम्यान भुक लागली असता खाण्यासाठी ड्रायफ्रुट, इतर खाणं बरोबर घ्यावं. सहलीत जेवणाच्या वेळा पाळल्या जातात पण असाधारण परिस्थितीत वेळ होवू शकतो.

    एक्स्टेंशन बोर्ड किंवा स्पाईक गार्ड.

    डिजीटल कॅमेरा, आय् पॉड, मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनीक वस्तू वापरत असाल तर त्या चार्ज करण्यासाठी एक्स्टेंशन बोर्ड बरोबर घ्याच. हॉटेलच्या खोलीत असलेली कनेक्शंस कमी पडू शकतात.

    टोपी, छोटी बॅग, सुई दोरा अशा सारख्या नेहमीच्या प्रवासात लागणार्‍या वस्तू आपण घ्यालच. तर मंडळी लडाखसारख्या ठिकाणी जाताना वर सांगितलेल्या वस्तू जरूर घ्या गैरसोय टाळण्यासाठी ते आवश्यक आहे. शुभास्थे पंथानः......! 

    नरेन्द्र प्रभू

                          

    Tuesday, May 4, 2010

    घराबाहेर पडा !


    मे महिना म्हणजे सुट्टीचे दिवस. मुला-बाळाना सुट्ट्या पडतात, मग घरातली जेष्ठ मंडळी सुद्धा सुट्टीच्या मुडमध्ये येतात. सुट्टीत काय करायचं याचं प्लानींग सुरू होत.   काही हुशार मंडळीनी ते आधीच केलेलं असतं. अशी मंडळी सुट्टीचीच वाट बघत असतात. जसजसा प्रयाणाचा दिवस जवळ येवू लागतो तसतसे ते तयारीत मग्न होतात. हे मधले दिवसही खुप मजेशीर असतात. उत्साह अगदी टिपेला पोहोचलेला असतो. आता निघायचं, मज्जा करायची, गरमी पासून सुटका होणार, बर्फात खेळणार, नदित डुंबणार, समुद्र किनारी फेरफटका मारणार, गड-किल्ले सर करणार,  एक ना अनेक विचारांनी चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात. सगळं लक्ष केवळ त्या एकाच गोष्टीवर केंद्रीत झालेलं असतं.

     काहीजण असे असतात की त्यानी काहीच ठरवलेलं नसतं. अचानक सुट्ट्या तोंडावर येतात. मित्र-मैत्रीणी, सखे-सोयरे, शेजारी-पाजारी भटकंतीला निघून जातात तेव्हा मंडळी खट्टू होतात. आपण कुठे जायचं? कुणाबरोबर जायचं? कसं जायचं? असे प्रश्न पडतात. सहली फुल्ल झालेल्या असतात. बस, रेल्वे, विमानाची तिकीटं मिळणं दुरापास्त होतं. आता ही सुट्टी अशीच संपणार की काय? अशी भिती वाटू लागते. काही जणांना खर्चिक प्रवास जमण्यासारखा नसतो. लांबचा पल्ला गाठणं प्रकृतीमुळे शक्य होत नाही. त्यानी काय करावं? स्वःताला घरात कोंडून घ्यावं? मुळीच नाही. मित्रहो चला घराबाहेर पडा. जवळपास कुठेही जा. आपल्या रहाण्याच्या ठिकाणापासून शंभर किलोमिटरच्या अंतरात असं एखादं तरी ठिकाण असेल की जिथे जाण्यानं तुम्ही आनंदीत व्हाल. जवळपासच्या जंगलात वनभोजनाला जा किंवा समुद्रकिनारी जावून पाण्यात पाय बुडवा वाळूत खेळा. घराबाहेर पडणं महत्वाचं मग ते जवळ असो अथवा लांब. मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात, शांत वातावरणात आप्तांसोबत चार घटका जरी घालवल्या तरी मन प्रसन्न होईलच पण तणाव, थकवा दूर निघून जाईल. काय मंडळी मग जाताय ना सहलीला? पडताय ना घराबाहेर? जाच तुम्ही.... जावून या आणि मला कळवा काय काय मज्जा केली ते.

    नरेंद्र प्रभू                              

    LinkWithin

    Related Posts with Thumbnails