Friday, February 19, 2010

आनंद पक्षीनिरीक्षणाचानिसर्गाच्या सान्निध्यात जायला कुणाला आवडत नाही? डोंगरदऱ्या धुंडाळत, रानावनात फिरत पशू-पक्ष्यांचं निरीक्षण करणं हा खूप लोकांचा आवडता छंद आहे. अनेकां

च्या सहलींमध्ये जंगल सफारी ही प्रायॉरिटी असते. त्याचबरोबर आता पक्षी निरीक्षणाकडेही लोकांचा ओढा वाढू लागलाय. बर्ड वॉचिंगचा मनसोक्त आनंद कसा घ्यायचा याविषयी सांगताहेत तुषार निदंबुर...
......

कोणत्याही परिसरात पक्ष्यांचं अस्तित्व असतंच. शहर, उद्यान, जंगलाची सीमा, जंगलं, वाळवंट, तलाव, नद्या, समुद, पर्वत अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांचा वावर असतो. ते पाहण्याचा आनंद घेण्यासाठी मात्र तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी आणि कान टवकारलेले असायला हवेत!

पहाटेपूवीर् थोडा वेळ आधीपासून पक्षी जागे होऊ लागतात आणि त्यांचा चिवचिवाट सुरू होतो. जास्तीत जास्त पक्षी याच वेळेत दिसतात. सकाळी दहा-अकरापर्यंत भरपूर पक्षी दिसतात. ऊन वाढू लागलं की मात्र ते आडोसा शोधू लागतात. साधारण दुपारच्या वेळी 'र्बड्स ऑफ प्रे' किंवा रॅप्टर प्रकारचे पक्षी (गरुड, घार, गिधाड) दिसतात. दुपारी १-३ या वेळेत फारसे पक्षी दिसत नाहीत. दुपारी ४-६ पर्यंत थोडेफार पक्षी दिसू शकतात. सूर्यास्ताबरोबरच पक्ष्यांचाही दिवस मावळतो आणि ते आपल्या घरट्यात परततात.

पक्षीनिरीक्षणासाठी जंगलासारखं उत्तम ठिकाण नाही. जंगलाची हद्द सुरू झाली की पहाटेच्या वेळेस पक्ष्यांचे आवाज कानावर पडू लागतात. जंगलात गेल्यावर तलाव, डबक्याच्या काठी किंवा संथ वाहणाऱ्या पाण्याच्या कडेला पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेता येईल. पक्षी अशा ठिकाणी आंघोळीला किंवा पाणी पिण्यासाठी येतात. कीटक, किडे, कोळी हे त्यांचं खाणं पाण्याच्या परिसरात जास्त असल्यानं ते इथे येतात. फुलांनी बहरलेल्या (सनबर्ड, फ्लॉवर पेकर्स, आयोरा) आणि फळांनी लगडलेल्या झाडांच्या ठिकाणी (बुलबुल, कबुतर, इ.) पक्षी रुंजी घालताना दिसतील. पाण्याच्या जवळ फ्लायकॅचर्स (टिकल्स ब्ल्यू, एशियन ब्राऊन, रेड थ्रोटेड, पॅराडाईज) जास्त दिसतात.
.....

* कोणते पक्षी कुठे दिसतात?
जंगल, गवताळ प्रदेश - ग्रासलँड र्बड्स गवताळ प्रदेशात, मोकळ्या जागेत दिसतात. स्टोनचॅट्स, लार्क, मुनिया, टिटवी ही त्यांचे काही उदाहरणे. तर वूडपेकर, कोतवाल, ट्रिपाई, कॉमन हॉक कुकू असे पक्षी जंगलात आढळतात.
नद्या, धरणांचे बॅकवॉटर, तलाव, किनारपट्टीचा भाग - सीगल, र्टन्स, फ्लेमिंगो, बदकं, जकाना, क्रेक, हेरॉन, स्टॉर्क, किंगफिशर हे या ठिकाणी आढळणारे पक्षी आहेत.
शहरातल्या गजबजाटातही भारद्वाज, मॅगपाय रॉबिन्स, व्हाइट थ्रोटेड फॅन्टेल फ्लायकॅचर (नाचण), मैना, बाबेर्ट, बुलबुल हे पक्षी सहज दिसतात.
रात्रीच्या वेळी घुबड, नाइट जार (रातवे) दिसतात.

* स्थलांतरित पक्षी
पक्षी त्याच भागात राहणारे किंवा स्थलांतरित होऊन आलेले असतात. स्थानिक पक्षी वर्षभर दिसू शकतात. स्थलांतरित पक्षी मात्र ऑक्टोबर-फेब्रुवारी या कालावधीत दिसतात. बरेचसे फ्लायकॅचर, स्टोनचॅट, विविध कुकू, विविध बदकं स्थलांतरित पक्ष्यांमध्ये मोडतात. त्यांचं स्थलांतर दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे, अन्नासाठी आसपासच्या परिसरातून होणारं. दुसरं म्हणजे, थंडीपासून वाचण्यासाठी सैबेरिया, रशिया, मंगोलिया, युरोप इथून होणारं. ब्राह्माणी डक, सैबेरियन क्रेन, सैबेरियन स्टोनचॅट, व्हिटइयर, सीगल, टर्न, पेलिकन हे परदेशी पाहुणे आहेत.

गवताळ प्रदेश, जंगल, मोठे तलाव, धरणाचे बॅकवॉटर इथे स्थलांतरित पक्षी येतात. त्यातली काही लोकप्रिय ठिकाणं - कर्नाळा, संजय गांधी नॅशनल पार्क, उरण, भिगवन, सर्व नॅशनल पार्क व पक्षी अभयारण्य, रत्नागिरी किनारा, गुजरातमध्ये कच्छचे रण (ग्रेटर व लेसर), थोल, नळसरोवर, जामनगर किनारा

* मुंबई बर्डरेस
पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी म्हणजे एचएसबीसी मुंबई बर्डरेस! येत्या रविवारी, २१ फेब्रुवारीला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशा १२ तासांमध्ये पक्ष्यांचं निरीक्षण आणि नोंद होणार आहे. यामध्ये, मुंबई व आजूबाजूच्या परिसरात (माथेरान, अलिबाग, उरण, इ.) हिंडून १२ तासांत किती प्रकारचे पक्षी आढळतात ते नोंदवायचं असतं. चार जणांची एक टीम असते. त्यात एक अनुभवी बर्डवॉचर असतो. चौघांनीही तो पक्षी पाहिल्याशिवाय त्याची नोंद नाही करायची. लॉगबुक दिलेले असते. मुंबईत दिसणाऱ्या पक्ष्यांची यादी त्यात असते. त्यामध्ये वेळ, जागा, ऐकला/बघितला लिहायचं असतं. संध्याकाळी मीटिंग पॉइंट ठरलेला असतो. मग टॅली करायचं. खूप जणांना यामध्ये सामावून घ्यायचं, हा हेतू असतो.

* पक्षीनिरीक्षण म्हणजे काय कराल?
- पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न करा.
- पक्षी पाहण्यासाठी कुठे बसायचं ते ठरवायला हवं. पक्ष्यांच्या किलबिलाटाचा अंदाज घेऊन जागा ठरवता येईल.
- सूयोर्दयाच्या वेळी पक्ष्यांची खाणं मिळवण्यासाठी लगबग सुरू होते. फुलझाडांजवळ सनबर्ड, फ्लॉवरपिकर फुलातल्या नेक्टर या आपल्या खाद्यासाठी येतात. फळझाडांजवळ पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसतात. त्यामध्ये असंख्य प्रकारचे पक्षी असतात.
- अशा ठिकाणी थांबायला हवं की पक्ष्यांना अडथळे येणार नाहीत. फारशी हालचाल न करता थांबलो तर पक्षी अगदी जवळ आलेलेही पाहता येतील.
- कुठल्या परिसरात कोणता पक्षी आढळतो, याची माहिती घेऊन ठेवायला त्यानुसार जायला हवं.
- पक्षीनिरीक्षणाला जाताना बायनाक्युलर, कागद-पेन सोबत असावंं. मॅग्निफाय करता येत असल्यामुळे स्पॉटिंगस्कोपनं पक्षी बघण्याचा आनंद निराळाच असतो.
- नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांची नावं सहज ओळखता येतात. पण अनोळखी पक्षी पाहताना ते कुठे आढळले, त्यांचा आकार कसा, रंग कसा, डोळ्यांचा, डोकं, अंगाचा रंग वेगळा आहे का, चोचेचा आकार कसा आहे, शेपटी किती लांब आहे, याचं निरीक्षण करावं. कावळा, चिमणी, मैना, कबुतर यांच्या तुलनेत त्यांचा आकार कसा आहे, ते लक्षात घ्यावं. त्याचवेळी त्यांच्या सवयी नोंदवायच्या.
- फिल्ड गाईड म्हणजेच बर्ड हँडबुक सोबत असणं आवश्यक आहे. उदा. पॉकेट गाईड टू र्बड्स ऑफ दी इंडियन सबकाण्टिनेण्ट (ग्रिमेट अँड इन्स्किप), द बूक ऑफ इंडियन बर्ड्स (सलीम अली).
- पक्षनिरीक्षणाबरोबरच बर्ड फोटोग्राफीही करता येईल. त्यासाठी जास्त पेशन्स लागतात. चांगले ऑप्टिकल झूम असलेला कॅमेरा (१०, १५, २० एक्स) किंवा योग्य टेलिलेन्स असलेला एसएलआर कॅमेरा सोबत असेल तर याचा आनंद घेता येईल.

तुषार निदंबुर

1 comment:

  1. तुषार फार छान माहिती दिली आहे. पक्षीनिरीक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद...!

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails